"पाच वर्षे काम न केल्यानेच भाजपवर आंदोलनाची वेळ" - भुजबळ

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 28 January 2020

मराठवाड्याच्या पाणीप्रश्‍नासाठी औरंगाबादला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात विचारले असता, भुजबळ म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन अवघे दोन महिने झाले आहेत. नाशिकमधून मराठवाड्याला यंदा तब्बल 111 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मराठवाड्याला कमी पाणी गेलेले नाही.

नाशिक : भारतीय जनता पक्षाने पाच वर्षांत कामे केली असती, तर कदाचित आज त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. लोकशाही असल्याने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार आहे. या आंदोलनाकडे आम्ही सकारात्मकतेने पाहतो. काहीतरी अडचणी असल्याशिवाय कोणी सत्याग्रह करत नाही. मात्र, पाणीप्रश्‍नावर आंदोलनाऐवजी सगळ्यांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील भाजप नेत्यांच्या सत्याग्रहावर टीका 

मराठवाड्याच्या पाणीप्रश्‍नासाठी औरंगाबादला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात विचारले असता, भुजबळ म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन अवघे दोन महिने झाले आहेत. नाशिकमधून मराठवाड्याला यंदा तब्बल 111 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मराठवाड्याला कमी पाणी गेलेले नाही. पाणीप्रश्‍नावर आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्राला अधिकाधिक पाणी कसे मिळेल, यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची आता गरज आहे. राज्यात पडणाऱ्या पावसातील सुमारे दीडशे ते दोनशे टीएमसी पाणी गुजरातला वाहून जाते. यापूर्वीही मी सभागृहात महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याबाबत आवाज उठविला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातला पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही, असे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठीचा सामंजस्य करार बदलला. 

हेही वाचा > रखडलेल्या कामांसाठी 185 कोटी - भुजबळ ​

पाणीप्रश्‍नी लवकरच बैठक 
ज्या भागात पाणी पडते, ते पाणी त्या राज्याचे हा नियम आहे. त्यानुसार आपल्या जमिनीवरचे पाणी आणले तर राज्याच्या प्रश्‍न मार्गी लागू शकतो. गुजरातला एकही थेंब पाणी जाता कामा नये, याकरिता सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्यातून नाशिकसह मराठवाडा आणि राज्याचाही प्रश्‍न सुटू शकेल. यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच एक स्वतंत्र बैठक घेणार आहोत. बैठकीत या विषयातील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधींचा समावेश असेल. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वळविण्यासाठी एक योजना तयार केली जाणार आहे. याकरिता मोठा खर्च आहे; परंतु पाणी निघून गेले तर आहेच, त्याच पाण्यात गरज भागवावी लागेल. त्यामुळे या बैठकीच्या माध्यमातून निर्णय घेऊन राज्याचा पाणीप्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील.  

हेही वाचा > उद्योजकांसाठी "फॅसिलिटी'ची भूमिका सरकारने बजवावी : छगन भुजबळ 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal on BJP Nashik Political Marathi News