अभिमानास्पद! बागलाणची लेडी सिंघम बनली हरिद्वारची 'अधीक्षक'; जिल्ह्यातील पहिली महिला IPS

अंबादास देवरे
Friday, 2 October 2020

लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळविले आणि ‘आयपीएस’ रॅंक मिळविली. दिल्ली, मसुरी, हैदराबाद आणि सहसपूर (डेहराडून, उत्तराखंड) येथे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडल्यानंतर आता त्यांची हरिद्वार येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. 

नाशिक : (सटाणा) कठोर परिश्रम, दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करून यशाला गवसणी घातलेल्या बागलाणच्या महिला आयपीएस डॉ. विशाखा अशोक भदाणे दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर हरिद्वार येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून रुजू झाल्या आहेत. 

बागलाणचे नाव देशपातळीवर पुन्हा एकदा उंचावले...

आराई (ता. बागलाण) येथील मूळ रहिवासी आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत तब्बल चाळीस वर्षे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नोकरीस असलेल्या अशोक भदाणे यांची मुलगी व त्याच संस्थेची विद्यार्थिनी असलेल्या डॉ. विशाखा २०१८ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवून ‘आयपीएस’ झाल्या आहेत. या यशामुळे दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर आता त्यांची हरिद्वार येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे. नाशिक जिल्हा आणि बागलाण तालुक्यातील पहिली महिला ‘आयपीएस’ अधिकारी म्हणून नियुक्त होण्याचा बहुमानही डॉ. विशाखा यांनी मिळविला आहे. त्यांचा या कर्तृत्वामुळे बागलाणचे नाव देशपातळीवर पुन्हा एकदा उंचावले आहे. 

अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती

वैद्यकीय व्यवसायातून सामाजिक सेवा बजावता येते. मात्र व्यवसायापेक्षा या क्षेत्रालाही गवसणी घालणारे दुसरे क्षेत्र निवडून त्यात मोठे काम करावे, असे विशाखाने निश्चित केले. त्यामुळे तिने भारतीय प्रशासकीय सेवेची निवड करून देशातील सर्वोच्च सनदी सेवा म्हणजेच ‘आयएएस’ व्हायचेच, अशी खूणगाठ बांधली. कठोर मेहनतीने २०१८ मध्ये डॉ. विशाखाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यश मिळविले आणि ‘आयपीएस’ रॅंक मिळविली. दिल्ली, मसुरी, हैदराबाद आणि सहसपूर (डेहराडून, उत्तराखंड) येथे प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडल्यानंतर आता त्यांची हरिद्वार येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. 

प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात 

डॉ. विशाखा यांचा जीवनप्रवास सहज शब्दांनी व्यक्त करता येईल, असा नक्कीच नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी केलेले दोन हात, जिद्द, आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाचा तो परिणाम आहे. विशाखा ही सर्वसाधारण मुलगी. मात्र शैक्षणिक उत्कर्षाच्या उंबरठ्यावर असताना आई हृदयविकाराने गेली. स्वत:च्या भविष्यासाठी काहीतरी आव्हानात्मक करण्याचा निर्णय घेणार, तेव्हाच घराची जबाबदार तिच्यावर आली. या अवस्थेतही ती डगमगली नाही. ती परिस्थितीशी लढली आणि आज ‘आयपीएस’ अधिकारी होऊन विद्यार्थिनींचा आदर्श बनली आहे. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

वडिलांच्या प्रेरणेमुळेच आज मी ‘आयपीएस’ अधिकारी होऊ शकली. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूमीऐवजी उत्तुंग इच्छाशक्ती, आकाशाला थिटे वाटेल इतके देदीप्यमान स्वप्न असायला हवे. यासाठी फक्त स्वत:ला ओळखण्याची व मोठे ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करा. जे पुढे जातात तेच जीवनात यशस्वी होतात. हाच यशाचा मंत्र आहे. - डॉ. विशाखा भदाणे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, हरिद्वार 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Visakha Bhadane is the first woman IPS officer in Nashik district nashik marathi news