आदिवासी वस्तीवर गांधी जयंती; निरक्षर महिलांनी समजून घेतले महात्मा गांधी

संजीव निकम
Friday, 2 October 2020

आज सर्वत्र गांधी जयंती साजरी झाली. एरवी शाळा, महाविद्यालये किंवा शासकीय इमारतीच्या आवारात साजरे होणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कुठले ते अप्रुप... पण ज्यांच्या जीवनात चार बुकं आलीच नाहीत अशा वंचितांच्या वस्तीवर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती साजरी झाली. ​

नाशिक/नांदगाव : आज सर्वत्र गांधी जयंती साजरी झाली. एरवी शाळा, महाविद्यालये किंवा शासकीय इमारतीच्या आवारात साजरे होणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीचे कुठले ते अप्रुप... पण ज्यांच्या जीवनात चार बुकं आलीच नाहीत अशा वंचितांच्या वस्तीवर चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती साजरी झाली. 

नशिबी शिक्षण नसले तरी

नाशिक येथील औरंगाबाद रस्त्याजवळील कैलासनगरशेजारी डोंगरावर आदिवासींची झोपडीवजा वस्ती आहे. जेमतेम डोक्यावर नावाला छप्पर असणाऱ्या या वस्तीत विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या ॲड. विद्या कसबे यांनी आधार संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले आहे. शिक्षणाच्या प्रवाहात वस्तीवरील मुलांना आणून त्यांच्यासाठी ॲड. कसबे यांचीही प्रयोगशीलता सुरू आहे. बहुतांशी महिलांच्या नशिबी शिक्षण नसले तरी त्यांच्या मुलांच्या वाट्याला अक्षरओळख आली. गांधी जयंती साजरी करायची, तर फोटो नाही. फोटो उपलब्ध झाला. वस्तीवरच्या पिवळ्या फुलांच्या हार तयार करून तो अर्पण झाला. मग मुलांच्या मातांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले. त्यांच्या लाडक्या चिमुरडी मग एकेक करून गांधीबाबांवर बोलू लागली. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

महिलाच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या​

गांधी समजून घेतानाचे कुतूहल या मातांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते. आधार बहुउद्देशीय विकास संस्था यांच्याकडून भिलाटी कैलासनगर येथे आदिवासी समाजाच्या मुलांसाठी अभ्यासवर्ग चालविण्यात येतो. आज महात्मा गांधी यांची जयंती डोंगरावर साजरी झाली. शाळेमध्ये कधीही न गेलेल्या डोंगरावरील महिलाच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. आक्काबाई राजुळे व वैशाली बर्डे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन झाले. छाया आवारे यांनी प्रास्ताविक केले. शबाना मन्सुरी यांनी आभार मानले. कार्यक्रमामध्ये मुलांनी महात्मा गांधी यांच्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास वंदना पांडे, राणी सोनवणे, प्रमिला माळी, शीतल पवार, स्मिता गोटे उपस्थित होत्या. 

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

 

संपादन - रोहित कणसे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gandhi Jayanti was celebrated in tribal area nashik marathi news