चिंताजनक! जिल्ह्यात ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णसंख्येत दोन टक्क्यांनी वाढ; वाचा सविस्तर

corona virus.jpeg
corona virus.jpeg

नाशिक : कोरोना विषाणूच्या फैलावामध्ये गेल्या महिनाभरापासून ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांच्या संख्येत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी ५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत होती. आता हेच प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. शहर-जिल्ह्यातील सात हजार ६९१ पैकी ९४६ रुग्णांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे. तसेच १२१ जण व्हेंटिलेटरवर आहेत. ही परिस्थिती एकीकडे असताना दुसरीकडे मात्र ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठ्याचे प्रमाण व्यस्त होऊ लागल्याने ऑक्सिजन उपलब्धतेच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

ऑक्सिजन तत्काळ मिळावा, यासाठीचा प्रयत्न

अन्न व औषध प्रशासनाच्या सहआयुक्त माधुरी पवार यांनी ऑक्सिजन उपलब्धतेच्या तक्रारींच्या अनुषंगाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्यामध्ये ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांप्रमाणेच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑक्सिजन उपलब्धतेची समस्या जाणवणाऱ्या रुग्णालयाच्या डॉक्टरांना ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाणार आहे, जेणेकरून मागणीनुसार संबंधितांना ऑक्सिजन तत्काळ मिळावा, यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सहआयुक्तांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्या म्हणाल्या, की ऑक्सिजन तुटवड्याबद्दल दोन तक्रारी आल्या होत्या. 

उत्पादकांकडून १० टक्के ऑक्सिजनची वाढीव मागणी

ऑक्सिजनच्या आवश्‍यकतेबद्दल माहिती एसएमएसद्वारे द्यावी, जेणेकरून ती माहिती उत्पादक-पुरवठादारांना कळवून उपलब्धतेची व्यवस्था करता येणे शक्य आहे. मात्र दोन्ही तक्रारींमध्ये मेसेज आला नाही. तरीही उलटपक्षी माहिती घेऊन ऑक्सिजन उपलब्धतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारी (ता. ७) दुपारी सातपूरच्या उद्योग भवनातील कार्यालयात ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांची बैठक घेण्यात येत आहे. याखेरीज रायगड जिल्ह्यातील उत्पादकांकडून १० टक्के ऑक्सिजन वाढवून मागण्यात आला आहे. नागपूरहून आठवड्यातून एकदा लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, या दृष्टीने पाठपुरावा करण्यात येत आहे. 

१३ जणांकडून २२ टनांचा पुरवठा 

जिल्ह्यातील तीन उत्पादकांसह १३ पुरवठादारांकडून दिवसाला २२ टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. २८ टन ऑक्सिजन जळगाव, धुळे, नंदुरबारला पाठविला जातो. ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढले असल्याने तेवढ्या ऑक्सिजनची गरज वाढल्याचे स्पष्ट होते. उद्योग विभागाशी निगडीत यंत्रणेला १५ ऑगस्टपासून ऑक्सिजनची मागणी वाढत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर उद्योगासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी करून ते वैद्यकीयसाठी वाढविण्याच्या सूचना उत्पादकांना देण्यात आल्या होत्या. मुळातच, सिलिंडर ‘रिफील’ करणाऱ्यांकडे ऑक्सिजन भरण्याएवढी यंत्रसामग्री असल्याने अतिरिक्तची यंत्रसामग्री उपलब्धतेचा प्रश्‍न तयार झाला आहे. अशातच, संगमनेरला हजार ते बाराशे सिलिंडर भरण्याची सोय असल्याची माहिती उपलब्ध झाल्यावर सिन्नर आणि इगतपुरी भागात ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबत उद्योग विभागाशी संलग्न अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण 

(रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणाच्या आधारे) 
९० ते ९३ टक्क्यांसाठी : मिनिटाला ४ लिटर 
८० ते ९० टक्क्यांसाठी : मिनिटाला १० लिटर 
७५ टक्क्यांपेक्षा कमी : मिनिटाला २० ते ३० लिटर 

ऑक्सिजनची गरज ६ पटीने वाढली 

(स्थिती शहर आणि जिल्ह्याची) 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : ७ हजार ६९१ 

मध्यम लक्षणांचे रुग्ण : २ हजार ४१२ 
लक्षणे नसलेले रुग्ण : ५ हजार २७९ 
ग्रामीण भागासाठी पूर्वी दिवसाला आवश्‍यक ऑक्सिजन सिलिंडर संख्या : २५ ते ३० 
ग्रामीणसाठी आता ६ पटीने वाढलेली ऑक्सिजनची गरज : ३ दिवसाला ३०० जम्बो सिलिंडर 
ऑक्सिजनवर असलेली रुग्णसंख्या : जिल्हा रुग्णालय- ७८, मालेगाव- ५१, डॉ. वसंतराव पवार रुग्णालय- ४३, महापालिकेचे दोन आणि शहरातील रुग्णालये- ६७२, ग्रामीण- १०२ 

व्हेंटिलेटरवरील रुग्णसंख्या : १२१ 

नाशिकमधील स्थिती : ऑक्सिजन उपलब्ध खाटा- ९४३ आणि उपचार घेणारे रुग्ण- ६९९ (अतिदक्षता व ऑक्सिजन खाटा- ४२३ व उपचार घेणारे रुग्ण- २८६) (व्हेंटिलेटर- १३८ आणि उपचार घेणारे रुग्ण- ९९) 
(कोरोनाग्रस्त रुग्णांप्रमाणेच ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची आवश्‍यकता असलेल्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याने वैद्यकीय सुविधांच्या उपलब्धतेचा प्रश्‍न गंभीर दिशेने निघाल्याने यंत्रणांना पावले उचलावी लागतील.) 

प्लाझ्मामुळे जीवनदानाचे ९५ टक्के प्रमाण 

कोरोनामुक्त झालेल्यांकडून प्लाझ्मादानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अर्पण रक्तपेढीमध्ये आतापर्यंत ११६ जणांनी प्लाझ्मा दान केला आहे. त्यातून १०२ रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला आहे. प्लाझ्मामुळे जीवनदान मिळण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांच्या पुढे पोचल्याचे अर्पण रक्तपेढीचे डॉ. नंदकिशोर तातेड यांनी सांगितले. नाशिक शहरामध्ये आतापर्यंत जवळपास पावणेदोनशे कोरोनामुक्तांनी प्लाझ्मा दान केला आहे.

संपादन -  किशोरी वाघ


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com