प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन...पौराणिक महत्त्वासह भारतमातेच्या सेवेतील "घोरवड' गाव..एकदा वाचाच!

वाल्मिक शिरसाट : सकाळ वृत्तसेवा 
Monday, 13 July 2020

पौराणिक महत्त्व व वटवृक्षाची परंपरा लाभलेले घोरवड आपले आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व व परंपरा जतन करून ठेवण्याबरोबर देशसेवेसाठी आपले योगदान देत आहे. येथील शंकर हगवणे शहीद झाल्यानंतर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत येथील अनेक तरुण सैन्यात देशसेवा बजावत आहेत. 

नाशिक / पांढुर्ली : नाशिक जिल्ह्यामधील सर्वांत जास्त वडाच्या झाडांची संख्या असलेले एकमेव ठिकाण म्हणजे घोरवड. या गावाला मिळालेली निसर्गदत्त देणगी म्हणले वड आणि ही देणगी लाभल्याने गावाचे नाव "घोरवड' असल्याचे सांगण्यात आले. पौराणिक महत्त्व व वटवृक्षाची परंपरा लाभलेले घोरवड आपले आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्व व परंपरा जतन करून ठेवण्याबरोबर देशसेवेसाठी आपले योगदान देत आहे. येथील शंकर हगवणे शहीद झाल्यानंतर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत येथील अनेक तरुण सैन्यात देशसेवा बजावत आहेत. 

प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन जिल्ह्यातील सर्वाधिक वडांचे गाव
सह्याद्रीच्या पर्वतरांगेत व सिन्नर-घोटी महामार्गावर वसलेले घोरवड प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. पौराणिक काळात नाशिकच्या पंचवटीतून सीतेचे रावणाकडून हरण झाल्यानंतर याच मार्गाने लंकेकडे जात असताना जटायू व रावण यांच्यात घनघोर युद्धाला येथेच सुरवात झाली होती. याच ठिकाणी रावणाने जटायूचे पंख छाटले होते. येथूनच घायाळ अवस्थेत जटायू फरफटत श्रीक्षेत्र टाकेद या ठिकाणी पोचला. यानंतर सीतेच्या शोधार्थ जात असलेले प्रभू राम व लक्ष्मण यांना सीतेचा मार्ग दाखविल्यानंतर मोक्षासाठी प्रभू रामचंद्रांनी सर्व तीर्थांना आमंत्रित केले. परंतु तीर्थांचा राजा प्रयागराज घोरवड येथे मुक्कामाला थांबला. मी गेल्याशिवाय जटायूला मोक्ष मिळणार नाही या आविर्भावात थांबून राहिल्याने अखेर श्रीरामाने श्रीक्षेत्र टाकेद येथे बाण मारून पाणी काढत जटायूला मोक्ष दिला व प्रयागराज तीर्थाचे गर्वहरण करून त्यास घोरवडलाच थांबण्याचा शाप दिला. त्यामुळे घोरवड येथे हे तीर्थराज असल्याची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. 

पौराणिक महत्त्वासह भारतमातेच्या सेवेतील गाव 
घोरवडची लोकसंख्या एक हजार 695. श्रीक्षेत्र प्रयागतीर्थ ही या गावाची खरी ओळख आहे. या गावात त्या काळी वडाच्या झाडांचे घनदाट जंगल होते. नाथपंथीय साधू, गुरुवर्य योगिनाथ बुदनाथजी महाराजांनी निसर्गरम्य व दाट वटवृक्षांच्या सान्निध्यात असलेल्या तीर्थराज प्रयागतीर्थावर ध्यानसाधना करून ग्रामस्थांना आध्यात्मिक व धार्मिकतेची गोडी लावली. त्यामुळे त्यांचे गावात व पंचक्रोशीत तसेच जिल्हाभर शिष्य आहेत. त्यांच्या निर्वाणानंतर याच ठिकाणी त्यांचे समाधी मंदिर गावाने उभारून धार्मिक अधिष्ठानाची परंपरा जोपासत आहेत. आजही या गावात सुमारे दोनशे वटवृक्ष आहेत. गावात निवृत्ती महाराज हगवणे व त्यांच्या सूनबाई गीताताई सोमनाथ हगवणे यांनी वारकरी सांप्रदायाची पताका फडकवत ठेवली आहे. निवृत्ती महाराज संगीत विशारद असल्याने अनेक वर्षांपासून टाळ, मृदंग, पखवाज व हार्मोनिअमचे शिक्षण मुला-मुलींना देतात, तर गीताताई हगवणे कीर्तन व प्रवचनातून प्रबोधानाचे कार्य करीत आहेत. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

विकासाकडे वाटचाल 
ग्रामपंचायतीने शासकीय निधी व लोकसहभागातून अनेक विकासाच्या योजना मार्गी लावल्या आहेत. घोरवड घाटातील वनहद्दीत बंधारा, प्रयाग नदीचे खोलीकरण करून शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये लोकसहभागातून माती टाकून शेती सुजलाम सुफलाम करण्याचे काम सरपंच रमेश हगवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. एक झाड लेकीचे यांसारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामुळे हजारो झाडांचे रोपण केले आहे. गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेरे, कॉंक्रिट रस्ते, महिलांसाठी सुरक्षित एनसी क्‍लिनिक, एटीएम वॉटर, भूमिगत गटारी, सभामंडप, व्यायामशाळा, स्मशानभूमी, प्रयागतीर्थावर भक्तनिवास आदी विकासाच्या योजना ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी योगेश चित्ते, तसेच उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. 
 

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे.. 

प्राचीन वटवृक्ष असलेले घोरवड जिल्ह्यातील एकमेव ठिकाण आहे. गावात शहीद शंकर हगवणे यांचे स्मारक असून, या आदर्शामुळे 30 तरुण देशाची सेवा करत आहेत. अनेक विकासाच्या योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या आहेत. यासाठी सर्व ग्रामस्थ सहकार्य करतात. -रमेश हगवणे, सरपंच, घोरवड 

रिपोर्टर - वाल्मिक शिरसाट

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ghorwad village with mythological significance nashik marathi news