परप्रांतीयांना यायचयं महाराष्ट्रात? जथा लवकरच पोहचतोय...कमबॅकची तयारी सुरू..

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 11 June 2020

कोरोनामुळे गावी गेलेल्या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत.

नाशिक / मालेगाव : कोरोनामुळे गावी गेलेल्या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत.

हजारो कामगारांची धडपड सुरू

पवन एक्‍स्प्रेसने शुक्रवारी (ता. 12) 20 परप्रांतीयांचा जथा "कसमादे'त पोचणार आहे. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये पुरेसे काम नसल्याने मजुरांचे "कमबॅक' सुरू झाले आहे. रेल्वेची जनरल बोगी बंद असल्याने रिझर्व्हेशनसाठी हजारो कामगारांची धडपड सुरू आहे. अवजड कामांसाठी हे कामगार माहीर आहेत. 

मालक-कामगार दोघांनाही गरज 
लॉकडाउननंतर कसमादे पट्ट्यातील परप्रांतीय हजार-बाराशे कामगार गावी गेले. 1 जूनपासून उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याने अवजड कामांसाठी या मजुरांची उणीव भासू लागली आहे. मजूर गावी गेले, तरी ते जेथे कामाला होते त्या मालक व व्यवस्थापनाशी संपर्क ठेवून होते. आर्थिक परिस्थितीने संकटात असलेला मजूर पुन्हा महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहे. मालक आणि मजूर दोघांची गरज पाहता आगामी काळात उत्तर भारतीयांचे लोंढे पुन्हा महाराष्ट्रात परतल्यास नवल वाटू नये. 

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

कामगार रिझर्व्हेशनच्या रांगेत 
सध्या देशात 200 ट्रेन धावत आहेत. यात पाटण्याहून मनमाडमार्गे मुंबईला जाणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. ऑनलाइन रिझर्व्हेशन व प्रकृती चांगली असलेल्यांनाच प्रवास करता येत आहे. त्यामुळे हजारो कामगार रिझर्व्हेशनच्या वेटिंग लिस्टवर आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत. रोजगार व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर चार-सहा महिन्यांत कुटुंब आणण्याचे नियोजन आहे. 

20 कामगारांचे तिकीट पक्के 
"कसमादे'त पोल्ट्री कामासाठी येणाऱ्या मोतिहारी (जि. सलही, बिहार) येथील 20 कामगारांचे तिकीट पक्के झाले आहे. पवन एक्‍स्प्रेसने शुक्रवारपर्यंत ते या भागात पोचतील. परप्रांतीय मजूर "कसमादे'त पोल्ट्री उद्योग, कांदा व मका व्यापाऱ्यांकडे पोती भरणे, मोठ्या गोठ्यांमध्ये दूध काढणे, रस्त्यांची कामे, बाजार समित्यांमधील मोठ्या व्यावसायिकांकडे काम करतात. यातील अनेकांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणाजवळच असते. 100 किलोंचे पोते कामगार लीलया उचलून पाठीवरून वाहून नेतात. 

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना

पुन्हा मूळ कामावर येत असल्याचा आनंद

महाराष्ट्राने वर्षानुवर्षे आम्हाला रोजीरोटी दिली. गावी दिवसाला 200 ते 250 रोज मिळतो. काहींना तर तोही मिळत नाही. महाराष्ट्रात पुरेसा रोजगार व दिवसाला पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळतात. पुन्हा मूळ कामावर येत असल्याचा आनंद आहे. -धुरूप सहानी, कामगार, मोतिहारी (बिहार) 
 

बिहारी मजूर कोणतेही काम करण्यास तयार असतात. वर्षानुवर्षे ते या भागात काम करीत आहेत. गावी गेल्यापासून ते संपर्कात आहेत. तेथे रोजगार नसल्याने बहुसंख्य मजूर पुन्हा या भागात कामासाठी येण्यास इच्छुक आहेत. -संजय हिरे, संचालक, सुमंगल ग्रुप इंडस्ट्रीज 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: migrants wants return to maharashtra on Friday nashik marathi news