सर्वपित्री अमावस्या! काहींची तपोवनात 'काकस्पर्शा'साठी रीघ; तर अनेकांनी लढविली 'अशी' शक्कल

दत्ता जाधव
Thursday, 17 September 2020

आज सकाळपासूनच अनेकांची ‘काकस्पर्शा’साठी मोठी धडपड सुरू होती. कधीकाळी रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर देशी झाडे होती, त्यामुळे याभागात इतर पक्षांसारखेच कावळेही मोठ्या प्रमाणावर होते, परंतु आता येथील झाडे कमी झाल्याने काकस्पर्शासाठी तासनतास ताटकळत बसावे लागते

नाशिक/ पंचवटी : सर्वपित्री अमावस्येचे निमित्त साधत आज पितरांना घास देण्यासाठी गंगाघाटासह तपोवन आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. लॉकडाऊनमुळे परप्रांतियांनी रामकुंडाकडे पाठ फिरविल्याने येथील विधी अवघे पंधरा ते वीस टक्क्यांवर आल्याचे दिसून आले. दरम्यान २ तारखेपासून सुरू झालेल्या पित्र पंधरवाड्याचा आजच्या सर्वपित्रीने शेवट झाला.

ज्यांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नसते, किंवा आहे त्या तिथीला श्राद्धविधी करणे शक्य झाले नसेल, अशा कुटुंबात रूढी परंपरेनुसार सर्वपित्री अमावस्येला पूर्वजांना भोजन दिले जाते. त्यामुळे आज सकाळपासूनच अनेकांची ‘काकस्पर्शा’साठी मोठी धडपड सुरू होती. कधीकाळी रामकुंड परिसरात मोठ्या प्रमाणावर देशी झाडे होती, त्यामुळे याभागात इतर पक्षांसारखेच कावळेही मोठ्या प्रमाणावर होते, परंतु आता येथील झाडे कमी झाल्याने काकस्पर्शासाठी तासनतास ताटकळत बसावे लागते, असा अनेकांना अनुभव आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

तपोवन रस्त्यावर लोटली गर्दी 

गंगाघाटावरील रामकुंड परिसरात काकस्पर्श दुर्मिळ बनल्याने अनेकजण सकाळीच पंचवटी स्मशानभूमीशेजारील स्मृतीवन उद्यान गाठतात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने कावळे ‘घास’ही पटकन घेत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे अलीकडे मोठी गर्दी उसळू लागली आहे. येथील झटपट ‘काकस्पर्शा’ची किर्ती सर्वदूर पसरल्याने गत पंधरा दिवसांपासून अनेकजण दूरवरून याठिकाणी घास देण्यासाठी येत आहेत. 

रामकुंडावरची गर्दी रोडावली 

सर्वपित्री अमावस्येला आपल्या पितरांच्या श्राद्धविधीसाठी दरवर्षी रामकुंडावर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी उसळते. यासाठी याभागातून महाराष्टात आलेले अनेकजण सहकुटुंब रामकुंडावर धार्मिक विधींसाठी येतात, परंतु यंदा कोरोना सावटामुळे ही गर्दी अवघ्या पंधरा ते वीस टक्क्यांवर आल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेश, बिहार भागातील भाविक महालय श्राद्धासाठी मोठ्या संख्येने येतात. परंतु यंदा ही संख्या अवघ्या पंधरा ते वीस टक्क्यांवर आल्याची माहिती नितीन पाराशरे यांनी दिली. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

डिजिटल सर्वपित्री 

कोरोनामुळे यंदा प्रथमच सोशल डिस्टन्सिंग आदी संज्ञा नव्याने उदयास आल्या आहेत. मात्र यास्थितीतही राज्यभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने हादरून गेलेल्या यंत्रणेने कडक नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर आज श्राद्ध विधी पार पडले. पुरोहितांसह विधीसाठी आलेल्यांनी मास्क परिधान केले होते. मास्कमुळे स्पष्ट मंत्रोच्चार होत नसल्याने अनेकांनी थेट डिजिटल पद्धतीचा वापर केला. हा प्रकार आज रामकुंडावर मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sarva pitru amavasya crowd gathered nashik marathi news