आवक वाढल्याने कांदा कोसळला!..मार्केटची स्थिती अजब..

onion_Reuters.jpeg
onion_Reuters.jpeg

नाशिक : कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात "मार्केट'ची स्थिती अजब बनली आहे. शेतकऱ्यांना किलोला 26 ते 28 रुपयांवर समाधान मानावे लागत असताना ग्राहकांना मात्र किलोला 50 ते 60 रुपये मोजावे लागताहेत. देशांतर्गत नवीन कांदा मुबलक प्रमाणात येऊ लागल्याने शेतकरी भाव कोसळण्याच्या भीतीने कांदा विक्री करत आहेत. त्यामुळे कांद्याच्या भावात घसरण होत आहे. 

परिपक्व न झालेल्या कांद्याचे प्रमाण अधिक

पुणे, नगर, नाशिक, जळगाव, धुळे या भागातून दिवसाला सर्वसाधारणपणे दोन लाख क्विंटल कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविला जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. भाव कोसळण्याच्या भीतीमुळे सध्या बाजारात आवक होत  असलेल्या कांद्यामध्ये परिपक्व न झालेल्या कांद्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

कांदा विक्रीसाठी घाई करू नये

मुळातच, अतिवृष्टीमुळे पूर्वीच्या कांद्याचे एकरी उत्पादन 30 टक्के मिळाले. परिणामी, अधिकचा भाव मिळाला तरीही खर्चाची तोंडमिळवणी झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. आताही कांद्याच्या वाढीसाठी पोषक असलेल्या थंडीचे प्रमाण अधिक काळ न राहिल्याने एकरी उत्पादन 90 ते 100 क्विंटल मिळणे अपेक्षित असताना सद्यःस्थितीत त्याच्या 60 टक्के उत्पादनावर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील भावाकडे लक्ष देऊन कांदा विक्रीसाठी आणावा, कांदा विक्रीसाठी घाई करू नये, असे सल्ला व्यापाऱ्यांप्रमाणे अभ्यासकांचा आहे. 

जिल्हाभरात भावात घसरण
 
जिल्हाभरातील बाजारपेठांमध्ये कांद्याच्या भावात घसरण झाल्याने
सोमवारी (ता. 27) क्विंटलला मिळालेला भाव रुपयांमध्ये = 
देवळा- 2 हजार 805, कळवण- 2 हजार 640,
मनमाड- 2 हजार 700, येवला- 2 हजार 667, 
मुंगसे- 2 हजार 830. 

आंदोलनाच्या ठिणगीची चिन्हे 

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने निर्यातबंदी उठविण्याची मागणी पुढे येत आहे. कांद्याच्या पट्ट्यातील सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी याबाबत पत्रव्यवहार करून त्याचे वृत्त प्रसिद्ध करून घेतले. मात्र, केंद्राची कांदा निर्यातबंदी उठविण्याच्या दिशेने पावले पडत नसल्याने शेतकऱ्यांनी त्याबाबतची निवेदने देण्यास सुरवात केली आहे. त्यासही प्रतिसाद न मिळाल्यास कांदा उत्पादकांकडून आंदोलनाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. केंद्र सरकारला राज्याने कांदा निर्यातंबदी उठविण्याचा प्रस्ताव पाठवायला हवा, असेही शेतकरी बोलू लागले आहेत. जगातील बाजारपेठेतील ग्राहक परत मिळविण्यासाठी निर्यातबंदी उठविण्याची वेळ आल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com