CoronaFighter : VIDEO : "मनात भीती असते..पण कोरोनाच्या सावटाखाली सेवेचे झाड फुलवायचंय" कर्तव्यसाठी 'त्या' अनेकांच्या केअरटेकर! 

योगेश सोनवणे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

सकाळी घरातील सर्व कामे आवरून ड्यूटीवर येण्यासाठी घरातून बाहेर पडते तेव्हा लेकरे केविलवाणी होत बाय करतात. काळजावर दगड ठेवून, मन घट्ट करून मागे वळून न पाहता रुग्णसेवेत रुजू होते. मनात भीती असते, पण कोरोनाच्या सावटाखाली सेवेचे झाड फुलवायचे आहे.

नाशिक / दहीवड : सकाळी घरातील सर्व कामे आवरून ड्यूटीवर येण्यासाठी घरातून बाहेर पडते तेव्हा लेकरे केविलवाणी होत बाय करतात. काळजावर दगड ठेवून, मन घट्ट करून मागे वळून न पाहता रुग्णसेवेत रुजू होते. मनात भीती असते, पण कोरोनाच्या सावटाखाली सेवेचे झाड फुलवायचे आहे, असे कोरोनाच्या लढ्यात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टर तसेच तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या सदस्या डॉ. सुवर्णा वाजे यांनी सांगितले. नाशिक जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या सुवर्णा वाजे सध्या झाकिर हुसेन रुग्णात कोविड-19 आयसोलेशन कक्षात संशयितांची 12 तास शुश्रूषा करीत आहेत. त्यांच्या रुग्णसेवेचा कुटुंबीयांना अभिमान आहे, पण भीतीही तितकीच. 

झाकिर हुसेन हॉस्पिटलमध्ये देताहेत सेवा 

हॉस्पिटलमध्ये येताच डॉक्‍टर सर्वप्रथम पीपीई कीट परिधान करून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करतात. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णास तीन थर असलेले मास्क आणि सॅनिटायझर पुरविले जात आहे. हॉस्पिटलमध्ये आलेला कुठला रुग्ण पॉझिटिव्ह आहे, हे माहीत नसते. रुग्ण आल्यानंतर त्याच्या थुंकीची तपासणी करून रिपोर्ट येईपर्यंत 24 तास जातात. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना समजून सांगताना दमछाक होते. मरकज, दिल्ली परिसरातील सर्व रुग्णांना उपचार देणे आवश्‍यक असताना, इतर रुग्ण व नातेवाईक समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. त्यांचा समज एवढाच असतो, की पॉझिटिव्ह नसलो तरी येथील दुसऱ्या रुग्णांची आपल्याला लागण होईल. मात्र, शासनाच्या गाइडलाइन अतिशय मजबूत आहेत. संशयितास एकतर त्याला विलगीकरण कक्षात प्रवेश देणे अन्यथा पोलिसांच्या हवाली करणे हे दोन पर्याय असतात. येथे रुग्णांच्या बेडमधील अंतर शासन नियमानुसार सामाजिक अंतरानुसार केले आहे. रुग्णांचे बेडरूम, टॉयलेट, बाथरूम हायपोक्‍लोराइड द्रावणाने स्वच्छ केले जातात. हॉस्पिटलमध्ये कमालीची स्वच्छता पाळली जात आहे. यात डॉ. वाजे यांच्यासह परिचारिका, ब्रदर, स्वच्छता कर्मचारी स्वतःचे कुटुंबीय व स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता कोरोनाच्या लढ्यात रुग्णाच्या सेवेत गुंतले आहेत. 

VIDEO : नाशिकमध्ये कसा आढळला दुसरा कोरोना पॉझिटिव्ह? 

"सकाळ तनिष्का'च्या माध्यमातून सामाजिक उपक्रम 
डॉ. वाजे यांनी तनिष्का डॉक्‍टर्स फोरमच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. आदिवासीबहुल भागातील आदिवासी मुलांना दत्तक घेऊन मोफत आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी तसेच व्यसनमुक्ती केंद्र त्या चालवितात. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्यस्तरीय कर्मयोगी महिला पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. 
--- 
सध्याची परिस्थिती नाजूक आहे. वैऱ्यावरही कोरोनाची नजर पडू नये. वैद्यकीय क्षेत्रातील सर्व जण आपापल्या परीने योगदान देत आहेत. लोकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घरातच थांबावे. सध्याच्या परिस्थितीत घर हेच एकमेव सुरक्षित ठिकाण आहे. -डॉ. सुवर्णा वाजे, वैद्यकीय अधिकारी 

हेही वाचा > होम क्वारंटाइन "आमदार' काही ऐकेना! केला "असा' कारनामा अन् पडले वादाच्या भोवऱ्यात!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona fighter dr.suvarna vaje being caretaker of many patients nashik marathi news