मालेगावच्या प्रसिध्द लुंगीला निर्यातीचे दार उघडण्याची प्रतीक्षा! 

जलील शेख 
Friday, 27 November 2020

मालेगाव येथील लुंगीचा बाज हा वेगळाच असल्याने बांगलादेश, श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, दक्षिण आफ्रिका आदी देशांमधून लुंगीची मागणी असून, ती त्या देशात निर्यात केली जाते. शहरात लुंगी उत्पादनाला १९७६ मध्ये सुरवात झाली. सुरवातीला दोन कारखान्यांतून उत्पादन घेतले जायचे. मागणी वाढू लागल्याने कारखान्यांची संख्या वाढत वीसवर गेली.

मालेगाव (जि.नाशिक) : येथील यंत्रमागाबरोबरच मालेगावची लुंगी प्रसिद्ध आहे. शहरातील २० कारखान्यांमधून महिन्याला ७० हजार लुंगी तयार होते. देशांतर्गत बाजारपेठांमध्ये येथील लुंगी चांगलाच भाव खाते. कोरोना लॉकडाउननंतर हा व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागला आहे. पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरू झाले असून, उत्पादकांना आता निर्यातीचे दार उघडण्याची प्रतीक्षा आहे. 

वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लुंग्या
मालेगाव येथील लुंगीचा बाज हा वेगळाच असल्याने बांगलादेश, श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, दक्षिण आफ्रिका आदी देशांमधून लुंगीची मागणी असून, ती त्या देशात निर्यात केली जाते. शहरात लुंगी उत्पादनाला १९७६ मध्ये सुरवात झाली. सुरवातीला दोन कारखान्यांतून उत्पादन घेतले जायचे. मागणी वाढू लागल्याने कारखान्यांची संख्या वाढत वीसवर गेली. साधारणत: सव्वादोन मीटर कापड लुंगीसाठी लागते. एका लुमवर आठवड्याला एक हजार मीटर कापड तयार होते. येथील तयार कापड प्रोसेसिंगसाठी भिवंडीला पाठविले जाते. त्यामुळे वेगवेगळ्या रंगाच्या आकर्षक लुंग्या बाजारात उठून दिसतात. यात चौकडा लुंगीला चांगली मागणी असते. स्थानिक बाजारातच ६० ते ७० टक्के मालाची विक्री होते. येथील बाजारात चेन्नई, उत्तर प्रदेश, इरोड (तमिळनाडू), कोलकता, भिवंडी आदी ठिकाणच्या लुंगी विक्रीसाठी येतात. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

मालेगावची लुंगी सातासमुद्रापार 
मालेगावची लुंगी सातासमुद्रापार पोचली आहे. सर्वप्रथम येथून बांगलादेशला निर्यात करण्यात आली. त्यापाठोपाठ श्रीलंका, भूतान, ब्रह्मदेश, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये ती पोचली. आता कोरोनामुळे निर्यात बंद झाली. परिणामी या व्यवसायाला फटका बसून उत्पादन घटले. हा व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर येत आहे. निर्यात सुरू झाल्यास कारखान्यांमधील उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होईल. परदेशात निर्यातीसह राज्य आणि देशातील उत्तर प्रदेश, बिहार, हैदराबाद, केरळ, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड आदी ठिकाणी मालेगावची लुंगी विकली जाते. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ
 
छत्तीसगडमध्ये सर्वाधिक विक्री 
छत्तीसगड राज्यातील आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणावर लुंगीचा पेहराव करतात. माफक दरात मिळणारी मालेगावची लुंगी या भागात लाेकप्रिय आहे. पॉलिस्टर व सुती अशा दोन प्रकारात माल तयार होतो. यात येथे सुती लुंगीचे अधिक उत्पादन घेतले जाते. 

या वर्षी लॉकडउनमुळे रमजान ईद व बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी झाली. त्यामुळे उत्पादन पडून राहिले. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी उत्पादनात मोठी घट झाली. आता व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोरोनावर नियंत्रण आल्यास तसेच निर्यात सुरू झाल्यास या व्यवसायाला बळकटी मिळू शकेल. - जावेद अहमद, संचालक, चारमिनार लुंगी, मालेगाव 

कोरोनामुळे सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे झाले. याचा फटका इतर व्यवसायांप्रमाणेच लुंगी व्यवसायालाही बसला. जिल्ह्यासह खानदेशातील पाहुणे येथे आल्यास यातील अनेक जण मालेगावची लुंगी हमखास खरेदी करतात. सध्या मालाची विक्री कमी हाेत आहे. - नारायण गवळी, ताज लुंगी सेंटर, मालेगाव  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon famous Lungi Waiting for opening export nashik marathi news