ऑक्सिजन टाक्यांवर आता सीसीटीव्हीचे लक्ष; बिटको, झाकिर हुसेन रुग्णालयात प्रयोग 

विक्रांत मते
Thursday, 22 October 2020

सप्टेंबरमध्ये प्रतिदिन पाच किलोलिटर ऑक्सिजनची मागणी होती. सध्या मागणी घटली तरी हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ऑक्सिजनला मागणी वाढू शकते. त्यादृष्टीने टाक्या बसविल्या जात आहेत.

नाशिक : कोरोनासंसर्गाचा प्रादुर्भाव रुग्णांच्या घटत्या संख्येवरून कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी हिवाळ्यात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने नवीन बिटको रुग्णालयासह कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाक्या बसविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे; परंतु ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन ऑक्सिजन टाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मेअखेरपासून शहरात कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. सप्टेंबरमध्ये मागील महिन्यांचे सर्व विक्रम मोडीत निघाले. या कालावधीत कोरोनारुग्णांची संख्या हजारांच्या पटीने बाहेर पडू लागल्याने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन खाटांची कमतरता भासू लागली. त्यामुळे नवीन बिटको रुग्णालयात वीस किलोलिटर, तर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दहा किलोलिटर क्षमतेच्या दोन ऑक्सिजन टाक्या बसविण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला.

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश 

सप्टेंबरमध्ये प्रतिदिन पाच किलोलिटर ऑक्सिजनची मागणी होती. सध्या मागणी घटली तरी हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने ऑक्सिजनला मागणी वाढू शकते. त्यादृष्टीने टाक्या बसविल्या जात आहेत. नवीन बिटको रुग्णालयात ऑक्सिजन टाक्या बसविण्याचे काम पूर्ण झाले, तर डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाक्या बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येईल, असा अंदाज व्यक्त केल्याने ऑक्सिजन टाक्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. दुसरीकडे ऑक्सिजन टाक्यांच्या ठिकाणी दगाफटका होण्याची शक्यता लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen tanks will now be monitored with the help of CCTV nashik marathi news