थंडी, गर्दी आणि फटाक्यांचे प्रदूषण ठरणार घातक; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल तज्ज्ञ सांगतात..

diwali and corona.jpg
diwali and corona.jpg

नाशिक : पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला, प्रदूषणात भर पडली व गर्दी वाढली, की कोरोना रुग्णसंख्या वाढीची दुसरी लाट येणार, असे तज्ज्ञ सांगताहेत. पण दीपोत्सवाच्या हर्षोल्हात त्याकडे ढुंकून पाहायलाही लोक तयार नाहीत.

रुग्णसंख्या वाढण्यासंबंधी डिसेंबर ते फेब्रुवारी-मार्च आव्हानात्मक 

कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठीच्या राज्यस्तरीय कृतिदलातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाची दुसरी लाट २५ डिसेंबर ते २६ जानेवारी २०२१ या कालखंडात येईल. दुसऱ्या तज्ज्ञांचा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या लाटेचा अंदाज आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा डिसेंबरअखेरीस लाटेचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये थंडी असताना प्रदूषण वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा दाखला यंत्रणेकडून दिला जात आहे. हे जरी एकीकडे असले, तरीही शहरांमधून सणासाठी गावाकडे येणाऱ्यांचे प्रमाण वाढले असताना बाजारपेठांमध्ये गर्दी उसळत असल्याने आरोग्य विभागाने रुग्णसंख्या वाढीच्या अनुषंगाने याच महिन्याच्या अखेरीपासून तयारी करण्याचे ठरवले आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी- मार्च २०२१ हा कालखंड आव्हानात्मक असेल, असेही यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

थंडी अन् गर्दीत फटाक्यांचे प्रदूषण संसर्गासाठी घातक 

जागतिक आरोग्य संघटनेने दिवसाला दहा लाख लोकसंख्येमागे १४० तपासण्या करण्याच्या दिलेल्या सूचनेचे पालन केले जावे. त्यासाठी जिल्हा आणि महापालिका क्षेत्रात प्रयोगशाळा चाचणी केंद्र सुरू करून त्याची माहिती जनतेपर्यंत पोचवावी. त्याचप्रमाणे दुसऱ्या लाटेच्या सतर्कतेचा इशारा वेळेवर मिळावा म्हणून फ्लूसदृश रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करावे. त्यात फीव्हर क्लिनिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अधिक फ्लू आजाराचे रुग्ण आढळणाऱ्या भागात प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. गृहभेटीद्वारे सर्वेक्षण आणि कॉन्टक्ट ट्रेसिंग वेगाने करण्यात यावे. जनसंपर्क अधिक असलेल्या व्यक्तींचे विशेष सर्वेक्षण करण्यात यावे. छोटे व्यावसायिक, घरगुती सेवा पुरवणारे, वाहतूक व्यवसायातील लोक, वेगवेगळी कामे करणारे मजूर, हाउसिंग सोसायट्यांमध्ये काम करणारे, आवश्‍यक सेवा पुरवणारे सरकारी- निमसरकारी कर्मचारी, पोलिस, गृहरक्षक जवान आदींचे सर्वेक्षण करत प्रयोगशाळा चाचणी प्राधान्याने करावी, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. नाशिकचा पारा केव्हाच १५ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला असून, गुरुवारी (ता.१२) किमान तापमान १०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. त्याचवेळी खरेदीसाठी रस्ते ओसंडून वाहताहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्या लाटेसाठी केवळ फटाक्यांच्या प्रदूषणाने उंबरठा ओलांडण्याचे कारण शिल्लक राहिले आहे.


फटाकेमुक्त दिवाळी 
कोरोनाग्रस्तांबरोबर श्‍वसनाचा त्रास असणाऱ्यांचा फटाक्यांच्या धुरामुळे आणखी त्रास वाढू शकतो. त्यावर उपाय म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यात यावी. तसेच लोकप्रबोधनासाठीचे महत्त्वाचे मुद्दे आरोग्य संचालकांनी नमूद केले आहेत. ते असे : 

० गर्दीच्या ठिकाणी अथवा समूहात मास्क वापरणे आवश्‍यक 
० हातांची स्वच्छता आणि नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागांची नियमित स्वच्छता 
० दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर राखणे व भारतीय पद्धतीने अभिवादन करणे 
० श्‍वसनसंस्थेच्या शिष्टाचाराबरोबर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि थुंकणे टाळणे 
० अनावश्‍यक प्रवास टाळण्यासोबत कोरोनाग्रस्त-त्यांच्या कुटुंबीयांसमवेत सामाजिक भेदभाव टाळणे 
० समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर, अफवा, चुकीचे मेसेज पुढे पाठवू नयेत. अधिकृत स्रोतांकडून माहिती घेणे 
० मानसिक ताणतणाव टाळण्यासाठी मित्र, नातेवाइकांशी बोलणे आणि आवश्‍यक तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणे  


उपायासंबंधी कृतियोजना मागवली 
आरोग्य उपसंचालक, जिल्हा परिषदांचे जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा रुग्णालयांचे जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकांचे आरोग्याधिकारी यांना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी दुसऱ्या लाटेसंबंधीच्या उपाययोजनांची माहिती कळवली आहे. तसेच दुसऱ्या लाटेसंबंधी कृतियोजना सादर करण्याची सूचना त्यांनी केली आहे. युरोपियन देशांच्या उदाहरणावरून आपल्याकडे दुसरी लाट जानेवारी-फेब्रुवारी २०२१ मध्ये येण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती डॉ. पाटील यांनी राज्यातील यंत्रणेला दिली आहे.



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com