यंदा सांस्कृतीक पंढरीत होणार वैचारिक कुंभमेळा; साहित्यप्रेमींकडून निर्णयाचे जोरदार स्वागत

marathi sahitya sammelan will held in nashik kautikrao patil announcement news
marathi sahitya sammelan will held in nashik kautikrao patil announcement news

नाशिक : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्स संमेलन नाशिकला होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी करताच नाशिकमधील साहित्यिक व साहित्यप्रेमींनी या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. 

जुळून आला दुग्धशर्करा योग 

लोकहितवादी मंडळाच्या निमंत्रणावरून गुरूवारी (ता. ७) नाशिकमध्ये स्थळ भेटीनंतर शुक्रवारी (ता. ८) महामंडळाने हा निर्णय जाहीर केला. या संदर्भात लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर म्हणाले, की यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष आणि नाशिक जिल्हा निर्मितीला १५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. अशा पार्श्‍वभूमीवर साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. संमेलनासाठी लोकहितवादी मंडळाने निमंत्रण दिले असले तरी, हे संमेलन सर्व नाशिककरांचे आहे. या अगोदरच्या परंपरेला साजेसे किंबहूना अधिक दर्जेदार, साहित्य क्षेत्राला परिवर्तनाची दिशा देणारे हे संमेलन ठरेल यात शंका नाही. सामूहिक प्रयत्नातून नाशिकचे नाव साहित्य क्षेत्रात अधिक उंचीवर नेवून आलेली संधी सार्थ करूया, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

नाशिकच्या साहित्यिक वातावरणास उजाळा 

तर, मंडळाचे सदस्य व सावानाचे पदाधिकारी संजय करंजकर म्हणाले, की साहित्य संमेलनाची घोषणा झाली आहे. त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागणार आहोत. येत्या २३ व २४ जानेवारीला महामंडळाचे सदस्य नाशिकला येणार आहेत. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल. तत्पूर्वी, महाराष्ट्र शासनाला संमेलनाच्या परवानगीबाबत पत्र पाठविण्यात येईल. नाशिकमध्ये संमेलन होत असल्याचा नाशिककरांना आनंद झाला आहे. त्यांच्या सहकार्याने संमेलन नक्कीच यशस्वी होईल. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्षभरापासून नागरिक घरात आहेत. त्यांना संमलेनाच्या निमित्ताने संधी चालून आली असल्याचेही त्यांनी नमुद केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तू. पाटील म्हणाले की, नाशिकला संमेलन होणे हा नाशिककरांच्या दृष्टीने अतिशय भाग्याचा क्षण आहे. नाशिककमध्ये पूर्वीपासून साहित्यिक वातावरण रूजलेले आहे. त्या वातावरणाला या संमेलनाने पुन्हा उजाळा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूणच साहित्य विश्‍वाला या संमेलनामुळे चालना मिळेल, याची मला खात्री आहे. 

यापूर्वी २००५मध्ये नाशिकला झालेल्या साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्षपद भुषविलेले केटीएचएमचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड म्हणाले की, मराठी साहित्य संमेलन नाशिकला मिळणे ही नाशिककरांसाठी बहुमूल्य अशी गोष्ट आहे. यामुळे नवीन साहित्यिकांना उमेद मिळेल. इतर ठिकाणी जी ग्रंथसंपदा मिळत नाही, असे ग्रंथ साहित्य संमेलनात मिळतात. या संमेलनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पैलूंचा उलगडा होण्यास मदत होईल. 

नाशिककरांसाठी अभिमानाची बाब : भुजबळ 

नाशिकला साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला, ही अतिशय आनंदाची बातमी आहे. नाशिकला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज साहित्यिक या भूमीने दिले आहेत. या भूमीची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी होणे ही नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे. नाशिकमध्ये होणारे हे संमेलन ऐतिहासिक कसे होईल, यासाठी आपण सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देऊ. देशभरातून येणाऱ्या मान्यवर साहित्यिकांचा नाशिककरांतर्फे योग्य असा मान-सन्मान ठेवला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com