आदिवासींच्या जीवनशैलीला कोरोनाचा डंख; महामारीमुळे आदिवासी समस्यांच्या विळख्यात

विजय पगारे 
Friday, 18 September 2020

तालुक्‍यातील आदिवासी बांधव मुंबईतील कल्याण, दादर, ठाणे या स्टेशनवर रानभाज्या विकायला जाणारे सुध्दा लोकल बंद असल्यामुळे घरीच बसून आहेत.

नाशिक/इगतपुरी : कोरोनाच्या जागतिक महामारीचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्या आदिवासी, कष्टकरी वर्गाला बसला आहे रोजगार,आरोग्य या मूलभूत सुविधांपासून वंचित राहताना दिसत आहेत. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्‍यातील अनेक आदिवासी कुटुंबे हे बांधकाम कामगार, हॉटेल कामगार, वीटभट्टी कामगार म्हणून काम करतात. ऋतुचक्रानुसार जंगलात मिळणाऱ्या रानभाज्या, फळे, पाने यांची विक्री करणाऱ्या आदिवासी कुटुंबांना पण याचा चांगलाच फटका बसला आहे. 

तालुक्‍यातील आदिवासी बांधव मुंबईतील कल्याण, दादर, ठाणे या स्टेशनवर रानभाज्या विकायला जाणारे सुध्दा लोकल बंद असल्यामुळे घरीच बसून आहेत. जी कुटुंबे स्वत:च्या दुचाकीने अथवा रिक्षाकरून बाजारपेठेत जातात, अशा विक्रेत्यांना बाजारात जागा नसणे, तसेच करोनाच्या भीतीमुळे ग्राहक कमी होणे याचा फटका बसला आहे. परिणामी सर्व आदिवासी वाड्यात लोक हताशपणे बसून असल्याचे चित्र आहे. 

आरोग्य यंत्रणा ठप्प

बहुतांश आदिवासी समाज हा सरकारी आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असून, करोनामुळे गरोदरपणात महिलाची नियमित तपासणी, संस्थाअंतर्गत डिलेव्हरी, अंगणवाड्यामध्ये तसेच शाळेत मुलांची नियमित तपासणी जी करोणापूर्वी सरकारी यंत्रणामार्फत होत होती. ती आता पूर्णपणे ठप्प आहे. करोनाचे कारण पुढे करीत या तपासण्या केल्या जात नाहीत.हे वास्तव आहे. साधा आजार असला तरी अगोदर करोना टेस्ट करा, मगच तपासणी करू, असे सर्व सरकारी व खासगी वैद्यकीय संस्थामध्ये सांगण्यात येत आहे.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

 
सगळीकडे परिस्थिती अवघडच 

सध्या अंगंणवाड्या, शाळा, आश्रमशाळा बंद असल्यामुळे आदिवासी मुलांची शिक्षणाची परवड होत आहे. बऱ्याच भागात स्मार्ट फोन नाहीत, फोन असला तरी रेंज नाही, यामुळे ऑनलाइन शिक्षणाचा फारसा लाभ घेता येत नाही या परिस्थीतीला सध्यातरी काहीही पर्याय दिसत नाही. या स्थितीत उपासमार होत नाही, ही जरी जमेची बाजू समजली जाते सरकार मोफत धान्य वाटप करीत आहेत. या मोफत धान्यामध्ये फक्‍त तांदूळ, गहू दिले जात आहेत. जेवण बनवण्यासाठी फक्‍त तांदूळ, गहू देउन भागणार नाहीत, त्यासाठी डाळी, तेल, मसाला आदी साहित्य लागतात ते दिले जात नाहीत, परिणामी अनेक आदिवासी कुटुंब हे कोरडा भात खाउन जीवन जगत आहेत.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

 

संपादन- रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona made tribal life difficult nashik marathi news