ध्येयवेड्या पिता-पुत्रांचे यशस्वी मिशन! योगप्रसारासाठी कन्याकुमारीपर्यंत सायकलवारी 

दत्ता जाधव
Monday, 2 November 2020

मुलांनी होकार दिल्यावर लोहार यांनी दोन्ही मुलांसह नाशिक ते कन्याकुमारी व परत नाशिक असा प्रवास करत आज सायंकाळी काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा गाठला. १० ऑक्टोबरला त्यांनी नाशिकहून सकाळी सहाला सुरवात केली.

पंचवटी (नाशिक) : भारतीय योग परंपरांचे जतन व प्रसारासाठी नाशिकच्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने त्यांच्या दोन मुलांसह नाशिक ते कन्याकुमारी असा २१ दिवसांत साडेतीन हजार किलोमीटरचा परतीचा सायकल प्रवास करीत अनोखा उपक्रम राबविला. 

दोन्ही मुलांसह नाशिक ते कन्याकुमारी प्रवास
शहरातील गणेश लोहार महापालिका शाळेत शिक्षक असून, यंदा पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांनी हा उपक्रम राबविला. भारतीय परंपरा व योगसाधनेविषयी जगभर कुतूहल आहे. लोहार यांनी योगसाधनेच्या प्रसारासाठी नाशिक ते कन्याकुमारी अशा सायकल प्रवासाची कल्पना त्यांच्या वेदांत व अथर्व या दोन मुलांकडे बोलून दाखविली. मुलांनी होकार दिल्यावर लोहार यांनी दोन्ही मुलांसह नाशिक ते कन्याकुमारी व परत नाशिक असा प्रवास करत आज सायंकाळी काळाराम मंदिराचा पूर्व दरवाजा गाठला. १० ऑक्टोबरला त्यांनी नाशिकहून सकाळी सहाला सुरवात केली. रोज दीडशे ते दोनशे किलोमीटरचे अंतर कापत अवघ्या २१ दिवसांत त्यांनी आपली मोहीम फत्ते केली. हे तिघे शनिवारी (ता. ३१) सायंकाळी पंचवटीतील काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे पोचल्यावर कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

मोहिमेचा मार्ग 
नाशिकहून निघाल्यावर पुणे, सातारा, कित्तूर, चित्रकुट, मदुराई ते कन्याकुमारी व पुन्हा त्याचमार्गाने नाशिक असा हा प्रवास होता. राष्टीय महामार्ग क्रमांक ४१, ४४ व ४८ वरून प्रवास केल्याचे श्री. लोहार यांनी ‘सकाळ’ला सांगितले. जाताना गोदावरीचे जल घेऊन गेलो होतो त्याने स्वामीजींचे चरण धुतले, तर येताना त्रिवेणी संगमावरील पाणी आणून त्याचा श्रीरामाला जलाभषेक करण्याचा मानस असून, रविवारी (ता.१) सकाळी त्या पाण्याने श्रीरामाचा जलाभिषेक करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

 

वैदिक परंपरा, योगविद्या भारतानेच जगाला दिली
भारतीय लोकही बुद्धिमान असून, जगात खऱ्या अर्थाने वैदिक परंपरा, योगविद्या भारतानेच जगाला दिली आहे, याशिवाय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत हा उपक्रम केला. - गणेश लोहार, नाशिक  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cycling to Kanyakumari for spreading importance of yoga nashik marathi news