हिसवळचा वळण रस्ता ठरतोय ‘ब्लॅक स्पॉट’; वर्षभरात वीसहून अधिक अपघाती मृत्यू

accident12.jpg
accident12.jpg

नांदगाव : नाशिक येथून आठ किलोमीटरवरील हिसवळ बुद्रुक नजीकचा वळण रस्ता आता वाहतुकीसाठी ‘ब्लॅक स्पॉट’ ठरला आहे. रस्त्याचा दर्जा राखतांना धोकादायक वळणावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कुठल्याही प्रकारची सतर्कता बाळगली नसल्याने याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत वीस जणांचा मृत्यू याठिकाणी झाला आहे. अपघातप्रवण क्षेत्र असूनही बांधकाम विभागाने येथे ना गतिरोधक टाकले ना दिशादर्शक फलक. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनचालकांचा रोष वाढतच आहे. 

धोकादायक वळण वाहनचालकांच्या जिवावर 

गेल्या वर्षभरातील पोलिस दप्तरातील अपघाताच्या नोंदीवर नजर टाकली, तरी या ‘ब्लॅक स्पॉट’च्या दाहकतेची कल्पना यावी. मनमाड-नांदगावदरम्यान हा चोवीस किलोमोटरचा राज्य रस्ता असून, त्याला राष्ट्रीय महामार्गाचा अलीकडच्या काळात दर्जा मिळाला आहे. मात्र, जळगाव-चांदवडदरम्यानच्या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पीय आराखड्यात मान्यता मिळाल्या नंतरही रुंदीकरणासह अन्य कामे रेंगाळलेली आहेत. जळगावपासून निघालेला राष्ट्रीय महामार्ग नांदगाव शहराबाहेर मातोश्री मंगल कार्यालया पर्यंत तयार करण्यात आला आहे. येथून पुढील रस्ता डांबरीकरणाचा आहे. याच रस्त्यावरील हिसवळ गावाजवळील धोकादायक वळण वाहनचालकांच्या जिवावर बेतणारे ठरले आहे. 

वर्षभरात वीसहून अधिक जणांचा मृत्यू

नाशिक-मुंबई -शिर्डी -पुणे-देवळा अशी या रस्त्याच्या दळणवळणाची कनेक्टिव्हिटी आहे. त्यातच पानेवाडी इंधन प्रकल्पातून वाहतूक करणाऱ्या टँकरवर वेळेच्या आत पोचण्याचे बंधन असल्याने टँकरचालक अतिशय बेदरकारपणाने वाहने चालवतात. दोन दिवसांपूर्वी डॉक्टरवाडी येथील दोघा दुचाकीस्वारांना टँकरने दिलेल्या धडकेत महिनाभरावर विवाह ठरलेल्या तरुणाचा हकनाक बळी गेला. या रस्त्यावर वर्षभरात वीसहून अधिक जणांचा मृत्यू तर चाळीसच्या आसपास जायबंदी झाले. या अपघातांना हा वळणरस्ता कारणीभूत ठरतोय. 

मनमाड-नांदगावदरम्यान कुठलीही कालबद्ध उपाययोजना नाही

नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या संभाव्य रुंदीकरणासाठी तर जाणूनबुजून या वळणरस्त्याला ‘जैसे थे’ स्थितीत ,तर ठेवले जात नाही ना? असा प्रश्‍न बाजार समितीचे संचालक राजाभाऊ देशमुख यांनी उपस्थित केला आहे. अपघातप्रवण क्षेत्र ठरविताना रस्त्यांचे परीक्षण करून अशी धोकादायक वळण रस्ते काढून घेण्याबाबतचे निर्देश असतात. सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे प्राधान्यक्रम ठरविले जातात. मात्र, मनमाड-नांदगावदरम्यान अशा प्रकारे कुठलीही कालबद्ध उपाययोजना दिली गेली नाही. 

‘ब्लॅक स्पॉट’ ठरला काळ... 

फेब्रुवारीत बोहल्यावर चढण्याचे स्वप्न बघणाऱ्या व ऊसतोड कामगार असलेल्या जनार्दनवर शुक्रवारी सायंकाळी हिसवळ बुद्रुक वळणावर काळाने घातला. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलणारा  काकांच्या दशक्रियेसाठी आलेला जनार्दन निफाड साखर कारखान्यावर कामाला जात असताना हा अपघात झाला. आई, दोन बहिणी व भाऊ व कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दुचाकीवरील मावसभाऊ अंकुश डोळे या  घटनेत जायबंदी झाला.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com