केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून ‘ट्रेड वॉर’ला मोठी चपराक! द्राक्ष निर्यातदार अन्‌ पॅकहाउसचे निलंबन रद्द 

महेंद्र महाजन
Thursday, 29 October 2020

रशियात ४१ कंटेनरमधील द्राक्षांमध्ये कीड सापडल्याने निर्यातदार कंपन्या आणि १४ पॅकहाउसचे निलंबन करण्यात आले होते. त्यामागे ‘ट्रेड वॉर’चा संशय व्यक्त करण्यात आला होता. अखेर बुधवारी (ता. २८) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने या संशयाला चपराक देत द्राक्ष निर्यातदार आणि पॅकहाउसचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक : रशियात ४१ कंटेनरमधील द्राक्षांमध्ये कीड सापडल्याने निर्यातदार कंपन्या आणि १४ पॅकहाउसचे निलंबन करण्यात आले होते. त्यामागे ‘ट्रेड वॉर’चा संशय व्यक्त करण्यात आला होता. अखेर बुधवारी (ता. २८) केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने या संशयाला चपराक देत द्राक्ष निर्यातदार आणि पॅकहाउसचे निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 

द्राक्ष निर्यातदार आणि पॅकहाउसचे निलंबन रद्द
द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, संचालक मधुकर क्षीरसागर, निर्यातदार परेश भयानी यांनी नवी दिल्लीत खासदार डॉ. भारती पवार यांच्यासमवेत केंद्रीय कृषी मंत्रालय गाठले. डॉ. पवार यांच्या पुढाकारामुळे निलंबन रद्द झाल्याचे श्री. क्षीरसागर यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले. दरम्यान, २०१९-२० मध्ये रशियात दीड हजार कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यांपैकी ४१ कंटेनरमध्ये कीड सापडली. रशियाच्या क्वारंटाइन विभागाने भारतीय प्लांट क्वारंटाइन विभागाला कळविले. त्यानंतर १४ निर्यातदारांचे आणि पॅकहाउस परवाने निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात आढळत नसलेली कीड कंटेनरमध्ये आढळली कशी, असा प्रश्‍न निर्यातदारांना पडला होता. यासंबंधाने झालेल्या चौकशीत प्रश्‍नावलीला निर्यातदारांनी उत्तर दिले होते. 

काळजी घेण्याची सूचना
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसंचालक डॉ. पी. एस. नैन यांनी निलंबन रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्याची प्रत  क्षीरसागर, मुंबईचे अधिकारी, ‘अपेडा’चे अध्यक्ष यांना देण्यात आली आहे. रशियासाठी ‘टेबल ग्रेप्स’ निर्यात करताना भविष्यात अडचणी येणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना मंत्रालयाने निर्यातदार आणि पॅकहाउस चालकांना देण्यात आली आहे. तसेच कंटेनर समाधानकारक परिस्थितीत आयात होणाऱ्या देशापर्यंत पोचतील याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. फायटो सॅनिटरी प्रक्रियेकडे ध्यान देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

पॅकहाउसचा प्रश्‍न निकाली 
पॅकहाउसचा उपयोग हंगामानंतर द्राक्षांखेरीज इतर फलोत्पादन क्षेत्रासाठी करण्याचा प्रश्‍न केंद्रीय मंत्रालयाच्या निर्णयानंतर मार्गी लागला आहे. पण रशियातून द्राक्ष निर्यातीमध्ये अडचण येण्याची ही पहिली वेळ नाही. रशियामध्ये द्राक्षांची निर्यात वाढत आहे. गेल्या वर्षी द्राक्षांचे कंटेनर रशियामध्ये अडकविण्यात आले होते. या वेळी ४१ कंटेनर परत पाठविण्यात आले होते. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grape exporter and packhouse suspended nashik marathi news