नाशिकच्या इतिहासात पहिलीच व ऐतिहासिक घटना! चौघे तरूण लष्करात झाले अधिकारी

अरुण मलाणी
Monday, 14 December 2020

एकाच वेळी नाशिकचे चार युवक लष्करात अधिकारी झाल्याची नाशिकच्या इतिहासात बहुधा ही पहिलीच व ऐतिहासिक घटना असल्‍याचे सांगितले जात आहे. 

नाशिक : डेहराडून येथील इंडियन मिलिटरी ॲकॅडमीत शनिवारी (ता. १२) झालेल्या दीक्षान्त समारंभानंतर नाशिकचे तीन युवक भारतीय लष्करात अधिकारी बनून लेफ्टनंट पदावर रुजू झाले. अनुग्रह देशमुख, ऊर्मिल टर्ले आणि शाहू काळे अशी त्यांची नावे आहेत. तसेच, नाशिकचाच रहिवासी असलेल्या उत्कर्ष दिवाने नौदलात अधिकारी बनून सबलेफ्टनंट पदावर रुजू झाला आहे. एकाच वेळी नाशिकचे चार युवक लष्करात अधिकारी झाल्याची नाशिकच्या इतिहासात बहुधा ही पहिलीच व ऐतिहासिक घटना असल्‍याचे सांगितले जात आहे. 

नाशिकच्या इतिहासात बहुधा ही पहिलीच व ऐतिहासिक घटना
अनुग्रह देशमुख नाशिक रोडचा रहिवासी असून, के. एन. केला शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक रोडच्या बिटको महाविद्यालयातून, तर अभियांत्रिकीची पदवी आर. एच. सपट महाविद्यालयातून प्रथम श्रेणीतून पूर्ण केली. त्याचे वडील श्यामराव देशमुख व्यावसायिक आहेत. आई रेवती यांचा ब्यूटिपार्लरचा व्यवसाय आहे. अनुग्रह लष्कराच्या गोरखा रेजिमेंटमध्ये दाखल होत आहे. 

अनुग्रह, ऊर्मिल, शाहू, लष्कारात अधिकारी 
ऊर्मिल टर्ले गोविंदनगरचा रहिवासी असून, न्यू एरा शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण पंचवटी महाविद्यालयातून, तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीतून झाले आहे. त्याचे वडील दत्ता टर्ले व्यावसायिक असून, आई सुवर्णा टर्ले महिंद्रा फायनान्समध्ये व्‍यवस्‍थापक आहेत. ऊर्मिल लष्कराच्या जाट रेजिमेंटमध्ये दाखल होत आहे. 
नौदल अधिकारी उत्कर्ष दिवाने सावरकरनगरचा रहिवासी असून, सिम्बायोसिस शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण आरवायके महाविद्यालयातून, तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीतून झाले. त्याचे वडील मिलिंद दिवाने आर्थिक सल्लागार असून, आई सुहासिनी दिवाने प्राध्यापिका आहेत. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ
शाहूने घेतला आजोबांचा आदर्श 
शाहू काळे हिरावाडी येथे राहणारा असून, स्वामिनारायण शाळेचा माजी विद्यार्थी आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण भोसला महाविद्यालयातून, तर पदवीचे शिक्षण नॅशनल डिफेन्स ॲकॅडमीतून झाले. त्याचे वडील संजय काळे व्यावसायिक असून, आई संध्या गृहिणी आहेत. शाहूचे आजोबा (कै.) किसनराव काळे भारतीय लष्करात सेवा देताना १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धांत सहभागी झाले होते. शाहू आपल्‍या आजोबांचा आदर्श घेत सैन्यदलात दाखल झाला असून, अधिकारी बनून लष्कराच्या ग्रेनेडिअर्स रेजिमेंटमध्ये दाखल होत आहे.  

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four young men became officers in army nashik marathi news