इरफान खानच्या निधनाने 'इथले' विद्यार्थी पोरके...जणू देवच धावून आला होता!!

irfan khan patryachi wadi.jpg
irfan khan patryachi wadi.jpg

नाशिक / इगतपुरी : आपल्या हरहुन्नरी अभिनयातून रसिकांना मंत्रमुग्ध करणारा बॉलिवूडमधील अभिनेता इरफान खान याचे बुधवारी (ता. 29) निधन झाले. मात्र त्याच्या निधनाने बॉलिवूडबरोबरच त्रिंगलवाडीजवळील पत्र्याचीवाडी (ता. इगतपुरी) येथील त्याच्या आदिवासी व गोरगरीब चाहत्यांना मोठे दुःख झाले आहे. इरफान खान याच्या अकाली निधनामुळे पत्र्याचीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील आदिवासी मुलांना दर वर्षी हक्काची शालेय साहित्य व मदतीची भेट देणारा "नायक' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. 

अभिनेता असूनही आदिवासी विद्यार्थ्यांवर त्याचे विशेष प्रेम
इगतपुरीसारख्या पर्यटन व निसर्गरम्य आदिवासी तालुक्‍यावर इरफान खानचे विशेष प्रेम होते. त्रिंगलवाडी व कुशेगाव येथील ते खातेदार आहेत. तसेच त्रिंगलवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी व बंधाऱ्यालगत अभिनेता इरफानचे आलिशान फार्महाउस आहे. आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून तो नियमित त्रिंगलवाडी येथील आपल्या फार्महाउसवर येत असे. अभिनेता असूनही त्रिंगलवाडी परिसरातील पत्र्याचीवाडी येथील आदिवासी विद्यार्थ्यांवर त्याचे विशेष प्रेम होते. म्हणूनच आपल्या प्रत्येक भेटीत इरफान पत्र्याचीवाडी येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत असे. त्यामुळे या शाळेतील मुले व इरफान यांच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. दर वर्षी तो नियमित या गोरगरीब विद्यार्थ्यांना स्वेटर, रेनकोट, दप्तर, वह्या-पुस्तके व चप्पल-बूट तसेच शाळेला खेळाचे साहित्य आदी हक्काने देत असे. सणासुदीच्या प्रत्येक भेटीवेळी विद्यार्थी मित्रांना मिठाई घेऊन यायचा इतका जिव्हाळा निर्माण झाला होता. 

आजारी असतानाही मदत 
इरफान कर्करोगाने ग्रस्त असल्याचे समजताच येथील मुलांनी तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना केली होती. पत्र्याचीवाडी येथील मुलांनी आपल्याकरिता प्रार्थना केल्याचे अमेरिकेत उपचार घेत असताना समजताच त्याला गहिवरून आले होते. चिमुकल्या मुलांच्या रूपात आजारपणात देवच धावून आला, असे भावनिक उद्‌गार इरफानने काढत आजारपणाशी लढा देत असतानादेखील मुलांना उच्च प्रतीचे 100 रेनकोट पाठविल्याची एक आठवण भाऊराव बांगर यांनी सांगितली. 

एक जिवलग मित्र म्हणून अभिनेता इरफान खान व माझी भेट होत होती. पंधरा दिवसांपूर्वीच फोनवर संवादही झाला होता. यात प्रकृती उत्तम असल्याचे सांगून फार्महाउसवर आल्यावर भेटू, अशी ग्वाही दिली होती. मात्र आज त्यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. -गोरख बोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य) 


इरफान खान यांच्या निधनाने पत्र्याचीवाडीस मोठे दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनाने ही शाळा पोरकी झाली आहे. इरफान शाळेला नेहमी भेट देऊन सर्वांशी संवाद साधत. त्यांच्या अकाली जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. -सचिन कापडणीस, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, पत्र्याचीवाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com