अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई; तब्बल १७ लाखांचा दंड वसूल

विक्रांत मते
Tuesday, 24 November 2020

यात मास्क परिधान न केलेल्या तीन हजार २२१ नागरिकांच्या कारवाईचा समावेश आहे. दंडात्मक कारवाईतून तब्बल १७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच बांधकामाचे डेब्रिज रस्त्यावर टाकणाऱ्या २६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छतेसह स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी महापालिकेने विविध कारणांनी अस्वच्छतेला कारणीभूत ठरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई अधिक गतिमान केली आहे. यात मास्क परिधान न केलेल्या तीन हजार २२१ नागरिकांच्या कारवाईचा समावेश आहे.

दंडात्मक कारवाईतून तब्बल १७ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच बांधकामाचे डेब्रिज रस्त्यावर टाकणाऱ्या २६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

एप्रिल ते २० नोव्हेंबर २०२० पर्यंत...

घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण न केल्याने पहिल्या प्रसंगात २५३, तर दुसऱ्या प्रसंगात १२ केसेस करण्यात आल्या असून, त्यांच्याकडून पहिल्या प्रसंगात ८८ हजार ६००, तर दुसरा प्रसंगात ८१ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. नदी अस्वच्छतेच्या ४८, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ३४२, पाळीव प्राण्यांमुळे रस्त्यांवर घाण केल्याने ४९, मोकळ्या भूखंडावर डेब्रिज टाकल्याने ९६, तर प्रतिबंधित क्षेत्रात प्लॅस्टिक वापरल्याने ४६ जणांवर कारवाई करण्यात आली. पालापाचोळा जाळणे सहा, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ४४, उघड्यावर लघुशंका करणे १४, उघड्यावर शौच करणे दोन याप्रमाणे चार हजार १३५ केसेस करण्यात आल्या आहेत. एप्रिल ते २० नोव्हेंबर २०२० पर्यंतची ही कारवाई आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

रस्त्याच्या कडेला डेब्रिज 

रस्त्याच्या कडेला डेब्रिज टाकल्यास दंडात्मक कारवाईला सुरवात करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानात नाशिकचा क्रमांक याच कारणामुळे घसरल्याने कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिक रोड व पंचवटी विभागात प्रत्येकी एक, सिडकोत चार, सातपूरमध्ये आठ, पश्‍चिम विभागात सात, तर पूर्व विभागात पाच ठिकाणी कारवाई करण्यात आली. एकूण २६ ठिकाणी झालेल्या कारवाईत ४२ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation takes action against those who spread uncleanliness Nashik news