RTE Admission : जिल्‍ह्‍यात ३ हजार ६८५ प्रवेश निश्‍चित; प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना गुरूवारपर्यंत मुदत

अरुण मलाणी
Friday, 2 October 2020

या जागांसाठी ऑनलाइन स्‍वरूपात १७ हजार ६३० प्रवेश अर्ज दाखल झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया मंदावलेली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. अर्धे सत्र संपत आले असतांना नाशिक जिल्‍ह्‍यातील दीड हजारांहून अधिक जागा अद्यापही रिक्‍त आहेत. 

नाशिक : शिक्षणाचा हक्‍क कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेशाची प्रक्रिया सध्या सुरू आहेत. पहिल्‍या सोडतीतील प्रवेश प्रक्रियेनंतर आता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाते आहे. याअंतर्गत प्रतिक्षा यादीत नावे असलेल्‍या व एसएमएस प्राप्त झालेल्‍या विद्यार्थ्यांच्‍या पालकांनी येत्‍या गुरूवार (ता.८) पर्यंत प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. 

दीड हजारांहून अधिक जागा अद्यापही रिक्‍त

लॉगइन आयडीद्वारे माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्‍या सूचनादेखील दिल्‍या आहेत. दरम्‍यान आतापर्यंत ३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्‍चित केले आहेत. नाशिक जिल्‍ह्‍यातील ४४७ खासगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत पंचवीस टक्‍के राखीव जागांमध्ये ५ हजार ५५७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाते आहे. या जागांसाठी ऑनलाइन स्‍वरूपात १७ हजार ६३० प्रवेश अर्ज दाखल झाले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश प्रक्रिया मंदावलेली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. अर्धे सत्र संपत आले असतांना नाशिक जिल्‍ह्‍यातील दीड हजारांहून अधिक जागा अद्यापही रिक्‍त आहेत. 

जिल्‍ह्‍यात ३ हजार ६८५ प्रवेश निश्‍चित 

पहिल्‍या सोडतीतील विद्यार्थ्यांना सप्‍टेंबर अखेरपर्यंत मुदत दिलेली होती. ही मुदत संपल्‍यानंतर आता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीची मुदत दिली जाते आहे. पहिल्‍या सोडतीत ५ हजार ३०७ नावांचा समावेश होता. या यादीतील प्रवेशांसह प्रतिक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतले आहेत. आतापर्यंत जिल्‍ह्‍यात ३ हजार ६८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केलेले आहेत. 

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

शाळांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन 

शाळांमध्ये शिल्‍लक राहिलेल्‍या रिक्‍त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाणार आहे. परंतु पालकांनी फक्त अवलंबून राहू नये. पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहता येणार आहे. शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये तसेच प्रवेश घेण्यासाठी सोबत बालकांना घेऊन जाऊ नये, असेही शिक्षण विभागाने स्‍पष्ट केले आहे. पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती, आर.टी.ई. पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती या टॅबवर क्‍लिक करून हमी पत्र आणि अलॉटमेंट लेटरची प्रत शाळेत घेऊन जायची आहे.  

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE admission, students on waiting list Admission deadline is Thursday nashik marathi news