अखेर कंटेन्मेंन्ट झोन उठला अन्‌ "त्यांनी" अनुभवले स्वातंत्र्य! 

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 8 May 2020

"घराच्या खिडकीतून जेवढे आकाश दिसेल तेच आमचे जग. दिवसभर घरात तोंडाला मास्क लावून बसणे, मनोरंजन, नवीन शिकणे, घरच्यांशी गप्पा या चौकटीतच गेले 28 दिवस काढले; परंतु तेही गरजेचे होते." 

नाशिक : सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच भिंती अन्‌ तेच चेहरे, त्यांच्याशी गप्पा तरी किती मारणार? मनोरंजनाला मर्यादा, घराबाहेर पडलो तर पोलिस, सोसायटीच्या अध्यक्षाची सातत्याने नजर, नजर चुकवून बाहेर फेरफटका मारला तरी शेजारचे संशयाने पाहणार, अशा 28 दिवसांच्या खेळात कधी घराबाहेर पडू असे झाले. अखेर झोन उठला अन्‌ स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद अनुभवला. कन्टेन्मेंट झोनच्या माध्यमातून आणीबाणी अनुभवल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली ती गोविंदनगर व नवश्‍या गणपती मंदिर परिसरातील महिलांनी...

अखेर कंटेन्मेंन्ट झोन उठला अन्‌ अनुभवले स्वातंत्र्य! 

नाशिक शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळल्यानंतर महापालिकेने मनोहरनगरपासून तीन किलोमीटरचा परिसर कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला होता. त्या दिवसापासून 14 दिवस व तो रुग्ण बरा होऊन घरी परतला तरी त्यापासून आणखी पुढे 28 दिवस या भागात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता; परंतु शेवटच्या 14 दिवसांत एकही रुग्ण न आढळल्याने महापालिकेने कन्टेन्मेंट झोन उठविला. हीच परिस्थिती गंगापूर रोडवरील नवश्‍या गणपती मंदिर परिसरातील नागरिकांची होती. तेथील कन्टेन्मेंट झोन महापालिकेने उठविल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

...पण ही आणीबाणी न लादलेली 
कोरोनामुळे शहरात लॉकडाउन असला तरी गोविंदनगर व नवश्‍या गणपती मंदिर परिसरात रुग्ण आढळल्याने कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आल्याने येथील नागरिकांना बाहेर पडता येत नव्हते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने केलेल्या योजनांचे स्वागत करण्यात आले. 14 ते 28 दिवस घरात बसून राहणे म्हणजे ही एक प्रकारची आणीबाणीच होती; परंतु ती लादलेली नव्हती. नागरिकांच्या सुरक्षेसाठीच उपाययोजना असल्याने आम्ही ती मनापासून स्वीकारली व अंमलबजावणी केली. सकाळी दूधवाला दाराबाहेर पिशवी टाकायचा, भाजी घेण्यासाठी बाहेर पडायचे, एवढाच काय तो जगाशी संबंध. त्याव्यतिरिक्त बाहेर पडणे मुश्‍कील होते. आणीबाणी म्हणजे काय, याचा अनुभव घेतल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. 

प्रतिबंधित क्षेत्र उठल्यानंतर महिलांच्या भावना. 
घराच्या खिडकीतून जेवढे आकाश दिसेल तेच आमचे जग. दिवसभर घरात तोंडाला मास्क लावून बसणे, मनोरंजन, नवीन शिकणे, घरच्यांशी गप्पा या चौकटीतच गेले 28 दिवस काढले; परंतु तेही गरजेचे होते. -सुवर्णा बच्छाव-टर्ले, स्वस्तिश्री अपार्टमेंट, गोविंदनगर 

हेही वाचा > थरारक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

चौदा दिवस घरातच राहावे लागणार ही मानसिकता तयार केली. कुटुंब किंवा सोसायटीतील एकही सदस्य बाहेर पडणार नाही याची ताकीद प्रत्येकाला दिली. व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधला. -भारती देवरे, कमल क्रिस्टल सोसायटी, नवश्‍या गणपती परिसर 

हेही वाचा >मालेगावात शासकीय रुग्णालयातच छापा..धक्कादायक माहिती उघड.. वैद्यकीय क्षेत्रात खळबळ!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: containment zone removed and the freedom experienced nashik marathi news