प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन भूमी! नाशिकचे 'काळाराम मंदिर' क्रांतिकारक घटनेचे साक्षीदार

kalaram mandir banner.jpg
kalaram mandir banner.jpg

नाशिक : नाशिक हे ठिकाण दक्षिण काशी मानले जाते. अशी मान्यता आहे कि प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य काही काळ होते. रामचंद्रांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे. त्याची पदचिन्हे अनेक मंदिरांच्या रूपाने आजही नाशिकमध्ये दिसतात. नाशिकचे काळाराम मंदिर हे त्यातीलच एक.... प्रसिद्ध पंचवटीतच हे मंदिर वसले आहे. "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक सत्याग्रहांमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष महत्त्व आहे. शिवाय या मंदिराला सामाजिक इतिहासही लाभला आहे.

म्हणूनच त्याला काळाराम मंदिर नाव पडले
नाशिकमध्ये रामाची मंदिरे तशी खूप. काळाराम, गोरा राम, मुठ्यांचा राम, बायकांचा राम. पण या सगळ्यात काळारामाचे वैशिष्ट् काही आगळेच आहे. हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या जुने तर आहेच. पण त्याची बांधणीही काही खास आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७८२ मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.

६९ फूट कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा
संपूर्ण मंदिर ७४ मीटर लांब व ३२ मीटर रूंद आहे. मंदिराला चार दिशांना चार दरवाजे आहेत. पूर्व महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर भव्य सभामंडप लागतो. त्याची उंची बारा फूट आहे. त्यात चाळीस खांब असून तेथे असलेला मारूती समोरच्या मंदिरातील श्रीरामाच्या चरणी पाहतो, असा भाव आहे. सभामंडपाच्या बाजूला तीस फूट उंचीवर नगारखाना आहे. मंदिराचे गर्भगृह काटकोनी असून त्यावरची नक्षीही सुंदर आहे. मंदिराची कळसापर्यंतची उंची ६९ फूट आहे. कळस ३२ टनी शुद्ध सोन्याचा आहे. या मंदिराला मोठा कोटही आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराला तीन दालने आहेत. तिसर्‍या दालनात मंदिराचा गाभारा आहे. तिथे श्रीराम, लक्ष्मण व सीता यांची मूर्ती आहे. मंदिराला १७ फूट उंचीचा चिरेबंदी कोट आहे. त्याच्या चारही बाजूला ओवर्‍या आहेत. या मंदिराची बांधणी अशी काही आहे, की एकावर दुसरा पाषाण रचून त्याचे संतुलन साधण्यात आले आहे. पाषाण जोडण्यासाठी सिमेंट किंवा चुन्याचा वापर केलेला नाही. तर खोबणीद्वारे दगड एकमेकांत अडकवले आहेत. त्यामुळेच मंदिराचे स्थापत्य आगळे वेगळे ठरते.

क्रांतिकारक घटनेचे साक्षीदार! ही एक मानवमुक्तीची लढाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अनेक सत्याग्रहांमध्ये काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला विशेष महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेबांनी अनेक दिवस विचार केल्यानंतर या सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याचे मान्य केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहाचे नेतृत्व करणार हे कळाल्यानंतर सर्वसामान्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते. पाच वर्षे ११ महिने आणि सात दिवस हा सत्याग्रह सुरू होता. काळाराम मंदिर सत्याग्रह २ मार्च १९३० प्रसिद्ध काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. ही एक मानवमुक्तीची लढाई होती. ही लढाई होती अस्मितेची, ही लढाई होती स्वाभिमानाची. मानवी हक्क मिळविण्यासाठी अस्पृश्य समाज २ मार्च १९३० रोजी स्वाभिमानाने, ताठ मानेने, अन्यायाचा परिहार करण्यासाठी दंड थोपटून धर्मसंकटात उभा राहिला. या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. त्याचे शिल्पकार होते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर?
हे राममंदिर प्राचीन पर्णकुटीच्या जागेवर असल्याचे बोलले जाते. तिथे आधी नागपंथीय साधू रहात. मंदिरालगत भैरवनाथ व गोरक्षनाथांचे मंदिरही आहे. काही नागपंथी साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर या मूर्ती सापडल्या आणि त्यांनी लाकडी मंदिर बांधले. पुढे १७८० मध्ये माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी सरदार रंगराव ओढेकरांना हे मंदिर बांधण्याची सूचना केली. १७९० मध्ये मंदिर बांधून पूर्ण झाले. त्याकाळी या बांधकामासाठी २३ लाखाचा खर्च आला. 

बघण्यासारखे इतर काही
याच मंदिराच्या परिसरात प्रसिद्ध सीतागुंफा आहेत. येथेच सीतेने साधना केल्याचे बोलले जाते. पंचवटी हे नाव ज्यामुळे पडले ते पाच प्रसिद्ध वटवृक्षही याच परिसरात आहेत. मंदिरापासूनच जवळच गोदावरी नदी वाहते. प्रसिद्ध रामकुंडही तेथेच आहे. शिवाय इतर मंदिरेही याच परिसरात आहेत.

कसे जाल?

रस्ता- नाशिक मुंबईहून १६० किलोमीटर व पु्ण्याहून २१० किलोमीटरवर आहे. मुंबई-आग्रा महामार्ग नाशिकमधूनच जातो.
रेल्वे- नाशिक मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणार्‍या जवळपास सर्व गाड्या नाशिकमधूनच जातात.
हवाई मार्ग- नाशिकला आता हवाई वाहतूकही होते. किंगफिशरद्वारे मुंबई ते नाशिक हवाई वाहतूक केली जाते.

स्त्रोत - वेबदुनिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com