उत्तर महाराष्ट्रासाठी वाढीव 332 कोटी!

उत्तर महाराष्ट्रासाठी वाढीव 332 कोटी!.jpg
उत्तर महाराष्ट्रासाठी वाढीव 332 कोटी!.jpg

नाशिक : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत उत्तर महाराष्ट्रासाठी 2020-21 साठी 332 कोटींच्या वाढीव तरतुदींसह एक हजार 580 कोटींच्या प्रारूप आराखड्याला शुक्रवारी (ता. 31) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आराखड्यासाठी एक हजार 247 कोटी 82 लाखांची मर्यादा ठेवण्यात आली होती. 

आर्थिक मर्यादा आणि प्रत्यक्ष मंजूर करण्यात आलेला आराखडा कोटी रुपयांमध्ये अनुक्रमे (कंसात जिल्ह्याला मिळालेला वाढीव निधी रुपयांमध्ये) 

नाशिक- 348.86-425 (76 कोटी 14 लाख), नंदुरबार- 69.57-115 कोटी (45 कोटी 43 लाख), धुळे- 147.28-190 (42 कोटी 72 लाख), जळगाव- 300.72-375 (74 कोटी 28 लाख), नगर- 381.39-475 (93 कोटी 61 लाख). दरम्यान, शाळा खोल्या बांधकामासाठी मनरेगा आणि सीएसआरमधून उपलब्ध करून द्यावा. मतदारसंघात 2515 लेखाशीर्षांतर्गत प्राप्त निधीच्या 20 टक्के निधी शाळाखोली बांधकाम अथवा दुरुस्तीसाठी वापरावा. 

शहर-ग्रामीण पोलिसांसाठी आवश्‍यकतेनुसार एक कोटीचा निधी देण्यात यावा

नाशिक जिल्ह्याच्या धर्तीवर राज्यातील इतर शहरांत पोलिसांना किमान एक कॅमेरा बसविलेले वाहन घेण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि शहर-ग्रामीण पोलिसांसाठी आवश्‍यकतेनुसार एक कोटीचा निधी देण्यात यावा, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले. बैठकीसाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त राजाराम माने, नियोजन विभागाचे सहसंचालक एस. एल. पाटील, नाशिक विभागाचे उपायुक्त प्रदीप पोतदार आदींसह नगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील आमदार उपस्थित होते. 

वाढीव निधीची कारणे 

जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि त्या जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक या निकषानुसार उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना श्री. पवार यांनी वाढीव निधी मंजूर केला. राज्याच्या अर्थसंकल्पात उत्तर महाराष्ट्राला जिल्हानिहाय मान्यता मिळालेल्या 
वाढीव निधीला मंजुरी मिळेल. तसेच निधी खर्चाबाबत सूत्र निश्‍चित करण्यात आले. भाजप सरकारच्या काळात रखडलेल्या कामांना महाविकास आघाडी सरकारने गती देण्यास प्राधान्य दिले. 

जिल्हानिहाय ठळक निर्णय 
नाशिक - 
150 वर्षेपूर्तीसाठी 25 कोटींचा प्रस्ताव, क्रीडा विकासासाठी "साई' केंद्राचा प्रस्ताव,
रखडलेल्या कलाग्रामसाठी दोन टप्प्यांत निधी, अंजनेरीला साहसी खेळांचे प्रशिक्षण केंद्र होणार 

धुळे -
रस्तेविकासासाठी 32 कोटी, रुग्णालयाच्या एमआयआरसाठी निधी, महिला रुग्णालयासाठी तीन कोटी, वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी वेगळा निधी 

जळगाव - 
एक हजार गावांत पाणंद रस्तेविकास, पाणंद रस्ते जलसंधारण सीएसआरची म्हणून घेणार, केळी, कापूस उत्पादकांच्या अडचणींवर बैठक, मनरेगाचा निधी वर्गखोल्यांसाठी 

नंदुरबार - 
वैद्यकीय महाविद्यालयाला तीन कोटी, अद्ययावत पोलिस वाहनांसाठी एक कोटी, 
डोंगराळ भागात पूरबाधित रस्त्यांसाठी निधी, जमीन सपाटीकरणाच्या कामासाठी निधी 

नगर -
विश्रामगृहासाठी 10 कोटी, सदाशिव अमरापूरकर नाट्यगृहाला पाच कोटी, 
सीएसआरमधून सीना नदीचे सौंदर्यीकरण, ऐतिहासिक स्थळ विकासासाठी 10 कोटी 

रखडलेले विषय मार्गी लागतील

नाशिकला वाढीव निधी मिळाल्याने भाजप सरकारच्या कार्यकाळात रखडलेले कलाग्राम, बोटिंग क्‍लब, इगतपुरीचे हिल स्टेशन, अंजनेरी येथील ट्रेकिंग सेंटर ही कामे मार्गी लागतील. आदिवासी उपयोजनांचा निधी मिळणार आहे. त्यामुळे लघुपाटबंधारे आणि ग्रामीण विकास योजनेतील शाळा इमारतीचे विषय मार्गी लागणार आहेत.-छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक 

वाहन खरेदीची सहा लाखांची मर्यादा उठवली

धुळ्याला वाढीव निधी मिळाल्याने धुळे रुग्णालयासाठी एमआयआर मशिन उपलब्ध होईल. महिला रुग्णालयासाठी तीन कोटी 65 लाखांची मंजुरी मिळाली आहे. तसेच, साक्रीतील अतिवृष्टीने बाधितांच्या भरपाईचा विषय मार्गी लागेल. शिवाय डोंगराळ भागातील वाहन खरेदीची सहा लाखांची मर्यादा उठवली आहे. - अब्दुल सत्तार, पालकमंत्री, धुळे 

जमिनी सपाटीकरण, सिंचनाची कामे यावर लक्ष देता येणार 

नंदुरबारला वाढीव निधी मिळाल्याने अतिवृष्टीने वाहून गेलेल्या डोंगराळ भागातील रस्त्यांची कामे होतील. आदिवासी विकास विभाग आणि सर्वसाधारण योजना यातील एकसारख्या 15 योजनांमध्ये सुसूत्रता आणली जाणार आहे. 15 योजना राज्याकडे वर्ग केल्याने त्याचा जिल्ह्यासाठी लाभ होणार आहे. जमिनी सपाटीकरण, सिंचनाची कामे यावर लक्ष देता येणार आहे. - के. सी. पाडवी, पालकमंत्री, नंदुरबार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com