महिनाभर मजुरी व प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक वा प्रथम क्रमांक असा 'त्याचा' सिलसिला...

ऊसतोड मजूर.jpg
ऊसतोड मजूर.jpg

नाशिक : (ब्राह्मणगाव) घरात अठराविश्‍व दारिद्रय असूनही उसतोड मजुरी करणाऱ्या ब्राह्मणगाव (ता. बागलाण) येथील आदिवासीच्या झोपडीतील सोनू केवळ नवरे हा हिरा झळाळून निघाला. ऑलंपियाडच्या सुवर्णपदकावर नाव कोरण्याच्या उर्मीतून त्याने तीन राज्य व राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. देशासाठी ऑलिंपिक सुवर्णपदक मिळविण्याचे स्वप्न बाळगून सोनू तयारी करीत असून, चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. 

महिनाभर मजुरी व प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक 

वडिलांसह कुटुंबीयांचे पिढीजात उसतोडीचे काम, अन्य वेळेत शेतात मजुरी, काहीतरी करून दाखवायचे, म्हणून सोनू धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ लागला. येथूनच त्याला कलाटणी मिळाली. महिनाभर मजुरी व प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक वा प्रथम क्रमांक असा सिलसिला सुरू झाला. यापूर्वी त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड होऊनही आर्थिक परिस्थिती व तांत्रिक अडचणीमुळे तो खेळू शकला नाही. मार्च-एप्रिल दरम्यान चीनमध्ये खेळण्याची संधी त्याला मिळणार आहे. या वेळीही त्याचा सहभाग शासन व दानशूर व्यक्तींच्या आर्थिक मदतीवरच अवलंबून आहे. सोनूला मदत झाल्यास त्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. 

पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सोनूला सुवर्णपदक

सोनूचे बारावीपर्यंतचे शिक्षण ब्राम्हणगाव येथील श्रीराम सजन आहिरे विद्यालयात झाले. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्याला मजुरीशिवाय पर्याय नव्हता. यामुळे 2008-09 ला बारावीपासून शिक्षण बंद झाले. धावपटू होण्याची ऊर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण बंद झाल्यामुळे सोनूचा हिरमोड झाला तरी वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेत अव्वल क्रमांक मिळवत राहिला. त्याची पारख पाटणे (ता. मालेगाव) येथील धावपटू राकेश खैरनार याला झाली. त्याने सोनूला प्रोत्साहन देत ग्रामीण क्रीडा ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाची माहिती दिली. यातून 2018 मध्ये जम्मू काश्‍मीरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. येथील पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सोनूला सुवर्णपदक मिळाले. जम्मू काश्‍मीर येथे निवड झाली असताना त्याच्याकडे स्पोर्ट शूजदेखील नव्हते. आत्मविश्वासाच्या बळावर त्याने सुवर्णपदक मिळविले. त्याची नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. येथेही त्याला आर्थिक अडचण आली. आंतरराष्ट्रीय स्पर्धेस मुकावे लागले.

समाजातील दानशूर व शासनाने लक्ष घातल्यास सोनू देशाला सुवर्णपदक मिळवून देणार

जिद्द न सोडता ऑगस्ट 2019 मध्ये पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पाठोपाठ ऑक्‍टोंबर 2019 मध्ये पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यातूनच त्याची चीनमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. यावेळी देखील त्याला आर्थिक अडचण आहेच. समाजातील दानशूर व शासनाने लक्ष घातल्यास सोनू देशाला सुवर्णपदक मिळवून देऊ शकतो. सोनूच्या जिद्दीची दखल ब्राह्मणगाव येथील प्रा. के. एन. अहिरे यांनी घेतली. त्यांनी दहा वर्षानंतर सोनुला मालेगाव येथील मसगा महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेंद्र अहिरे यांनी सटाणा बाजार समितीमध्ये सत्कार करून दहा हजार रुपयाची मदत केली. सटाणा पोलिस ठाण्याततर्फेही पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी त्याचा गौरव केला. या हिऱ्याला पैलू पाडण्याचे काम क्रिडातज्ज्ञ व शासनाचे आहे. 

आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन दाखवेल

भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची माझी पात्रता आहे. आजपर्यंत मी ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला ती प्रत्येक स्पर्धा मी जिंकलो आहे. मालेगाव-सटाणा रस्त्यावरच मी सराव करतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मला जाण्याची संधी मिळाल्यास मी आशियाई स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन दाखवेल. -सोनू नवरे, धावपटू, ब्राह्मणगाव 

आर्थिक पाठबळ व योग्य मार्गदर्शन आवश्यक

सोनूला प्रशिक्षण नाही कोच नाही. जिद्द व मेहनतीच्या जोरावर तो राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारत यशस्वी झाला आहे. त्याला आर्थिक पाठबळ व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास पाच हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत तो भारताचे प्रतिनिधित्व करेल. -राकेश खैरनार, धावपटू, पाटणे (ता. मालेगाव) 

सोनूची कामगिरी 

2018 : जम्मू काश्‍मीर सुवर्णपदक प्रथम 
2018 : नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड 
ऑगस्ट 2019 : पुणे येथील राज्यस्तरीय सुवर्णपदक प्रथम 
ऑक्‍टोबर 2019 : पुणे येथील नॅशनल सुवर्णपदक प्रथम  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com