....अन् केंद्राने कांदा निर्यातबंदी उठवली! 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 27 February 2020

निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना पासवान यांच्या घोषणेपाठोपाठ उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कांदा निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून पतपत्र, निर्यातीचा कोटा, किमान निर्यातमूल्य अशा अटी लागू होतील काय? अशी धास्ती भारतीय निर्यातदारांना वाटत आहे. दरम्यान, देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढताच, केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी देशांतर्गत भाव आटोक्‍यात आणण्यासाठी किमान निर्यातमूल्य टनाला 850 डॉलर इतके करण्यात आले होते

नाशिक : कांद्याचे उत्पादन मोठे आहे. तसेच कांद्याचे दर देशात स्थिर झाले आहेत. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी खूषखबर कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांना ट्विटद्वारे बुधवारी (ता.26) केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व नागरीपुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी दिली. प्रत्यक्षात मात्र निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना बाहेर येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 

पतपत्रासह कोटा, किमान निर्यातमूल्य अटीची धास्ती 

निर्यातबंदी उठवल्याची अधिसूचना पासवान यांच्या घोषणेपाठोपाठ उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे कांदा निर्यातीसाठी जागतिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून पतपत्र, निर्यातीचा कोटा, किमान निर्यातमूल्य अशा अटी लागू होतील काय? अशी धास्ती भारतीय निर्यातदारांना वाटत आहे. दरम्यान, देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढताच, केंद्र सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. तत्पूर्वी देशांतर्गत भाव आटोक्‍यात आणण्यासाठी किमान निर्यातमूल्य टनाला 850 डॉलर इतके करण्यात आले होते. तसेच किरकोळ आणि घाऊक स्वरूपात साठवणुकीवर मर्यादा आणण्यात आल्या होत्या. निर्यातबंदीला महिना होत नाही, तोच बेंगळुरू रोझ कांद्याची नऊ टन 30 नोव्हेंबरपर्यंत निर्यात करण्यास केंद्राने परवानगी दिली होती. पुढे 6 फेब्रुवारीला कृष्णापूरम्‌ कांदा दहा टन 31 मार्च 2020 पर्यंत निर्यात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता. प्रत्यक्षात मात्र सांबरसाठी हा कांदा वापरला जात असल्याने खाण्यासाठीच्या कांद्याच्या देशांतर्गत भावावर फारसा परिणाम झाला नाही. उलटपक्षी कांद्याचे भाव कोसळत होते. 

मार्चमध्ये 40 लाख टनाची उपलब्धता 
देशात पुढील महिन्यात 40 लाख टन कांदा ग्राहकांसाठी उपलब्ध होईल, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये 28. 4 लाख टन कांदा उपलब्ध झाला होता, असे श्री. पासवान यांनी निर्यातबंदी उठवण्यामागील कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. मुळातच, यंदा देशामध्ये 34 टक्‍क्‍यांनी अधिक कांदा उपलब्ध होईल, असा अंदाज गेल्या महिन्याखेरपर्यंतचा होता. उन्हाळ कांद्याची लागवड अजूनही सुरू असल्याने कांद्याच्या उपलब्धतेचे प्रमाण वाढत जाणार आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कांद्यापुढे निर्यातीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे केंद्राने कुठल्याही अटीविना निर्यात खुली केल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कांद्याच्या पट्ट्यात किलोला 12 ते 17 रुपये किलो या सरासरी घाऊक भावाने कांदा विकला जात आहे. देशांतर्गतसुद्धा 22 रुपयांपर्यंत कांद्याचे घाऊक सरासरी भाव आहेत. 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

भाववाढ झाल्यावर तीन दिवसांनी पुन्हा 30 मेपर्यंत निर्यातबंदी घातली.
पाकिस्तानने कांदा निर्यातबंदीची अधिसूचना काढली आणि त्याचदिवशी मागे घेतली. मग भाववाढ झाल्यावर तीन दिवसांनी पुन्हा 30 मेपर्यंत निर्यातबंदी घातली. चीन कोरोनाग्रस्त असल्याने फारशा कांद्याची निर्यात होण्याची शक्‍यता नाही. शिवाय तुर्कस्थान आणि इजिप्तचा नवीन कांदा मेनंतर बाजारात येईल. नेमक्‍या जागतिक बाजारपेठेतील स्थितीचा फायदा भारतीय कांद्याला होणार आहे. केंद्र सरकारने मात्र निर्यात पतपत्र, कोटा अथवा किमान निर्यातमूल्याविना खुली करायला हवी. - विकास सिंह (कांदा निर्यातदार) 
हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central government lifts onion export ban Nashik Marathi News