संप काळातही ऊसतोड कामगारांचे कुटुंब ट्रकने कारखान्यांकडे; संपात तोडगा निघण्याची आशा

ustod kamgar.jpg
ustod kamgar.jpg

नाशिक : (नांदगाव) ऊसतोड मजुरांच्या मागण्यांबाबत पुकारलेला संप चर्चेच्या गुऱ्हाळात अडकून पडला असून, २४ ऑक्टोबरपर्यंत त्यावर तोडगा निघण्याची अपेक्षा असली तरी राज्यव्यापी संपातील बहुतांशी ऊसतोड मजूर आपल्या कुटुंब काफिल्यासह उसाच्या फडात हळूहळू दाखल होऊ लागले आहेत. त्यासाठी साखर कारखान्यांकडील ट्रकचा वापर होत असून, पहाटे पहाटे ट्रकने पोचविले जात असल्याचे चित्र आहे. 

40 % कारखान्यांवर मजूर पोचवल्याचा प्राथमिक अंदाज

विविध भागांतील ऊस कारखान्यांना यंदाच्या गळीत हंगामातले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यंदा ट्रकमालकांचा आधार मिळाला असला तरी खटाटोप करूनही गळितासाठी लागणाऱ्या ऊसतोड मजुरांची कमतरता मात्र कायम आहे. १ ऑक्टोबरपासून राज्यात ऊसतोड कामगारांचा बेमुदत संप सुरू झाला. कोरोना काळातच हा संप सुरू झाल्याने साखर कारखानदारांनी आता थेट संप फोडण्याऐवजी वेगळी शक्कल लढविली आहे. यात ट्रकमालकांच्या मदतीने मजूर पोचविले जात आहेत. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांवर छुप्या मार्गाने संपकरी संघटनांच्या नेत्यांची नजर चुकवीत आतापर्यंत चाळीस टक्के मजूर पोचवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संपात तोडगा निघावा, यासाठी गेल्या आठवड्यात पुण्याला साखर संचालकांच्या कार्यालयात बैठकही झाली. त्यात काही मागण्यांवर चर्चा झाली असली तरी अंतिम तोडगा दृष्टिक्षेपात नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही संघटना व त्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीची तयारी सुरू आहे. मात्र तारीख निश्चित झाली नाही. 

कामगार संघटनांचे आक्रमक स्वरूप धारण

दसरा, दिवाळीच्या तोंडावर नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होते. मात्र यंदा संपामुळे या स्थलांतरावर काही प्रमाणात परिणाम जाणवू लागला आहे. बीड, नगर, जळगाव भागातील वर्षानुवर्षे ऊसतोडीला जाणाऱ्या कामगारांना यंदा ट्रकमालकांनी पोचते केले आहे. मुकादम व त्याची टोळी आपल्यापासून तुटू नये याची खबरदारी घेत ट्रकमालकांनी त्या-त्या भागातल्या मजुरांना मध्यरात्री हलविले. दर वर्षीच्या गळीत हंगामात विविध कारखान्यांकडून याबाबत केले जाणारे करार पाळण्यात येत नसल्याने ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी आक्रमक स्वरूप धारण केले आहे. ऊसतोडणी कामगारांना तोडणी दर ४०० रुपये करा, वाहतूक दर, मुकादमाच्या कमिशनमध्ये वाढ करावी, कल्याणकारी महामंडळ स्थापन करा, दरवाढीचा करार तीन वर्षांचा करावा या मागणीसाठी सीटू ऊसतोडणी कामगार संघटनेसह इतर संघटनांनी संप पुकारलेला आहे. परंतु काही कारखानदार आणि मुकादम रात्री चोरट्या मार्गाने अशाप्रकारे कामगारांना कारखान्यांवर पोचवीत असल्याची चर्चा आहे. 

कारखानदारांनी ट्रकमधून जरी ऊसतोड कामगार नेण्यासाठी शक्कल लढविली असली तरी प्रत्यक्षात गळिताची गरज भागविणारी क्रयशक्ती मिळणार नाही. जे पोचले त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. शेजारील खानदेशातील मजूर काही प्रमाणात गेले असले तरी त्यांच्या जाण्यामुळे कारखान्याचा गळीत सुरू होईलच असे नाही. - कॉम्रेड नामदेव राठोड, सीटूप्रणीत ऊसतोड कामगारांचे तालुका नेते  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com