मालेगावला विशेष महासभेत गोंधळ! महापौरांची खुर्चीच ताब्यात घेण्याचा प्रयत्न 

प्रमोद सावंत
Thursday, 10 September 2020

महापालिकेची महासभा अन्‌ गोंधळ हे समीकरणच झाले आहे. ऑनलाइन विशेष महासभेतही बुधवारी (ता.९) गोंधळ झाला. तांत्रिक अडचणीने त्यात भर पडली. सत्तारुढ काँग्रेस व एमआयएममध्ये खटका उडाला. शाब्दिक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर महापौरांची खुर्ची ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला.

नाशिक / मालेगाव : महापालिकेची महासभा अन्‌ गोंधळ हे समीकरणच झाले आहे. ऑनलाइन विशेष महासभेतही बुधवारी (ता.९) गोंधळ झाला. तांत्रिक अडचणीने त्यात भर पडली. सत्तारुढ काँग्रेस व एमआयएममध्ये खटका उडाला. शाब्दिक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर महापौरांची खुर्ची ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला.

महापौरांची खुर्चीच ताब्यात घेण्याचा प्रयत्न 

गोंधळातच घरकुल लाभार्थींना सुलभ हप्ते, आयेशानगर स्वीपर कॉलनीत स्थलांतर व महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे शासनाकडे अनुदानासाठी प्रस्ताव हे तीन ठराव मंजूर झाले. महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चारला ऑनलाइन विशेष महासभेला सुरवात झाली. उपायुक्त नितीन कापडणीस, प्रभारी नगरसचिव पंकज सोनवणे सभास्थानी होते. सभा सुरू होताच तांत्रिक अडचणी आल्या. एकाचवेळी सदस्य बोलत असल्याने गोंधळ झाला.

मालेगावला विशेष महासभेत गोंधळ 

‘एमआयएम’चे गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी अली अकबर दवाखान्यामागील जागेवर अतिक्रमणधारकांना पत्राशेड उभारणीला संमतीच्या गेल्या महासभेतील प्रस्तावाला आमचा विरोध होता. अतिक्रमणाला प्रोत्साहन देणारा ठराव का केला? संबंधितांचे नगरसेवक पद रद्द होऊ शकते का? याचा प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी केली. श्री. कापडणीस यांनी हा विषय संवेदनशील असल्याचे सांगून माहिती देण्यापूर्वीच आवाजाची बोंब झाली. भाजप गटनेते सुनील गायकवाड यांनी जीवनदायी योजनेंत खासगी रुग्णालयात उपचार मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच प्रशासनाने काय कारवाई केली, असा सवाल केला. श्री. कापडणीस यांनी रुग्णालयातील त्रुटी, शासन नियमांची माहिती दिली. 

 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

गोंधळातच प्रस्ताव मंजूर झाले
मनपा कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा भासत असल्याचा विषय उपस्थित होताच प्रशासनाने विविध अडचणींवर मात करून सिलिंडर उपलब्ध केल्याचे सांगितले. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करीत एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज, युनूस इसा यांनी थेट कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश करत महापौरांसमोर ठिय्या मांडला. मनपा रुग्णालयांतील सुविधांचा अभाव, अतिक्रमणाला प्रोत्साहन हे प्रकार निषेधार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वीच पुन्हा प्रश्‍न सुरू झाले. त्यावर श्रीमती शेख यांनी माजी महापौर शेख रशीद यांचाही या विषयास विरोध असल्याने खोके हटविणार असल्याचे सांगितले. त्यावर टीका करत ऑनलाइन सभेच्या नावाने चुकीचे प्रस्ताव मंजूर होत असल्याबद्दल संताप व्यक्त करत युनूस ईसा यांनी थेट महापौरांची खुर्ची ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पुत्र डॉ. खालिद यांनी त्यांना आवरले. माजिद युनूस व महापौर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या गोंधळामुळे प्रस्तावावर फारशी चर्चाच झाली नाही. गोंधळातच प्रस्ताव मंजूर झाले. विशेष महासभेतील गोंधळाबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.  

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in Malegaon special general meeting nashik marathi news