मृत्यूनंतरही नशिबी मरणयातनाच! गाव राजकारणात अग्रेसर, मात्र स्मशानभूमी असूनही नसल्यासारखी

smashanbhumi.jpg
smashanbhumi.jpg

नाशिक : (निमगाव) राजकीय क्षेत्रात नावाजलेल्या निमगावमध्ये स्मशानभूमीची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. १५ हजार लोकसंख्येच्या गावात चांगली स्मशानभूमी नसावी, हे मोठे दुर्दैव आहे. स्मशानात जाणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या मरणयातना संपत नाहीत, अशीच परिस्थिती स्मशानभूमीची आहे. 

ग्रामपंचायतींकडून काहीही उपाययोजना नाही

गावानजीकच्या पातळ गंगानदीच्या किनारी स्मशानभूमी आहे. अतिवृष्टीमुळे नदीला यंदा मोठ्या प्रमाणावर पूरपाणी आले. नदीवरील केटीवेअर बंधारा पूर्ण भरल्याने स्मशानभूमीची संरक्षक भिंत पडली. त्यामुळे चार महिने या भागात पाणीच होते. यामुळे अंत्यसंस्कारावेळी सरण रचण्यासाठीही जागा नव्हती. येण्या-जाण्याच्या मार्गावर सरण रचून अग्निडाग दिला जायचा. ग्रामपंचायतीने आजपर्यंत काहीही उपाययोजना केली नाही. या भागात विजेची सुविधा नाही. सध्या पाणी कमी झाले आहे. मात्र घाणीचे साम्राज्य तसेच आहे. 

नागरिक स्मशानभूमीची दुरवस्था पाहून नाराज

साफसफाई नाही. चारही बाजूच्या संरक्षक भिंती पडल्या आहेत. सरण ओटा तुटल्याने अडचण निर्माण होते. गाव परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये, तसेच शेतमळ्यांमध्ये राहणारे नागरिक अंत्यविधीसाठी येत नाहीत. ते शेतातच अंत्यविधी करणे सोपे मानतात. गावाचा सर्वांगीण विकासासाठी येणारा निधी कुठे खर्च होतो, याबाबत ग्रामस्थांना माहिती नाही. अंत्यविधीसाठी बाहेरगावाहून येणारे नागरिक स्मशानभूमीची दुरवस्था पाहून नाराज होतात. यातून गावाची बदनामी होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. 

गावाची स्मशानभूमी असून नसल्यासारखी आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी स्मशानभूमीची पाहणी करावी. ग्रामसेवक काय काम करतात, हेच कळत नाही. त्यामुळे स्वतः जाऊन देखभाल दुरुस्ती, पाण्याची व्यवस्था, वीज, सफाई यांची व्यवस्था करून गावाला न्याय द्यावा. -ॲड. मंगेश हिरे, निमगाव 

प्रशासकीय पदाचा पदभार घेतल्याने गावातील सुविधा व अडचणी यांची माहिती जाणून घेतली. येणारा निधी हा स्मशानभूमीसाठी वापरण्यात येईल. स्मशानभूमीची दुरुस्ती तत्काळ करण्याचा प्रयत्न केला जाईल. -सुनील बच्छाव, प्रशासक निमगाव  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com