खुशखबर! दमदार पावसाने ४५ हजार शेतमजुरांची रोजीरोटी पक्की; विस्कटलेली शेती अर्थव्यवस्था येणार पूर्वपदावर

farmer 3.jpg
farmer 3.jpg

नाशिक / मालेगाव : तालुक्यासह कसमादेत पावसाच्या धुवाधार बॅटिंगने जलसाठे ओव्हरफ्लो केले आहेत. तलाव, पाझर तलाव, नाले, धरणे, विहिरी भरल्याने आगामी रब्बी हंगामावर आताच शिक्कामोर्तब झाले आहे. रब्बीची शेतशिवारे फुलणार असल्याने कसमादेतील ४५ हजार शेतमजुरांचा आगामी सात ते आठ महिन्यांचा रोजीरोटीचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे. २५ वर्षांनंतर सलग दुसऱ्या वर्षी रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. यातून शेती अर्थव्यवस्था ऊर्जितावस्थेत येण्यास मदत होईल. 

२५ वर्षांनंतर सलग दुसऱ्या वर्षी रब्बीचे क्षेत्र वाढणार 
मालेगाव तालुक्यावर यंदा पाऊस खूपच मेहरबान आहे. कसमादेमध्ये आतापर्यंत १४३ टक्के पावसाची सरासरी गाठणारा मालेगाव हा पहिला तालुका ठरला आहे. देवळ्यात १०५, नांदगावमध्ये १२७, तर बागलाणमध्ये १४० टक्के पाऊस झाला आहे. चांदवडमध्ये ८३, तर कळवणमध्ये पावसाची सरासरी ८५ टक्के आहे. दमदार पावसामुळे खरिपाच्या उत्पन्नाची शाश्‍वती वाढली आहे. काही ठिकाणी वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. सर्वत्र जलसाठे भरले आहेत. विशेष म्हणजे रब्बी हंगामाचे मुख्य स्रोत असलेल्या शेतमळ्यातील विहिरी ओव्हरफ्लो झाल्या आहेत. विहिरींना पाणी असल्याने उन्हाळ कांद्याची धूम पुन्हा दिसून येईल. 

विस्कटलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर
खरीप हंगामातील पिके काढण्याची लगबग सुरू असल्याने शेतमजुरांना मोठी मागणी आहे. हे काम जवळपास दोन महिने सुरू राहील. दिवाळीच्या सुमारास रब्बीची पेरणी सुरू होईल. त्याचबरोबर उन्हाळ कांदालागवडीला सुरवात होईल. त्यामुळे शेतमजुरांना एप्रिलअखेरपर्यंत मुबलक काम मिळणार आहे. फळ पिकांबरोबरच भाजीपाल्याचे क्षेत्रही वाढणार आहे. एकूणच समाधानकारक पावसाने शेतमजुरांचा रोजीरोटीचा प्रश्‍न सोडविला आहे. शेतशिवारे फुलली तरच कोरोनामुळे कसमादेतील विस्कटलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ शकेल. त्यासाठी जलसाठे भरणे ही चांगली बाब मानली जात आहे. 

शेतमजुरांचा भाव वधारणार 
रब्बीचे क्षेत्र वाढणार असल्याने शेतकऱ्यांना मजूरटंचाई भासणार आहे. सध्या महिलांना दोनशे, तर पुरुषांना तीनशे रुपये रोज दिला जातो. बाजरी व मका कापणी तसेच कांदालागवडीचे काम बहुतांशी मजूर रोजाने करण्यास धजावत नाहीत. मक्ता पद्धतीने ही कामे केली जातात. कसमादेतील बहुतांशी भागात मजुरांना ने-आणसाठी शेतकऱ्यांना वाहनांची व्यवस्था करावी लागते. खरीप व रब्बीचे उत्पन्न किती येईल याची शाश्‍वती नसली तरी शेतमजुरांचा भाव मात्र वधारणार आहे.  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com