...अन् कोविड रुग्णांसाठी बांधलेला तंबूच उखडला? शहरात चर्चेचा अन् वादाचा विषय 

प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 10 June 2020

टेंट निवारा केंद्राच्या साहित्यांची आवराआवर सुरू असली, तरी पर्लिंग एक टेंट उभारणी व कुंपणासाठी ठोकलेल्या बल्ली-पत्र्यांचे बिल कोण अदा करणार, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. दरम्यान, शहरात चर्चेचा व वादाचा विषय ठरलेला हा तंबू उखडल्याने प्रशासन तोंडघशी पडले आहे.

नाशिक / मालेगाव : टेंट निवारा केंद्राच्या साहित्यांची आवराआवर सुरू असली, तरी पर्लिंग एक टेंट उभारणी व कुंपणासाठी ठोकलेल्या बल्ली-पत्र्यांचे बिल कोण अदा करणार, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. दरम्यान, शहरात चर्चेचा व वादाचा विषय ठरलेला हा तंबू उखडल्याने प्रशासन तोंडघशी पडले आहे.

मालेगाव पॅटर्नचा गवगवा

शहरात कोरोना उद्रेकाची संधी मानून उखळ पांढरे करण्याचा डाव काहींनी रचला होता. येथे शेकडो शाळा-महाविद्यालयांच्या इमारती असताना, मुंबईप्रमाणे जुन्या महामार्गावरील रिलायबल मैदानावर कोविड रुग्णांसाठी होत असलेला तंबू (टेंट) अखेर उखडला. टेंट निवारा केंद्राच्या साहित्यांची आवराआवर सुरू असली, तरी पर्लिंग एक टेंट उभारणी व कुंपणासाठी ठोकलेल्या बल्ली-पत्र्यांचे बिल कोण अदा करणार, हा प्रश्‍न अनुत्तरित आहे. दरम्यान, शहरात चर्चेचा व वादाचा विषय ठरलेला हा तंबू उखडल्याने प्रशासन तोंडघशी पडले आहे. रुग्णसंख्या वाढेल हा अनेकांचा अंदाज फोल ठरला असून, याउलट कोरोनामुक्तीच्या मालेगाव पॅटर्नचा गवगवा होत आहे. 

निर्णय जाहीर केल्यावर तब्बल 11 दिवस तंबू होता... 

शहरात टेंट निवारा केंद्राबद्दल महापालिकेतील सत्तारूढ, विरोधी नगरसेवकांसह सर्व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवत जोरदार टीका केली होती. 24 मेस काम तूर्त स्थगित केले होते. शासन मंजुरीनंतर हे काम करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी जाहीर केले. टेंट कोविड निवारा केंद्राचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. आमदार मौलाना मुफ्ती ईस्माइल, माजी आमदार आसिफ शेख, महापौर ताहेरा शेख यांच्यासह महापालिकेतील सत्तारूढ कॉंग्रेसचे नेते, माजी महापौर रशीद शेख, महागठबंधन आघाडीच्या गटनेत्या शानेहिंद निहाल अहमद, मुश्‍तकीम डिग्निटी, शिवसेनेचे माजी उपमहापौर सखाराम घोडके, मनसेचे शहराध्यक्ष राकेश भामरे आदींसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी याला विरोध केला होता. या कामासाठी कार्यादेश मंजुरीही नव्हती. आयुक्तांनी काम स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर तब्बल 11 दिवस तंबू होता. रुग्णसंख्या कमी झाली. सर्व आशा मावळल्यानंतर दोन दिवसांपासून साहित्य हलविण्यास सुरवात झाली. तीन ट्रकपेक्षा अधिक साहित्य काढण्यात आले. जेसीबीची मदत घेण्यात आली. शेकडो मजूर कार्यरत होते. हा खर्च कोण करणार की ठेकेदारालाच हा भुर्दंड, याचीच चर्चा शहरात सुरू आहे. 

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

"सकाळ'ने सर्वप्रथम टाकला प्रकाशझोत 
"सकाळ'ने सर्वप्रथम ही जागा योग्य नाही. पावसाळा सुरू झाल्यास हा खर्च पाण्यात जाईल, असे निदर्शनास आणून देत याविरोधात आवाज उठविला. स्थानिक रहिवाशांचा याला विरोध होता. काळी मातीची जमीन असल्याने येथे टेंट योग्य होणार नाही, असे मत व्यक्त करताना पर्यायी जागाही काहींनी सुचविली होती. सर्वपक्षीय विरोध डावलून काम सुरू होते.

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid tent removed in malegaon nashik marathi news