'मका तर विकला, आता पैसे देता का पैसे?'...शेतकऱ्यांचा शासनाला सवाल

maize sale.jpeg
maize sale.jpeg

नाशिक : (येवला) किमान आधारभूत किंमत भरडधान्य योजनेंतर्गत मका खरेदीला दोनदा मुदतवाढ मिळूनही जिल्ह्यातील साडेतीन हजारांवर शेतकरी मका खरेदीपासून वंचित राहिले आहेत. आता खरेदी बंद झाली असून, मुदतवाढीच्या अपेक्षाही मावळल्या आहेत. शिवाय जून व जुलैमध्ये खरेदी झालेल्या मक्याचे पैसेही शासनाने दिले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास १५ कोटी रुपये अडकून पडले आहेत. 

शेतकऱ्यांचे अडकले १५ कोटी

कोरोनामुळे बाराशे रुपयांनी मका विक्रीची नामुष्की आली असताना शेतकऱ्यांना केंद्र सरकारने रब्बी हंगामातील मका खरेदीची गुड न्यूज दिली. जिल्ह्यात पहिल्यांदाच रब्बी हंगामातील खरेदीला २० मेपासून नऊ केंद्रांवर सुरवात झाली. मात्र, उद्दिष्टपूर्तीमुळे ३० जूनपूर्वीच पोर्टल बंद होऊन खरेदी थांबली होती. त्यानंतर १५ जुलैपर्यंत व पुन्हा ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली. त्यानंतर २३ ला खरेदी सुरू होऊन ३० जुलैला बंदही झाली आहे. 

निम्मे शेतकरी वंचित 

मका विक्रीसाठी जिल्ह्यात सात हजार ५२१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नावनोंदणी केली होती. यातील १५ जुलैपर्यंत तीन हजार ५७ शेतकऱ्यांची खरेदी पूर्ण झाली, तर मागील आठवडाभरात सुमारे ५०० च्या आसपास शेतकऱ्यांची खरेदी झाली असून, चार हजारांच्या आसपास शेतकरी वंचितच राहिल्याची स्थिती आहे. 

विक्रीचे पैसेही अडकले

खासगी बाजारात सरासरी एक हजार २०० रुपयांचा दर असून, शासकीय हमीभाव मात्र एक हजार ७६० रुपयांचा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु निम्म्याहून अधिक शेतकरी वंचितच राहिले. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ९६ हजार क्विंटलच्या आसपास मका खरेदी झाली. यातील फक्त ४ जूनपर्यंतच खरेदीचे शासनाकडून पैसे शेतकऱ्यांना मिळाले. त्यानंतर एकाही शेतकऱ्याला रुपयाही मिळाला नसून, उद्या दोन महिने पूर्ण होतील तरी शेतकरी प्रतीक्षेतच आहेत. या काळातील सुमारे १५ कोटी रुपये शेतकऱ्यांचे शासनाच्या तिजोरीत अडकले आहेत. 

रब्बी हंगामात मक्याचे भाव कोसळले असताना शासकीय मका खरेदीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना निश्चितच आधार मिळाला आहे. खरीप हंगामाची पिके उभी करताना गरजेइतके पीककर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. प्रशासनाने त्वरित जिल्हाभरातील मक्याचे पेमेंट अदा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. - सौ. उषाताई शिंदे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, येवला 

शासकीय मका खरेदीसाठी तालुक्‍यातील ८१० शेतकऱ्यांनी नावनोंदणी केली. यातील ५५४ शेतकऱ्यांची २९ जुलैपर्यंत मका खरेदी झाली आहे. खरेदी सुरू असताना ३० तारखेला दुपारी दोनपासून सर्व्हर अचानक बंद झाल्याने खरेदी थांबली आहे. तसेच खरेदी झालेल्या मक्याचे पैसे मिळणे बाकी आहे. - बाबा जाधव, व्यवस्थापक, खरेदी-विक्री संघ 

केंद्रनिहाय मका खरेदी..(सर्व आकडे ता. १५ जुलैपर्यंतचे) 

तालुका -- नोंदणीचे शेतकरी...खरेदीपूर्ण शेतकरी -- मका खरेदी (क्विंटल) 

सिन्नर-- १,३४७-- २७६ -- ८,१६७ 
येवला-----८५८-- ४६४ -- १६,७८१ 
चांदवड----६८६-- ४०७ -- १३,९४७ 
नांदगाव -- १२७ -- ५९ -- १,५६७ 
मालेगाव--१,५०९-- ४८४ -- १५,३१३ 
सटाणा--१,००४ -- ३०५ -- ८,०४५ 
देवळा--८११ -- ४०७ -- ९,०५१ 
लासलगाव --१,१७९-- ६०० -- १६,२२६ 
एकूण -- ७,५२१ -- ३,०५६ -- ८८,२६८  

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com