'ग्रेटा थनबर्ग' नाशिकमध्ये विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनासाठी येणार? 

अरुण मलाणी
Monday, 8 February 2021

 मूळची स्विडन येथील रहिवासी मानवतावादी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हीला विद्रोही मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या उद्‌घाटक म्‍हणून बोलविण्याचा निर्धार केला आहे.

नाशिक : मूळची स्विडन येथील रहिवासी मानवतावादी पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हीला विद्रोही मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या उद्‌घाटक म्‍हणून बोलविण्याचा निर्धार केला आहे.

ग्रेटावर दिल्‍ली पोलिसांनी केला गुन्‍हा दाखल

रविवारी (ता. ७) हुतात्‍मा स्‍मारकात संविधान सन्मानार्थ सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्‍या नियोजनासाठी झालेल्‍या बैठकीत याबाबत चर्चा झाली. ग्रेटाने दिल्‍ली परिसरात सुरू असलेल्‍या शेतकरी आंदोलनास सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला असून, भावना भडकविण्याचे कारण देत तिच्‍यावर दिल्‍ली पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. 

हेही वाचा- रस्त्यावर फेकलेली 'नकोशी' झाली 'हवीशी'! नुकत्याच जन्मलेल्या शकुंतलाला मिळाले आई-बाबा

साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमनेसामने उभे ठाकण्याचा निर्धार
नाशिकमध्ये होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजित समित्यांबाबत चर्चा केली. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या तारखांच्याच दिवशी हे संमेलन घेऊन प्रस्थापितांसमोर वैचारिक आणि सांस्कृतिक लढा देणे आणि संविधानाच्या सन्मानार्थ व बाबूराव बागूल, लोकशाहीर वामनदादा कर्डक, दादासाहेब गायकवाड, अरुण काळे आदी साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमनेसामने उभे ठाकण्याचा निर्धारही या वेळी केला. 

विहितगाव येथून मशाल ज्योत
येत्‍या रविवारी (ता. १४) विद्रोही साहित्‍य संमेलनाच्‍या कार्यालयाचे उद्‌घाटन व विविध समित्‍या, ठरावांबाबत चर्चा केली जाणार आहे. एक मूठ धान्य, एक रुपया संकल्पनेवर आधारित निधी संकलनासाठी २० ते २५ मार्चदरम्‍यान बाबूराव बागूल यांच्या स्मृतिदिनानिमित्त सप्ताह राबविला जाणार आहे. यात त्यांच्या निवासस्थान असलेल्या विहितगाव येथून मशाल ज्योत काढून संमेलनाचे दीपप्रज्वलन त्याच मशालीने करण्याचा निर्णय झाला. बैठकीस अश्पाक कुरेशी, सदाशिव गनगे, अर्जुन बागूल, विजया दुर्धवळे, राजेंद्र जाधव, नीलेश सोनवणे, वामनदादा गायकवाड, रवींद्र पगारे, ताराचंद मोतमल, दीपाली वाघ आदी उपस्थित होते.  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच
बैठकीस प्रा. प्रतिमा परदेशी, गणेश उन्हवणे, किशोर ढमाले, राजू देसले, नितीन रोठे-पाटील, मन्साराम पवार, प्रभाकर धात्रक, चंद्रकांत भालेराव, व्ही. टी. जाधव, सुभाष काकुस्ते आदी उपस्‍थित होते. या वेळी संमेलनाचे नियोजन आणि भूमिकेबाबत उपस्‍थितांनी मार्गदर्शन केले. सुरवातीस रमाई यांच्‍या जयंतीनिमित्त अभिवादन केले. नंतर प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Invitation to Greta for inauguration of Literature Conference nashik marathi news