भारतापेक्षा अधिक भावामुळे पाकिस्तानचा कांदा "आउट' 

onion.jpg
onion.jpg

नाशिक : पाकिस्तानचा नवीन कांदा बाजारात येऊ लागल्यानंतर एक आठवडाभर भारतीय कांद्यापेक्षा कमी भावात विक्री करून ग्राहकांना खेचण्याचा प्रयत्न झाला. मात्र पाकिस्तानांतर्गत मागणी वाढताच, कांद्याचा क्विंटलचा भाव 300 डॉलरपर्यंत पोचला आहे. त्यापेक्षा 50 डॉलरने भारतीय कांदा स्वस्त मिळत असल्याने पाकिस्तानचा कांदा बहुतांश बाजारपेठेतून "आउट' झाला आहे. 

"पॅनिक सेलिंग' वेळच्या "बफर स्टॉक'मुळे कांद्याच्या निर्यातीवर मर्यादा 
कोरोना विषाणू संसर्ग फैलाव वाढू नये म्हणून जाहीर झालेल्या सुरवातीच्या लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर कांद्याचे "पॅनिक सेलिंग' झाले. त्याचवेळी जगभरात व्यापाऱ्यांनी "बफर स्टॉक' करून ठेवला. दुसरीकडे मात्र ग्राहकांना घराबाहेर पडणे कठीण झालेले असताना रेस्टॉरंट, हॉटेल्स, मॉल बंद राहिल्याने आयातदारांनी कांद्याच्या मागणीकडील हात आखडता घेतला आहे. शिवाय गेल्या वर्षी अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळ कांद्याचे अमाप पीक घेतले. या साऱ्याचा परिणाम म्हणजे, स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे भाव क्विंटलला 580 ते 825 रुपयांपर्यंत घसरलेत. 

 निर्यातदारांची ही स्थिती का उद्‌भवली?
बांगलादेशमध्ये नाशिकचा कांदा 17 रुपये किलो पोच, या भावाने निर्यात होत आहे. आखाती देशांमध्ये 210 ते 225 डॉलर, सिंगापूरमध्ये 240 ते अडीचशे डॉलर, मलेशियामध्ये 220 ते सव्वादोनशे डॉलर क्विंटलला या भावाने कांद्याची निर्यात होत आहे. लंडनमधील व्यापारी एका दिवसामध्ये दोन कंटेनर कांदा विकायचा. आता पाच दिवसांमध्ये एक कंटेनरभर कांदा विकणे मुश्‍कील झाले आहे. लंडनमधील व्यापाऱ्याने ही व्यथा सांगितल्यावर निर्यातदारांची ही स्थिती का उद्‌भवली याची माहिती घेतली. त्यावेळी एक ग्राहक पाच किलो कांदा घ्यायचा; परंतु आता लंडनमध्ये एक किलो घेतलेला कांदा पाच दिवस पुरवला जात असल्याचे ग्राहक सांगत आहेत. तसेच महिन्याभरापूर्वी 40 रुपये किलो भावाने लंडनमध्ये कांदा विकला जात होता. आता त्याचा भाव 25 रुपयांपर्यंत घसरल्याचे निर्यातदारांनी सांगितले. 


बंदरामध्ये जहाजांना विलंब 
मुंबईतील बंदरांमधून जहाजांना विलंब होऊ लागला आहे. चार जहाजांच्या जागी एक जहाजाचे कामकाज चालत असल्याने कांद्याचे कंटेनर बंदराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पडून आहेत. वातानुकूलित कंटेनरसाठी प्लग पॉइंट उपलब्धतेचा प्रश्‍न असल्याचे बंदराच्या व्यवस्थापनाकडून निर्यातदारांना सांगण्यात येत आहे. बंदरातून वाहतूक सुरळीत झाल्यावर स्थानिक बाजारपेठेतील भावात काहीशी सुधारणा होण्याची शक्‍यता निर्यातदारांना वाटते आहे. मुळातच, उत्तर भारतामध्ये श्रावण सुरू झाला आहे. त्यामुळे कांद्याची मागणी कमी झाली आहे. याखेरीज शेतकऱ्यांना उन्हाळ कांद्याच्या घेतलेल्या 20 टक्के अधिक उत्पादनातील कांदा चाळींमध्ये आहे. सध्याच्या ढगाळ आणि पावसाळी हवामानामुळे कांदा खराब व्हायला सुरवात होईल की काय? अशा भीतीचा गोळा शेतकऱ्यांच्या पोटात उठला आहे. ठेंगोड्याचे उत्पादक यशवंत पाटील यांना आता चाळींमधून कांद्याचा वास येऊ लागला आहे. आठवडाभरानंतर परिस्थिती नियंत्रणात न आल्यास चाळी फोडून कांदा विकण्याखेरीज पर्याय उरणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 


नाशिकमध्ये 350 ऐवजी दिवसाला 150 टनाचा खप 
कांद्याचे आगार असलेल्या नाशिकमध्ये दिवसाला 350 टन कांद्याची विक्री व्हायची, आता मात्र हीच विक्री दीडशे टनापर्यंत कमी झाली आहे. ग्राहकांनी खरेदीचा हात आखडता घेतला आहे. बाजारपेठेतील परिस्थिती पाहता, ग्राहकांनी "लक्‍झरी लाइफ'वरून जीवनावश्‍यक बाबींकडे आपले लक्ष केंद्रित केल्याचे जाणवते, असे कांद्याचे निर्यातदार विकास सिंह यांनी म्हटले आहे. दरम्यान, पोळ (खरीप) कांद्याच्या लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा किमतीत बियाणे खरेदी केले. गेल्या पायलीभर (चार किलो) बियाण्यांसाठी चार हजार रुपये शेतकऱ्यांनी दिलेत. आता आठ ते दहा हजार रुपये मोजावे लागले आहेत. हा कांदा सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्याचवेळी रांगड्या कांद्याची लागवड सुरू होईल आणि तो कांदा 110 दिवसांनी विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com