लॉकडाउननंतर प्रथमच धावणार नाशिक शहर बससेवा! एसटीचा निर्णय 

विक्रांत मते
Thursday, 22 October 2020

राज्य सरकारकडून लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर एसटी महामंडळाकडून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. शहर बससेवा सुरळीत होण्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. ही प्रतीक्षा आता संपली

नाशिक : राज्य सरकारकडून लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर एसटी महामंडळाकडून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. शहर बससेवा सुरळीत होण्याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. ही प्रतीक्षा आता संपली असून, गुरुवार (ता.२२)पासून शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, शहरातील सहा प्रमुख रस्‍त्‍यांवर शहर बस धावणार आहे. 

लॉकडाउननंतर प्रथमच आजपासून धावणार; एसटीचा निर्णय 
महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे यासंदर्भात सूचना जारी केली आहे. मार्चमध्ये लॉकडाउन जारी केल्‍यापासून शहरातील रस्‍त्‍यांवर प्रथम बस धावणार आहे. लॉकडाउनमुळे बससेवा बंद असल्‍याने शहरातील निमाणी बसस्‍थानकासह अन्‍य थांबे बंद होते. बससेवा पुन्‍हा सुरू होत असल्‍याने प्रमुख बसस्‍थानकांची स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरणाचे काम महामंडळाने हाती घेतले. जिल्‍हांतर्गत उपलब्‍ध बसगाड्यांप्रमाणेच शहर बसमधील प्रवाशांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे. यात मास्‍क बंधनकारक करण्यात आले असून, अन्‍य नियम पाळावे लागणार आहेत.

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

शहर बससेवेला डबल बेल 

महामंडळातर्फे शहर बसगाड्यांचे सातत्‍याने निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. शहरबस बंद असल्‍याने अनेक नागरिकांना रिक्षाद्वारे प्रवास करावा लागत होता. तुलनेने रिक्षाचे भाडे अधिक असल्‍याने आर्थिक झळ सोसल्‍याशिवाय पर्याय नव्‍हता. आता शहर बस वाहतूक सुरू होत असल्‍याने सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍थेतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्‍यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. निमाणीहून शहराच्‍या विविध उपनगरांपर्यंत ही बससेवा कार्यान्‍वित केली जाणार आहे. 

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

...या मार्गांवर धावणार शहर बस 
- निमाणी ते नाशिक रोड 
- निमाणी ते श्रमिकनगर 
- निमाणी ते उत्तमनगर 
- निमाणी ते अंबड 
- निमाणी ते विजयनगर 
- निमाणी ते पाथर्डीगाव  
 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik city bus service run for first time after lockdown marathi news