नाशिकमध्ये खासगी वाहनांमुळे ध्वनिप्रदूषणालाही हातभार; सार्वजनिक वाहतूक बळकट करणे गरजेचे  

विक्रांत मते
Saturday, 31 October 2020

शहराचा विस्तार आडवा होत असल्याने ठराविक पॉकेट्स वगळता मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये प्रदूषणाची समस्या फारशी नाही. तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातून ध्वनिप्रदूषणालाही हातभार लागत आहे.

नाशिक : शहराचा विस्तार आडवा होत असल्याने ठराविक पॉकेट्स वगळता मुंबई, पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये प्रदूषणाची समस्या फारशी नाही. तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातून ध्वनिप्रदूषणालाही हातभार लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ध्वनिप्रदूषणाने आताच मर्यादा ओलांडली आहे. पंचवटी, द्वारका, सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, अशोक स्तंभ हा भाग ध्वनिप्रदूषणाचा हॉटस्पॉट ठरत आहे. भविष्यातील वाढत्या शहराचा विचार करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून खासगी वाहनांची संख्या कमी करणे महत्त्वाचे ठरेल. 

शहर बसद्वारे सार्वजनिक वाहतूक बळकट करणे गरजेचे 
कुठल्याही शहराची गुणवत्ता त्या शहरांत पुरविल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा किती व कशा आहेत, यावर अवलंबून असते. नाशिक शहर वेगाने विस्तारणाऱ्या शहरांच्या यादीत सर्वांत वरच्या क्रमांकावर असल्याचा दावा केला जात आहे. मात्र शहराची लोकसंख्या वीस लाखांच्या घरात पोचत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नाही. मार्चपूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या शहरात १४० बस रस्त्यावर धावत होत्या. लॉकडाउननंतर नाशिक रोड, पंचवटी, सातपूर व सिडको भागात सेवा सुरू करण्यात आली असली तरी ती पुरेशा प्रमाणात नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बसव्यतिरिक्त शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढली. शहर व ग्रामीण मिळून जिल्ह्यात अकरा लाख ६९ हजार ८६१ वाहनांची नोंद गेल्या वर्षात झाली होती.

अधिक ध्वनिक्षमता अधिक प्रमाणात आढळली

शहरात २२ हजार ६५१ रिक्षा, तर एक लाख ७१ हजार ४२५ चारचाकींची नोंद झाली होती. खासगी वाहने वाढल्याने हवेचे प्रदूषण वाढले. त्याचबरोबर ध्वनिप्रदूषणाची समस्याही वाढली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या मानांकनानुसार दिवसा ५५, तर रात्री ४५ डेसिबलपेक्षा अधिक ध्वनी असू नये. मात्र पंचवटी कारंजा, द्वारका या निवासी भागात ध्वनिप्रदूषण मर्यादेपलीकडे पोचले आहे. मेन रोड, मुंबई नाका, जुने सीबीएस, त्र्यंबक रोड, आयटीआय सिग्नल या भागात सरासरीपेक्षा अधिक ध्वनिक्षमता अधिक प्रमाणात आढळली आहे. 

हेही वाचा > विवाह समारंभाला आलेल्या कुटुंबियांना बनविला निशाणा! दहा लाखांहून अधिक ऐवज लंपास

ठिकाण ध्वनी पातळी (डेसिबलमध्ये) 
पंचवटी ७१.२ 
द्वारका ६७.६ 
सातपूर ७३.५ 
अंबड ७२.६ 
मेन रोड ६९.८ 
आयटीआय सिग्नल ७३.६ 
मुंबई नाका ७०.० 
जुने सीबीएस ७२.५ 
इंदिरानगर ४६.६ 

हेही वाचा > सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी असल्यास खासगी वाहनांची संख्या वाढत नाही, परंतु नाशिकमध्ये नेमके उलटे होत आहे. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळाली पाहिजे. - वर्षा भालेराव, नगरसेविका, सदस्य वृक्ष व प्राधिकरण समिती  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private vehicles also contribute to noise pollution in Nashik marathi news