'आयटीआय'ला प्रवेश घ्यायचाय?...मग ही बातमी तुमच्यासाठी

अरुण मलाणी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

प्रत्‍येक फेरीत निवड झालेल्‍या उमेदवारांना निवडपत्र (अलॉटमेंट लेटर) ऑनलाइन उपलब्‍ध करून दिले जातील. यासाठी उमेदवारांनी आपल्‍या अकाउंट लॉगइनवरून निवडपत्राची प्रत काढून घ्यावी. निवड झालेल्‍या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी दिलेल्‍या वेळापत्रकानुसार उपस्‍थित राहावे, असे स्‍पष्ट करण्यात आले आहे. 

नाशिक : दहावीचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था (आयटीआय) मध्ये प्रवेशाकरिता वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे वेळापत्रक जारी केले असून, ऑनलाइन स्‍वरूपात अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवार (ता. १) आजपासून सुरू झाले. इच्‍छुक पात्र उमेदवारांना शासकीय व खासगी आयटीआयमध्ये प्रवेशासाठी १४ ऑगस्‍टपर्यंत अर्ज सादर करता येतील. 

उमेदवारांना निवडपत्र (अलॉटमेंट लेटर) ऑनलाइन

प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया सप्‍टेंबरअखेरपर्यंत पार पडेल. प्रवेश अर्जाकरिता अराखीव प्रवर्गातील उमेदवारास दीडशे रुपये, राखीव प्रवर्गातील उमेदवारास शंभर रुपये, राज्‍याबाहेरील उमेदवार तीनशे, तर अनिवासी भारतीय उमेदवारास पाचशे रुपये शुल्‍क असेल. अर्ज भरल्‍यानंतर प्रवेश अर्ज शुल्‍क भरलेल्‍या उमेदवारांचाच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाईल. उमेदवाराने एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्‍त अर्ज भरल्‍यास अशा उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील व निवड झालेल्‍यास किंवा प्रवेश दिला गेल्‍यास त्‍याचा प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रत्‍येक फेरीत निवड झालेल्‍या उमेदवारांना निवडपत्र (अलॉटमेंट लेटर) ऑनलाइन उपलब्‍ध करून दिले जातील. यासाठी उमेदवारांनी आपल्‍या अकाउंट लॉगइनवरून निवडपत्राची प्रत काढून घ्यावी. निवड झालेल्‍या आयटीआयमध्ये प्रवेशासाठी दिलेल्‍या वेळापत्रकानुसार उपस्‍थित राहावे, असे स्‍पष्ट करण्यात आले आहे. 

आयटीआय प्रवेशाची प्रक्रिया (पहिल्‍या फेरीअखेरपर्यंत) 

ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची मुदत १ ते १४ ऑगस्‍ट 
पहिल्‍या फेरीसाठी आयटीआय विकल्‍प व प्राधान्‍य सादर करणे २ ते १४ ऑगस्‍ट 
प्राथमिक गुणवत्तायादी प्रसिद्ध करणे १६ ऑगस्‍ट, ११ वाजता 
गुणवत्तायादीबाबत हरकती, प्रवेश अर्जातील बदल १६, १७ ऑगस्‍ट 
अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध होणार १८ ऑगस्‍ट 
पहिल्‍या फेरीसाठी निवडयादी प्रसिद्ध होणार २० ऑगस्‍ट 
निवड झालेल्‍या उमेदवारांची पडताळणी व प्रवेश कार्यवाही २१ ते २६ ऑगस्‍ट 
खासगी आयटीआयमधील संस्‍थास्‍तरावरील प्रवेश १६ ऑगस्‍टपासून 

हेही वाचा > रात्री दोघांचीही खड्ड्यात मरणाशी झुंज...मदतीची वाट बघतच तळमळत सोडला प्राण

पुढील फेऱ्यांची प्रक्रिया अशी 

दुसऱ्या फेरीसाठी व्‍यवसाय व संस्‍थानिहाय विकल्‍प व प्राधान्‍य सादर करण्यासाठी २१ ते २७ ऑगस्‍ट मुदत असेल. निवडयादी ३० ऑगस्‍टला जाहीर केली जाणार असून, प्रवेशासाठी ३ सप्‍टेंबरपर्यंत संधी असेल. तिसऱ्या फेरीसाठी ३ ते ४ सप्‍टेंबरदरम्‍यान पर्याय नोंदविता येणार असून, निवडयादी ७ सप्‍टेंबरला जारी केला जाईल. प्रवेशासाठी ८ ते ११ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असेल. 

हेही वाचा > अमानुष! रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ITI admission process from today; The deadline for online application is 14 nashik marathi news