esakal | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कांद्याची १ जानेवारीपासून निर्यात खुली; पाकचा कांदा तासात गडगडला  
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 4.jpg

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला. येत्या शुक्रवार अर्थात्‌ १ जानेवारी २०२१ पासून निर्यातीला सुरवात होईल. भारतीय कांद्याची निर्यातबंदी उठविल्यानंतर एक तासात पाकिस्तानच्या कांद्याचा टनाचा भाव घसरत खाली आला.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कांद्याची १ जानेवारीपासून निर्यात खुली; पाकचा कांदा तासात गडगडला  

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : देशांतर्गत कांद्याची आवक वाढली असताना भाव गडगडल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे निर्यातबंदी उठविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेटा वाढविला होता. त्याची दखल घेत सोमवारी (ता. २८) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला. येत्या शुक्रवार अर्थात्‌ १ जानेवारी २०२१ पासून निर्यातीला सुरवात होईल. भारतीय कांद्याची निर्यातबंदी उठविल्यानंतर एक तासात पाकिस्तानच्या कांद्याचा टनाचा भाव दीडशे डॉलरने घसरत ३०० डॉलर झाला. चीनचा टनाचा भाव पाचशे डॉलर सुरू असून, तोही गडगडण्याची शक्यता निर्यातदारांना वाटते आहे. 

कांद्याची १ जानेवारीपासून निर्यात खुली 
कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचा किलोचा भाव ४० रुपयांपर्यंत पोचला असताना केंद्र सरकारने १४ सप्टेंबरला कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर साडेतीन महिन्यांत निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. त्याचा फायदा खरीप आणि लेट खरीप (लाल पोळ) कांद्याला होणार आहे. केंद्राच्या निर्यातबंदी उठविण्याचे प्रत्यक्ष पडसाद मंगळवारी (ता. २९) बाजारपेठेवर होऊन किलोमागे दोन ते तीन रुपयांनी भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामागे कारणही तसे आहे. भारताने कांद्यावरील निर्यातबंदी उठविताच, निर्यातदारांकडे अरब राष्ट्रे, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, व्हिएतनाम, फिलिपीन्समधील आयातदारांनी कांद्याची मागणी नोंदविण्यास सुरवात केली आहे. राज्यातील एका निर्यातदाराकडे एका तासामध्ये जगभरातून ५५ कंटेनरभर कांदा ‘बुक’ झाला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निर्यातबंदी केली होती. मात्र निर्यातबंदी उठविण्यासाठी यंदाचा फेब्रुवारी उजाडला होता. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप

देशांतर्गत आवक वाढणार 
सद्यःस्थितीत महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. येत्या १५ दिवसांमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशातील नवीन कांद्याची आवक वाढण्यास सुरवात होईल. त्याच वेळी गुजरात आणि कर्नाटकमधील कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होईल. यंदा देशामध्ये सर्वदूर उन्हाळ कांद्याला चांगले पैसे मिळाल्याने कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. अवकाळी पावसाने कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले, तरीही शेतकऱ्यांनी दोनदा, तीनदा रोपे टाकून उत्पादनवाढीवर भर दिला आहे. गुजरातमध्ये १५ टक्के अधिकचे उत्पादन अपेक्षित आहे. त्याच वेळी फेब्रुवारीमध्ये नव्याने कांदा दाखल होत असलेल्या पश्‍चिम बंगालमध्ये यंदा २० टक्क्यांनी कांद्याचे उत्पादन वाढणार आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने निर्यात खुली करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत शेतकरी कुबेर जाधव, कांद्याचे व्यापारी नितीन जैन, कांदा निर्यातदार विकास सिंह यांनी केले आहे. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

कांद्याचा भाव १७ ते २० रुपये 
कांद्याची निर्यातबंदी एकीकडे करत असतानाही भाव आटोक्यात येत नसल्याने केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीवर भर दिला होता. तरीही आयात कांद्याला ग्राहकांची फारशी पसंती न मिळाल्याने महाराष्ट्रातील कांद्याने देशांतर्गत बाजारपेठेत ‘भाव’ खाल्ला. मात्र नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांद्याचे भाव घसरणीला लागले. सोमवारी स्थानिक बाजारपेठेत कांद्याला किलोला १७ ते २० रुपये किलो असा भाव मिळाला. शिवाय निर्यातबंदी उठल्याने भावात होणाऱ्या वृद्धीचा विचार करून भारतीय कांदा जागतिक बाजारपेठेत टनाला ४०० डॉलरपर्यंत पोचणार असल्याने सद्यःस्थितीत विकल्या जाणाऱ्या पाकिस्तान आणि चीनच्या कांद्याला शह बसेल, असा अंदाज निर्यातदारांचा आहे. 

काय आहे जागतिक परिस्थिती 
० हॉलंड, तुर्कस्तान, इजिप्त, इराकचा कांदा संपला आहे. 
० कांदा संपलेल्या देशातील नवीन कांदा बाजारात येण्यासाठी एप्रिल-मे उजाडणार आहे. ० हॉलंडचा कांदा फेब्रुवारीमध्ये बाजारात आला, तरीही आकाराने तो मोठा असल्याने जागतिक बाजारपेठेत भारतीय कांद्यापुढे टिकाव धरणे मुश्‍कील मानले जाते.