नाशिकलाही लाभलाय 'ट्राम'चा ऐतिहासिक प्रवास! कुसुमाग्रजांच्या लेखातही उल्लेख  

tram 2.jpg
tram 2.jpg

नाशिक : नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. जगातील वेगाने वाढणाऱ्या काही मोजक्या शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक लागतो. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम या शहरात अनुभवायला मिळतो. विविध संस्कृतींच्या विकासात गोदा संस्कृतीचे स्थानही मोठे आहे. प्रथा, परंपरा, कथा, दंतकथा, पुराण, धार्मिक, शिवकाल, पेशवाई व पारतंत्र्य ते स्वातंत्र्य काळातील विविध घडामोडींनी गजबजलेला वैभवशाली नाशिकचा ऐतिहासिक प्रवास थक्क करतो. असाच एक थक्क करणारा ऐतिहासिक प्रवास नाशिकला लाभला आहे तो म्हणजे ट्राम सेवेचा!

कलकत्ता, मुंबईपाठोपाठ भारतातली तिसरी ट्राम सेवा; 'कुसुमाग्रजांच्या लेखात उल्लेख 
 १८८९ साली नाशिकमध्ये ट्राम सेवा सुरू झाली. त्यावेळी ती कलकत्ता, मुंबईपाठोपाठ भारतातली तिसरी ट्राम सेवा होती. दोन डबे असलेली ही ट्राम चार घोडे ओढून नेत असे. कवी कुसुमाग्रजांनी "नाशिक - तेव्हाचं" या त्यांच्या लेखात ट्रामबद्दल लिहिले आहे. ते लिहितात, "स्वाऱ्या पुरेशा भरल्या की ट्राम निघायची. घंटेचा खणखणाट करीत ती तेथून मेनरोडने आणि पुढे घासबाजाराजवळ गावाबाहेर पडायची. सुमारे अर्ध्या तासात ती स्टेशनापर्यंत जायची. नाशिक, नाशिकरोडमध्ये तेव्हा कोठेच वस्ती नसल्याने मध्ये कोठे थांबण्याची गरज नसे. तरीही रस्त्यावर कोणी हात दाखवला तर सारथी गाडी थांबवायचा आणि दोन आण्यांची दौलत कंपनीला मिळवून द्यायचा."

तिकिट फक्त दोन आणे म्हणजे बारा पैसे

मेनरोडवर जिथे सध्या नाशिक महापालिकेचे कार्यालय आहे, त्याच जागेत ट्रामचे स्टेशन आणि त्यासाठी लागणाऱ्या घोड्यांची पागा होती. या सेवेसाठी ४०० घोडे पागेत ठेवलेले असायचे. १९३३ साली ही ट्रामसेवा बंद झाल्यावर त्या टर्मिनसच्या जागेत ही सध्याची महापालिकेची इमारत १९३६ साली बांधली गेली. त्या जागेवरून सध्याच्या मेनरोडने, भद्रकाली मार्केटच्या मागच्या बाजूने, घासबाजारातून ही ट्राम नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे जात असे. नाशिक ते नाशिकरोड रेल्वे स्टेशन अशा सरळ रस्त्याच्या एका बाजूने हे ट्रामचे रूळ टाकलेले होते. १८८९ साली ही ट्राम सुरू झाली तेव्हा त्याचे तिकिट दोन पैसे होते. १९२५च्या दरम्यान कुसुमाग्रजांनी या ट्रामने प्रवास केला तेव्हा त्याचे तिकिट दोन आणे म्हणजे बारा पैसे इतके होते. 

नाशिकला इंजिनरहित ट्रामची परवानगी 

या ट्राम नाशिकला कशा सुरू झाल्या हा किस्साही रंजक आहे. रिचर्ड कॅल्थ्रॉप या रेल्वेत नोकरीसाठी आलेल्या इंजिनीअरला अडीच फुटी रुळांची नॅरो गेज रेल्वेची कल्पना सुचली. नाशिक-नाशिकरोड व बार्शी कुर्डुवाडी अशा दोन मार्गांसाठी त्याने रेल्वेला प्रपोजल देऊन सर्वेक्षण केले व स्वत:ची रेल्वे फीडर लाइन्स ही कंपनी स्थापन करून परवानगी मिळवली. स्टँडर्ड गेजसाठी लागणाऱ्या तेवढ्याच खर्चात नॅरो गेजचे चौपट लांबीच्या मार्गाचे काम करता येते हे त्याने सिद्ध केले आणि कमी गर्दी व कमी लांबीसाठी नॅरो गेजची कल्पना त्याने सुचवली. बार्शीला नॅरो गेजची, पण नाशिकला इंजिनरहित ट्रामची परवानगी त्याला मिळाली. त्याप्रमाणे एका वर्षात रुळ टाकून ही ट्रामसेवा त्याने सुरू केली. पुढे कॅल्थ्रॉपची ही नॅरो गेजची रेल्वेची कल्पना इतकी उचलली गेली की पुढची तीस वर्षे जगाच्या पाठीवर उभारल्या गेलेल्या ४०हून अधिक नॅरो गेज रेल्वेचा कन्सल्टिंग इंजिनीअर म्हणून त्याने प्रचंड कमाई केली. पहिल्या महायुद्धात पॅराशूटचा शोध लावण्यासाठी त्याने आपली सारी संपत्ती संशोधनात खर्च केली. पण विमान कंपन्यांनी त्याच्याऐवजी अमेरिकन पेटंटचे पॅराशूट स्वीकारले. शेवटी पायलटच्या इजेक्ट सीट पॅराशूटचा त्याचा शोध मान्य झाला आणि त्याचे पेटंट त्याला मिळाले. ते अद्यापही त्याच्याच नावे आहे. १९१६ साली त्याने नाशिकची ट्रामसेवा नाशिक ट्रामवे अँड कंपनीला विकली. नव्या कंपनीने १९१७पासून घोडे बंद करून पेट्रोलवर चालणारे इंजिन या ट्रामला बसवले. त्यावेळी भारतातल्या इतर ट्राम सेवा डिझेल इंजिनावर चालत होत्या. पेट्रोलचे इंजिन नाशिकला पहिल्यांदा वापरले गेले. ते ज्यांनी बसवले त्याच ब्रॅडी कंपनीने जवळच बेलापूरला भारतातील पहिली अॅटोमेटेड शुगर फॅक्टरी उभारून दिली.

अनेक इतिहासिक आठवणी 

१९६५-६६ सालाच्या दरम्यान नव्या भद्रकाली बस स्टँडच्या बांधकामासाठी या ट्रामचे रेल्वे ट्रॅक उखडून टाकले. त्यानंतर तो पाडून पुढे गंजमाळ बस स्टँड बांधला पण आता ते गंजमाळ स्थानक बांधण्यात आले. येथील जुने लोकं अजूनही सांगतात की घोड्यांना विश्रांतीसाठी व पाणी पिण्यासाठी सध्याच्या फेम थिएटरच्या मागच्या बाजूला एक विहीर होती, तिथे ही ट्रॅम घोड्यांच्या विश्रांतीसाठी थांबत असे. या ट्रामचे टर्मिनस नाशिकरोडला पवन हॉटेलच्या मागे होते. त्याचेही अवशेष दिसतात, असे  सांगितले जाते. जिथे ही ट्राम टर्मिनेट व्हायची, तिथे काही वर्षांपूर्वी महापालिकेने एक छोटे उद्यान बांधले. जे अवशेष होते अशा अनेक इतिहासिक आठवणी यानिमित्ताने ताज्या झाल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com