कोजागिरीनिमित्त आदिमायेची कावडयात्रा रद्द; तृतीयपंथीय छबिना मिरवणूकीसाठी आग्रही 

chabina.jpg
chabina.jpg

वणी (नाशिक) : स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर शनिवारी (ता. ३०) होणारी देशातील प्रमुख कावड यात्रेपैकी एक व राज्यातील सर्वांत मोठी कावडयात्रा व देशभरातील तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूकही नवरात्रोत्सवाप्रमाणेच कोविड-१९ संसर्गजन्य परिस्थितीमुळे रद्द झाल्याने शेकडो वर्षांपासून विविध तीर्थक्षेत्रांवरून कावडीद्वारे आणलेल्या तीर्थाच्या (जल) आदिमायेस जलाभिषकाची परंपरा खंडित होणार आहे. 

गडावरील आदिमायेची कावडयात्रा रद्द 
आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची उत्साहात सांगता झाल्यानंतर भाविकांना कावडयात्रेची आस लागलेली असते. सप्तशृंगगडावर चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव याप्रमाणेच कोजागरी पौर्णिमा उत्सव (कावडयात्रा) होतो. चैत्रोत्सवापाठोपाठ या यात्रेतही पदयात्रेने येणाऱ्या भाविकांची संख्या दोन ते तीन लाखांपर्यंत असते. राज्यासह मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधील हजारो कावडीधारक विविध नद्यांचे पवित्र जल (तीर्थ), त्यात हजार कावडीधारक पुणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोदा या ठिकाणांहून तापीचे, ओंकारेश्वर, इंदूर येथून नर्मदेचे, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ आदी ठिकाणांहून चारशे ते सहाशे किलोमीटर अंतर अनवाणी प्रवास करून गडावर येतात. यात नाशिक जिल्ह्यातील पन्नास हजारांवर कावडीधारकही भीमाशंकर, पुणे, त्र्यंबकेश्वर, पंचवटी आदी ठिकाणांहून जल घेऊन कावडयात्रेत सहभागी होतात. 

तृतीयपंथीय छबिना मिरवणूक साध्या स्वरूपात काढण्यासाठी आग्रही
तसेच कावडयात्रेत सामान्य भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या सप्तशृंगगडावरील तृतीयपंथीयांच्या छबिना मिरवणुकीसाठी देशभरातून तृतीयपंथीयांचे विविध ठिकाणचे गट गडावर दाखल होतात. यात सखाराम गुरूंचा सत्तर वर्षांपासून गडावर येणाऱ्या गट प्रमुख असलेले तृतीयपंथीय आखाड्याचे महामंडलेश्वर पायलजी नंदगिरी यांच्यासह भास्कर गुरूंच्या गटाचा प्रमुख सहभाग असतो. या छबिना उत्सवात सहभागी होण्यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंसह हजारो शिष्य वर्गांसह लाखोंच्या संख्येने सर्वसामान्य भाविक गडावर हजेरी लावतात. या सोहळ्यासही प्रशासनाकडून निर्बंध असले तरी तृतीयपंथीय गटाकडून चैत्र व नवरात्रोत्सव असलेल्या विविध धार्मिक विधी परंपरा ज्याप्रमाणे पार पाडल्या त्या पद्धतीनेच तृतीयपंथीयांच्या देवदेवतांची आदिमायेस परपंरेनुसार कोजागरीस होणारी भेट, धार्मिक विधी साध्या पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून परवानगी मिळावी यासाठी आग्रही आहेत. कोणत्याही परिस्थितीत परंपरेनुसार विधी पार पाडण्याबाबतची भूमिका तृतीयपंथीय प्रमुखांनी घेतली आहे. 

कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे रद्द 
सप्तशृंगगडावर येणाऱ्या कावडीधारक व पदयात्रेकरूंना विसावा, पिण्याचे पाणी व फराळ वाटपाबरोबरच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक ते वणी, मालेगाव, पिंपळनेर, सटाणा, कळवण या रस्त्यांवर अनेक स्वयंसेवी संस्था व दानशूर भाविक कावडीधारकांना विविध सेवा देतात. मात्र गडावरील वर्षभरातील तिसरा प्रमुख उत्सव असलेला कावडयात्रा अर्थात कोजागरी पौर्णिमा उत्सवही कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे प्रशासनाने रद्द केला आहे. 


सखाराम गुरुजींनी गेल्या सत्तर वर्षांपासून कोजागरी पौर्णिमेस छबिना मिरवणूक व इतर धार्मिक विधी परंपरेनुसार पार पाडली जात आहे. त्यामुळे आम्ही परंपरेनुसार कोविड संदर्भातील नियमावलींचे पालन करून विधी व छबिना मिरवणूक साध्या पद्धतीने करणारच आहोत. -महामंडलेश्वर पायल नंदगिरी, अखिल भारतीय किन्न, आखाडा 
 

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com