सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा..! देवेंद्र फडणवीसांची नाशिक जिल्हा रुग्णालय भेट...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सींगची काटेकोर अंमल बजावणी करण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा रुग्णालयाच्या भेटीदरम्यान सोशल डिस्टन्सींगचा पुरता फज्जा उडाला. खासदार-आमदार-नगरसेवक आणि त्यांचया कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सकडून जादा बिलिंगच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने समिती नेमावी. या समितीने प्रत्यक्ष जाऊन रुग्णांना आकारण्यात आलेल्या बिलिंगची खातरजमा करून संबंधित हॉस्पिटल्सवर कारवाई करण्याची सूचना देतानाच, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटल्सवर बारकाईने लक्ष्य ठेवण्यच्या सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच, शहरातील वाढत्या कोविड रुग्णांसाठी खाटांची कमतरता असून, त्याबाबत चिंता व्यक्त करताना, मालेगावसह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामकाजाचे कौतूक करीत समाधानही व्यक्त केले.

सोशल डिस्टन्सींगचा मात्र फज्जा
कोविडच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सींगची काटेकोर अंमल बजावणी करण्याचे सातत्याने आवाहन केले जात आहे. मात्र, विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांच्या जिल्हा रुग्णालयाच्या भेटीदरम्यान सोशल डिस्टन्सींगचा पुरता फज्जा उडाला. खासदार-आमदार-नगरसेवक आणि त्यांचया कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्याआवारातच आणि जिल्हाधिकारी-पोलिसांसमोरच सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडालेला पाहून रुग्णालयाच्या आवारात असलेल्या रुग्णांच्या नातलगांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस : वाढत्या रुग्णांमुळे खाटांच्या कमतरतेवर चिंता

माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता. ८) नाशिक जिल्हा रुग्णालयास भेट देत कोविड रुग्णांसंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाची माहिती घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या कक्षाला भेट देत रुग्णांची संवाद साधला. त्यानंतर, त्यांनी प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीयअधिकारी डॉ. अनंत पवार, फिजिशियन डॉ. प्रमोद गुंजाळ यांच्याशी कोविड रुग्णांसंदर्भातील कामकाजाची माहिती घेतली. त्यावेळी श्री. फडणवीस यांनी खासगी हॉस्पिटल्सकडून कोविड रुग्णांबाबत अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या लक्षात आणून देताना, तातडीने समितीची नेमून, या समितीमार्फत अशा हॉस्पिटल्सवर कारवाई करावी. या हॉस्पिटल्समध्ये दर्शनीस्थळी रेटचार्ट लावावा, खासगी प्रयोगशाळांकडूनही रुग्णांची कोविड चाचणीसाठी जादा आकारणी करीत असेल तर त्यावर नियंत्रण आणावे, तसेच, कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटल्सवर समितीमार्फत बारकाईने लक्ष्य ठेवण्याच्या सूचना केल्या.
तर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही, शहरात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, खाटांची कमतरता भासते अशी विचारणा केली. त्यावेळी जिल्हा रुग्णालयाकडून शहरातील खाटांची माहिती दिली. शहरात खाटांची कमतरता असल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी महापौर सतिश कुलकर्णी, खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीअधिकारी लीना बनसोड, पोलिस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

सिव्हिलबाबत समाधान
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यु वाढत असले तरी मृत्युदर आवाक्यात आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेंटरची सुविधा असून, मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा तर सिव्हीलकडून पाच व्हेंटिलेटरची सोय आहे. अतिरिक्त दहा व्हेटिंलेटर मंजूर करण्यात आले आहेत. सिव्हिलसाठी दोनशे लिटरची ओटी-टँकला मंजुरी मिळालीआहे. त्यामुळे अत्यवस्थअवस्थेतील कोविड रुग्ण वाचविण्यात आल्याचे यावेळी डॉ. निखिल सैंदाणे यांनी सांगितले. तर, फडणवीस यांच्यासह खासदार डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले.

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devendra Fadnavis visits Nashik District Hospital nashik marathi news