जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या ५ हजारांच्या आत; सात रूग्णांचा मृत्यू

अरुण मलाणी
Wednesday, 28 October 2020

काही दिवसांपूर्वी सक्रिय रूग्णांची संख्या दहा हजारांच्या उंगरठ्यावर पोचली होती. परंतु सातत्याने कोरोनामुक्‍त रूग्णांचा वाढता आकडा व कोरोनाची लागण झालेल्यांची घटती संख्या यामुळे सक्रिय रूग्ण संख्या पाच हजारांच्या आत आली आहे.

नाशिक : कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या घटत असताना, कोरोनामुक्‍त होणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (ता. २८) जिल्ह्यात ३३७ बाधित आढळून आले, तर कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांची संख्या ९२१ होती. सात रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून सक्रिय रूग्णांच्या संख्येत ५९१ ने घट झाली आहे. तर, उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या पाच हजारांच्या आत आली असून, सद्यस्थितीत ४ हजार ८७४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बुधवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २६०, नाशिक ग्रामीणचे ७२, मालेगाव महापालिका हद्दीतील तीन तर, जिल्हाबाह्य दोन रूग्ण आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्या रूग्णांमध्ये नाशिक शहरातील ३३५, नाशिक ग्रामीणचे ५७९ रूग्ण, मालेगावचे दोन तर, जिल्हाबाह्य पाच रूग्णांनी कोरोनावर मात केली. सात मृतांमध्ये नाशिक शहरातील दोन तर, नाशिक ग्रामीणच्या पाच रूग्णांचा समावेश आहे. 

आतापर्यंत एकूण ९२ हजार ७६४ कोरोना बाधित

काही दिवसांपूर्वी सक्रिय रूग्णांची संख्या दहा हजारांच्या उंगरठ्यावर पोचली होती. परंतु सातत्याने कोरोनामुक्‍त रूग्णांचा वाढता आकडा व कोरोनाची लागण झालेल्यांची घटती संख्या यामुळे सक्रिय रूग्ण संख्या पाच हजारांच्या आत आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२ हजार ७६४ कोरोना बाधित आढळून आले असून, यापैकी ८६ हजार २२८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १ हजार ६६२ रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ४ हजार ८७४ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दिवसभरात दाखल रूग्णांमध्ये नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात ८२१, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात २७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दहा, जिल्हा रूग्णालयात चार रूग्ण दाखल झाले. प्रलंबित अहवालांचे प्रमाण पुन्हा वाढले असून, सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ०४२ अहवाल प्रलंबित होते. यापैकी ६९८ अहवाल ग्रामीण भागातील आहेत. 

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

मालेगाव तालुक्यात एक बळी 

मालेगाव : शहरात मंगळवारी तब्बल दहा दिवसानंतर एक कोरोना बळी गेल्यानंतर बुधवारी (ता. २८) तालुक्यातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. कौळाणे येथील ६६ वर्षीय पुरुषाचा महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यामुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ६० तर, शहरातील कोरोना बळींची संख्या १६६ झाली आहे. शहरात ११८ ॲक्टीव्ह रुग्णांवर तर, तालुक्यात ६० ॲक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बुधवारी शहरात नव्याने ३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात मात्र एकही रुग्ण आढळून आला नाही. शहरातील १०० स्वॅबचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of corona patients in Nashik district is within five thousand marathi news