प्राप्तिकर कलम 80 अभावी जग सुनासुना!

income tax.jpg
income tax.jpg

नाशिक : प्राप्तिकर दात्यांसाठी नेहमी अवघड वाटणारे आणि धडकी भरविणारे करविवरणपत्र सोपे करण्याची मागणी गेली अनेक वर्षे सरकारकडे केली जात होती. 
त्यासाठी योग्य दिशेने पाऊल उचलण्याची सरकारने आज जोरदार घोषणा केली. परंतु, त्यात संदिग्धता ठेवली आणि अर्थसंकल्प संपताच त्याचा खुलासा करण्याची 
वेळ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर आली. 

सोप्याऐवजी अवघड आणि गोंधळात गोंधळ

प्राप्तिकराचे नवीन दर स्वीकारणाऱ्यांना 80 सी आणि 80 डी, घरभाडे भत्ता, तसेच गृहकर्जावरील व्याजावर मिळणारी करसवलत, 50 हजार रुपयांची प्रमाणित वजावट (स्टॅन्डर्ड डिडक्‍शन) आदींवर पाणी सोडावे लागणार आहे. प्राप्तिकराचे जुने दर अथवा नवीन कमी केलेले प्राप्तिकर यापैकी एक पर्याय स्वीकारण्याची मुभा त्यांनी करदात्यांना दिल्याने सोप्याऐवजी अवघड आणि गोंधळात गोंधळ अशी स्थिती निर्माण झालेली आहे. 

हा विक्रम कोणत्याही अर्थमंत्र्यांला मोडीत काढणे अवघड

प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 अंतर्गत सध्या जवळपास 120 सवलती मिळतात. 
गेल्या अनेक अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे ही संख्या फुगत फुगत 120 वर पोचली आहे. त्यात काहीसा किचकटपणा असला तरी पगारदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, अपंग, सामान्य गुंतवणूकदारांना या कलमानुसार मिळणाऱ्या करसवलती अतिशय महत्त्वाच्या आहेत. नवीन कराचे दर सुचविताना सीतारामन यांनी 70 सवलती हटविल्याची घोषणा केली. प्राप्तिकर दरात तसेच प्राप्तिकर कायद्यात सुसूत्रता आणण्याची घोषणा त्यांनी केली. "विवाद से विश्‍वास' अशी घोषणाही त्यांनी आपल्या भाषणात केली. परंतु प्राप्तिकर कायद्यातील बदल सुचविताच ही घोषणा "विश्‍वास से विवाद' अशीच बाजाराला भासली आणि अर्थसंकल्प संपता संपता तब्बल एक हजार अंशांनी शेअर निर्देशांक खाली खेचण्याचा अनोखा विक्रम स्वतःच्या नावावर सीतारामन यांनी नोंदवून घेतला. 

70 सवलती काढून सरकारने अप्रत्यक्षरित्या आपला महसूल वाढविण्याचा प्रयत्न केला

करविवरणपत्र भरणे करदात्यांना सोपे जावे, यासाठी आपण सुमारे 70 सवलती हटवत असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आणि नेमका गोंधळ तेथेच सुरू झाला. या सवलती केवळ एका व्यक्तीसाठी नसून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रस्ट, हिंदू अविभक्त कुटुंब, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसाठी साठीपासून तयार केलेले विविध वयोगट, स्वेच्छानिवृत्ती, कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे स्टॉक ऑप्शन, विदेशातील भारतीय नागरिक, भारतीय वकिलातीतील भारतीय कर्मचारी आदींबाबत वेगवेगळ्या अर्थसंकल्पात त्या- त्या वेळच्या परिस्थितीनुसार आणि जागतिक पातळीवरील प्रवाहाला अनुसरून देण्यात आलेल्या होत्या. या भरमसाठ सवलतींमुळे विवरणपत्र भरण्यात किचकटपणा आलेला आहे, हा अर्थमंत्र्यांनी केलेला युक्तिवाद फारसा योग्य ठरलेला नाही. 70 सवलती काढून सरकारने अप्रत्यक्षरित्या आपला महसूल वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शंकेला वाव मिळाला आणि त्याचे पडसाद लगचेच शेअर बाजारात दिसून आले. 

काही प्रमुख योजना कलम 80 सी मध्ये

प्राप्तिकर कायद्याचा 80 सी हा महत्त्वाचा कलम 1 एप्रिल 2006 पासून अंमलात आले आणि त्यानुसार प्राप्तिकरदात्यांना विविध गुंतवणुकीआधारे दीड लाख रुपयांपर्यंतची करसवलत मिळते. भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), जीवन विमा, समभाग आधारित बचत योजना (ईएलएसएस), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, सुकन्या समृद्धी योजना, युलिप, घराच्या खरेदीवेळी भरलेले मुंद्राकशुल्क आणि नोंदणीशुल्क, इन्फ्रास्ट्रक्‍चर बॉन्ड (रोखे), 
नाबार्ड ग्रामीण रोखे, वरिष्ठ नागरिक बचत योजना, टपालाची पाच वर्षांची मुदत योजना या काही प्रमुख योजना कलम 80 सी मध्ये आहे. 


शेअर बाजाराचा गाल आज असा काही पिरगळला, की शेअर बाजार कोमजून गेला

प्राप्तिकराचे कमी केलेले दर स्वीकारल्यास यातील 80 सी, 80 सीसीसी, 80 सीसीडी, 80 डी, 80 डीडी, 80 डीडीबी, 80 ई, 80 ईई, 80 ईईए, 80 ईईबी, 80 जी, 80 जीजी, 80 जीजीए, 80 जीजीसी, 80 आयए, 80 आयएबी, 80 आयएसी, 80 आयबी, 80 आयबीए आदींनुसार मिळणाऱ्या सवलतींवर पाणी सोडावे लागणार आहे. या प्रमुख करसवलती बहुतांश मध्यमवर्गीय, संशोधक, पगारदार, गृहिणी, छोटे व्यापारी यांच्याशी संबंधित आहे. या सवलती राहणार की जाणार, याबाबत संदिग्धता निर्माण झालेली आहे. सोमवारपर्यंत तरी त्याबाबत गोंधळ राहण्याची स्थिती आहे. जीएसटीप्रमाणेच हा मामला असून, तोही गंभीर वळणावर येऊन ठेपला आहे. 

शेअर बाजाराचा गाल  असा काही पिरगळला, की शेअर बाजार कोमजून गेला

मनमोहनसिंग यांच्या काळात कंपन्यांना भांडवलउभारणीस मदत होण्यासाठी ईएलएसएस ही चांगली योजना आणण्यात आली. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळले आणि त्यांना दरमहा गुंतवणुकीची सवयही लागली. म्युच्युअल फंड उद्योगाचाही चांगला विकास झाला. परिणामी, विदेशी गुंतवणुकीवर अवलंबून असलेला भारतीय शेअर बाजाराने स्वदेशी निधीच्या जोरावर गेल्या दहा वर्षांत चांगले बाळसे धरले आणि तो चांगला दुडूदुडू धावत असताना सीतारामन यांनी चक्क शेअर बाजाराचा गाल आज असा काही पिरगळला, की शेअर बाजार आज कोमजून गेला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com