सटाण्यात शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन; मका परत करण्याच्या निर्णयाचा होतोय विरोध 

रोशन खैरनार
Wednesday, 21 October 2020

शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेऊन या शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या आधारभूत किमतीनुसार रक्कम अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२१) बागलाण तहसील कार्यालय आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. 

नाशिक/सटाणा : राज्य शासनाने भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०१९-२० मध्ये खरेदी केलेल्या मक्याची लॉट एंट्री न झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १३४ शेतकऱ्यांचा ३६७७ क्विंटल मका त्यांना परत करण्याच्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

शासनाने हा निर्णय त्वरित मागे घेऊन या शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या आधारभूत किमतीनुसार रक्कम अदा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२१) बागलाण तहसील कार्यालय आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी मध्यस्थी करत मार्केटिंग फेडरेशनशी चर्चा आणि पत्रव्यवहार करून याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र न्याय मिळाला नाही तर येत्या ५ नोव्हेंबरपासून पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेने दिला. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

आज दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलनास सुरुवात केली. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष अहिरे, प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, अरुण अहिरे, अमोल शिरोडे, जनार्दन शिरोडे, अशोक चव्हाण, विलास चव्हाण शंकर नेरकर, दिलीप सोनवणे, पराग सूर्यवंशी, काळू काकुळते, पांडुरंग काकुळते, महारु बिरारी, शांताराम काकुळते, पंकज बिरारी, तरुण गुंजाळ आदींसह शेतकरी सहभागी होते. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers agitation in Satana nashik marathi news