शहरात चाळीस टक्के इमारती ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या...स्वतंत्र नोटीस बजावणे गरजेचे

WADA
WADA

नाशिक : शहराचा विस्तार वाढत असताना आता जुन्या इमारतीही धोकादायक ठरत आहेत. यामुळे महापालिकेने ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आढावा घेतला असता, शहरात एक लाख ५७ हजारांहून अधिक इमारती ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या आहेत, साठपेक्षा अधिक वयोमान झालेल्या २५ हजारांहून अधिक इमारती आढळल्या आहेत.

चाळीस टक्के इमारती ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या
शहराचा विस्तार होताना इमारतींची संख्याही वाढत आहे. जुने नाशिक, पंचवटी, नाशिक रोड विभागांतील देवळालीगाव व सातपूर गावात तर मोठ्या प्रमाणात जुने वाडेही आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २६५ (अ) नुसार महापालिका हद्दीतील सर्व निवासी व अनिवासी इमारतींचे घरमालक किंवा भोगवटदारांना त्यांच्या मालकीच्या मिळकतचे सर्वेक्षण करून इमारतींचे स्ट्रक्चर सुस्थितीत आहे की नाही, याचा अहवाल महापालिकेला सादर करणे बंधनकारक आहे. महापालिकेने याबाबत नुकतीच नोटीस काढली आहे. ज्या इमारतींचे वय ३० किंवा त्यापेक्षा अधिक असेल, अशा इमारतींना स्ट्रक्चर ऑडिट बंधनकारक केले आहे. महापालिकेतर्फे फक्त नोटीस काढून कायदेशीर सोपस्कार पार पाडला जातो.

स्ट्रक्चरल ऑडिटची गरज; दीड लाखाहून अधिक मिळकतींचाही समावेश

महापालिकेनेच केलेल्या एका सर्वेक्षणात शहरात चार लाख ७९ हजार ६०० मिळकती आहेत. त्यातील एक लाख ५७ हजार ३५७ इमारती ३० वर्षांपेक्षा अधिक असून, याचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. भविष्यात शहर वाढत असताना नवीन इमारती वाढल्या, तरी जुन्या इमारतींचे प्रमाणही वाढणार असल्याने त्या धोकादायक ठरू नये, यासाठी ३० वर्षे वयोमान पूर्ण करणाऱ्या इमारतींच्या मालकांना स्वतंत्र नोटीस बजावणे गरजेचे आहे.

शहरातील इमारतींची स्थिती (वर्षात)
विभाग ६० पेक्षा अधिक वर्षे ४०-६० वर्षे १५-४० वर्षे
नाशिक रोड ४६६ २४४० ११,४७४
पंचवटी ६६७९ ६६५० २०,६२१
पूर्व १४,६४२ १२,५५३ १४,०७४
पश्चिम ६१३ १,३१८ ४,०२६
सातपूर ७६४ ४,५७५ ११,६४२
सिडको १,९३८ १,४३५ ४१,४४८
एकूण २५,१०२ २८,९७१ १,०३,२८४

धाेकादायक वाडे
नाशिक रोड १२८
पंचवटी १८०
पूर्व १८५ (काझीची गढीसह)
पश्चिम ४२५
सातपूर ७०
सिडको ४१
काझीची गढी ८३

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com