"पुन्हा कॉंग्रेसच देशातील नंबर एकचा पक्ष होईल" कोण म्हणाले वाचा...

संपत देवगिरे
Monday, 17 August 2020

कोरोनाच्या संकटाला राज्य सरकार आणि सत्तेतील सहभागी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षच संकटाच्या काळात गरीबांच्या मदतीला धाऊन गेला. स्वतः आपल्या नेत्या सोनिया गांधी यांनी कोरोनाग्रस्त व गरीबांच्या मदतीला धाऊन जा, असे आदेश दिले होते. जेव्हा कॉंग्रेस पक्ष कोरोनाग्रस्तांची मदत करीत होता, तेव्हा तर भाजपचे लोक झोपले होते.

नाशिक : कोरोनाच्या संकटाला राज्य सरकार आणि सत्तेतील सहभागी पक्ष म्हणून कॉंग्रेस पक्षच संकटाच्या काळात गरीबांच्या मदतीला धाऊन गेला. स्वतः आपल्या नेत्या सोनिया गांधी यांनी कोरोनाग्रस्त व गरीबांच्या मदतीला धाऊन जा, असे आदेश दिले होते. जेव्हा कॉंग्रेस पक्ष कोरोनाग्रस्तांची मदत करीत होता, तेव्हा तर भाजपचे लोक झोपले होते. याची सर्वांना जाणीव आहे. त्यामुळेच काळजी करु नका पुन्हा कॉंग्रेसच देशातील नंबर एकचा पक्ष होईल, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. 

नाशिक जिल्हा व शहर कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते म्हणाले, ज्यात महाआघाडीचे सरकार आहे. त्यातील कॉंग्रेस हा एक घटक पक्ष आहे, हे विसरुन चालणार नाही. आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे. सरकारमधील तिसऱ्या क्रमाकांवरील पक्ष पुन्हा पहिल्या क्रमांकाचा करायचा आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका लढवायच्या आहेत, याचा विचार करा. त्यासाठी तयारीला लागले पाहिजे. गाव पातळीवर काम केले पाहिजे. इतरांना एक पासून सुरवात करावी लागते.

तुम्हाला टाळ्या वाजवायच्या, की काम करायचे?

प्रत्येक गावात शंभरात 25-30 मते तर आपल्या पक्षाची हमखास असतात. त्या मतदारांपर्यंत पोहचावे लागेल. तुम्ही जाल तेव्हा कळेल की तुमचेही बांधभाऊ आहेत. तुम्ही तिथे जेव्हा जोर लावाल, तेव्हाच राज्यात आपली पहिल्या क्रमांकाकडे वाटचाल सुरु होईल. काळजी करु नका, या पद्धतीनेच भारतात देखील कॉंग्रेसच पुन्हा एक नंबरचा पक्ष होणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील. हे शाश्‍वत आहे, तसेच भावनिक देखील आहे. तुम्हाला टाळ्या वाजवायच्या, की काम करायचे? हे तुमच्या हातात आहे. 

सरकारचे सर्व लक्ष कोरोनाकडे केंद्रीत
थोरात म्हणाले, राज्यात सरकार आले. ते कसे आले?. ती किती लांबलचक प्रक्रिया होती, हे सांगायला नको. जवळपास दोन महिने त्यासाठी विविध स्तरावर चर्चा सुरु होती. सरकार आले. मंत्रीमंडळ झाले. त्यानंतर लगेचच कोरोनाचे संकट आले. त्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामाकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळालेला नाही. अगद्यापही कोरोना संपलेला नाही. सरकारचे सर्व लक्ष त्याकडे केंद्रीत झाले आहे.

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

आमचे सरकार खंबीर आहे
महाविकास आघाडीच्या सरकारमुळे भारतीय जनता पक्षाचा राज्यात मोठा अपेक्षाभंग झाला आहे. भाजपचे जवळपास पंधरा ते वीस आमदार व अनेक नेते अस्वस्थ आहेत. त्यांना थोपविण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळेच भाजप सतत वेगवेगळे मुहुर्त काढून राज्य सरकार पडेल, असे सांगत असते. मात्र त्यांचे मुहुर्त काढता काढता वर्षे निघून गेले आहे. आमचे सरकार खंबीर आहे. ते पाच वर्षे चालेल. 

यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रवक्‍त्या, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार सिरीष कोतवाल, अनिल आहेर, जिल्हा परिषद सभापती अश्‍विनी आहेर, बाजार समितीचे सभापती संपत सकाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक शाहू खैरे, राजेंद्र बागूल, लक्ष्मण जायभावे, दिगंबर गिते आदी उपस्थित होते. जिल्हा सरचिटणीस रतन जाधव यांन ीसंयोजन केले. 

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress will be the number one party in the country again nashik marathi news