नाशिकमधील साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत! उत्सुकता पोचली शिगेला

महेंद्र महाजन
Wednesday, 13 January 2021

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला घ्यायचे निश्‍चित झाले असताना मराठी सारस्वतांमध्ये संमेलनाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला घ्यायचे निश्‍चित झाले असताना मराठी सारस्वतांमध्ये संमेलनाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दुसरीकडे संमेलनाध्यक्षपदासाठी सामाजिक प्रश्‍नांवर लेखन केलेले डॉ. अनिल अवचट यांच्यासह मराठी कथाकार भारत सासणे व डॉ. रवींद्र शोभणे यांची नावे चर्चेत आली आहेत. 

मराठी साहित्य महामंडळाची २३ आणि २४ जानेवारीला बैठक 
संमेलनाच्या तयारीत व्यस्त असलेल्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक २३ आणि २४ जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे. या बैठकीसाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, विदर्भ साहित्य संघ, पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद, औरंगाबादची मराठवाडा साहित्य परिषद या घटक संस्थांसह पाच संलग्न साहित्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये संमेलनाध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल, असे सांगितले जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. अवचट यांची एकमताने निवड व्हावी, अशी मागणी महामंडळाकडे करण्यात आली आहे. हीच मागणी इतरांनी करावी, असे आवाहन सोशल मीडियातून करण्यात येत आहे.

नाशिकमधील साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी नावे चर्चेत 

डॉ. अवचट हे मराठीतील लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत. वैद्यकीय व्यवसायात न रमता त्यांनी सामाजिक चळवळीत सहभागी होणे पसंत केले आहे. साधना आणि पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे संपादन त्यांनी केले आहे. पूर्णिया हे त्यांचे पहिले पुस्तक १९६९ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. पत्नी डॉ. सुनंदा यांच्यासह व्यसनमुक्तीची चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांनी मुक्तांगण संस्थेची स्थापना केली आहे. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव झालेला आहे. 

\हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

सासणे यांच्यासाठी नाशिकमधून मागणी 
मराठी कथाकार सासणे यांच्या नावाचा विचार करावा, अशी मागणी शासकीय कर्मचाऱ्यांच्या नाशिकमधील सार्वजनिक वाचनालयातर्फे करण्यात आली आहे. याविषयी वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी संमेलनाचे यजमान लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे पत्र दिले. पत्रावर राजेश गोवर्धने, सागर शिंदे, हेमंत पोतदार, विवेक उगलमुगले, प्रमोद जावळे, विलास शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. श्री. सासणे यांनी कथा, दीर्घकथा, नाटक, बालसाहित्य अशा विविध साहित्यप्रकारात योगदान दिले आहे. राज्य सरकारच्या प्रशासकीय सेवेत त्यांनी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. हेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. श्री. सासणे यांनी २०१० मधील राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. 

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

डॉ. शोभणेंचे नाव पुन्हा चर्चेत 
बडोद्यामध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांनी बाजी मारली होती. त्यांनी डॉ. शोभणे यांचा पराभव केला होता. डॉ. शोभणे कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. नाशिकमधील साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने आता पुन्हा त्यांचे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत आले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: names discussed for Sahitya Sammelan President in Nashik marathi news