जिल्ह्यात ग्रामीण भागातील मृत्युदर २.२३ टक्के; सर्वाधिक बाधितांचे प्रमाण एकतिशी ते चाळिशी वयोगटात

महेंद्र महाजन
Thursday, 1 October 2020

नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण २.२३ टक्के आहे. जूनमध्ये ७.५४ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता, तसेच ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक २१.३ टक्के प्रमाण एकतिशी ते चाळिशी या वयोगटातील आहे, तर एकविशी ते पन्नाशी या वयोगटातील ५८.३ टक्के कोरोनाग्रस्त झाले. 

नाशिक : नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्र वगळता जिल्ह्याच्या उर्वरित ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण २.२३ टक्के आहे. जूनमध्ये ७.५४ टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला होता, तसेच ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सर्वाधिक २१.३ टक्के प्रमाण एकतिशी ते चाळिशी या वयोगटातील आहे, तर एकविशी ते पन्नाशी या वयोगटातील ५८.३ टक्के कोरोनाग्रस्त झाले. 

एकविशी ते पन्नाशीपर्यंत बाधितांचे प्रमाण ५८.३ टक्के 
ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २० हजार १७० झाली आहे. त्यातील ४५० जण दगावले आहेत. सद्यःस्थितीत चार हजार १० जण उपचार घेताहेत. पूर्ण बरे झालेल्यांचे प्रमाण ७७.८९ टक्के असून, एक हजार ८५८ जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. शहर आणि जिल्ह्यातील पहिला रुग्ण मार्चमध्ये आढळला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये सात रुग्ण आढळले होते. हे सर्व जण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले. मेमध्ये १५५ पैकी सहा म्हणजेच, ३.८७ टक्के जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये ७०२ पैकी ५३ म्हणजेच, ७.५४ टक्के जण दगावले. जुलैमध्ये २.८४, तर ऑगस्टमध्ये २.२५ टक्के मृत्यूचे प्रमाण राहिले. मंगळवार (ता. २९)पर्यंत मृत्यूचे प्रमाण १.५५ टक्क्यांपर्यंत कमी झाले होते. अशात, बुधवारी १६ जणांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत 
जिल्ह्यात ११ ते २० वर्षे वयोगटातील ०.२३, २१ ते ३० वर्षे वयोगटातील १.६१, ३१ ते ४० वर्षे वयोगटातील ६.४५, तर ४१ ते ५० वर्षे वयोगटातील ११.५२ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. पन्नाशीच्या पुढील वयामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत गेले आहे. ५१ ते ६० वर्षे वयोगटातील २५.५८ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. ६१ ते ७० वर्षे वयोगटातील सर्वाधिक २९.२६ टक्के जणांचा मृत्यू झाला. ७१ ते ८० वर्षे वयोगटातील २०.५१ आणि ८१ वर्षे वयाच्या पुढील ४.८४ टक्के जण दगावले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्यांची वयोगटनिहाय टक्केवारी अशी ः दहा वर्षांच्या आतील- ४.४, ११ ते २० वर्षे- ८, २१ ते ३० वर्षे- १९.१, ३१ ते ४० वर्षे- २१.३, ४१ ते ५० वर्षे- १७.८, ५१ ते ६० वर्षे- १५.१, ६१ ते ७० वर्षे- ९.१, ७१ ते ८० वर्षे- ४.२, ८१ वर्षांपेक्षा अधिक- ०.९. ही स्थिती मंगळवार (ता. २९)पर्यंत आढळलेल्या रुग्णांची आहे. 
हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ
मृत्यूचे प्रमाण 
(आकडे टक्क्यांमध्ये) 

नाशिक शहर ः १.४३ 
मालेगाव शहर ः ४.१२ 
संपूर्ण जिल्हा ः १.८०  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rural death rate in district is 2.23 percent nashik marathi news