अन् थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने 'तो' मेसेज व्हायरल...शहानिशा केली तर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात लॉकडाउन घोषित आहे. शुक्रवार (ता.22) पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नाशिक शहर "रेड झोन'मध्ये असल्याच्या कारणामुळे 31 मेपर्यंत नाशिक शहर बंद राहणार असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. 

नाशिक : अज्ञात संशयिताने "लॉकडाउन' संदर्भातील आदेशामध्ये फेरबदल करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नाशिक शहर "रेड झोन'मध्ये असल्याच्या कारणामुळे 31 मेपर्यंत नाशिक शहर बंद राहणार असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत अज्ञात संशयितांविरोधात अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

अशी आहे घटना

तलाठी आनंद मेश्राम यांच्या फिर्यादीनुसार, अज्ञात संशयिताने "लॉकडाउन' संदर्भातील आदेशामध्ये फेरबदल करीत शुक्रवार (ता.22)पासून 31 मेपर्यंत अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक सेवा वगळता नाशिक शहर बंद राहील, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला. या संदेशामुळे नाशिककरांमध्ये चुकीचा संदेश गेला. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही. शहरात सार्वजनिक प्रवासी वाहतूक होणार नाही. यात शहर बस व रिक्षांनाही परवानगी नाही. हे आदेश येत्या 31 मेपर्यंत लागू असतील. अत्यावश्‍यक व जीवनावश्‍यक सेवा नियमित सुरू राहतील. तसेच, यापूर्वीच्या आदेशानुसार वेळेचे बंधन कायम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. 

हेही वाचा > स्वच्छ भारत अभियानात नाशिकचे तारे जमीनवरच! 'या' कारणांमुळे रेटिंग पडल्याचा प्राथमिक निष्कर्ष

नागरिकांनी संदेशाची सत्यता पडताळून पाहिल्यानंतरच तो फॉरवर्ड करावा. नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले जातील, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.  

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rumors of Nashik bandh; Crimes against suspects nashik marathi news