MLC20A00363_pr.jpg
MLC20A00363_pr.jpg

लॉकडाऊनमध्ये वयोवृद्धने साकारला 'नॅनो पॉवर टिलर'; शेतकऱ्यासाठी बहुउपयोगी यंत्राचे कर्तब वाचून व्हाल थक्क!

नाशिक/ दाभाडी : गरज ही शोधाची जननी असते; परंतु शोधक नजरेला कलात्मकतेची जोड लाभल्यास टाकाऊमधून टिकाऊच नव्हे तर बहुआयामी निर्मिती घडून येते, याचा प्रत्यय मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील वयोवृद्ध तंत्रस्नेही कारागिराने आणून दिला आहे. अवघ्या एका मजुराच्या सहाय्याने शेतीच्या आंतर मशागतीसाठी चालवता येणाऱ्या स्वयंचलित ‘नॅनो मिनी पावर टिलर’ची यशस्वी चाचणी ग्रामीण तंत्रज्ञानाचा उद्‍बोधक आविष्कार ठरला आहे. दोन फूट रुंदीमुळे उभ्या पिकातील आंतरमशागत करणारे हे यंत्र औत्सुक्याचा विषय बनला आहे. 


लॉकडाउनमध्ये सुचली संकल्पना 
लॉकडाउन काळात सर्वच व्यवहार बंद असल्याने बिरोबाचे साकुरी (निं) येथील आनंदा चोरघे (वय ६५) या वयोवृद्ध कारागिराने टाकाऊ वस्तूंच्या सहाय्याने बहुउद्देशीय स्वयंचलित नॅनो मिनी पावर टिलर ५ एचपीचा आविष्कार केला आहे. घरीच शेती अवजारांची जुळवणी करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. १९७४ मध्ये आयटीआयचे शिक्षण घेऊन नोकरीचा पाठलाग न करता गावीच शेती आणि जोडीला वेल्डिंग व्यवसाय आरंभला. लॉकडाउनच्या रिकाम्या काळात या वयोवृद्ध तंत्रस्नेहीच्या विचार चक्रात नॅनो टिलरची संकल्पना सुचली अन् स्वारी जुगाड कारायला लागली. 


वयोवृद्धने साकारला नॅनो पॉवर टिलर 
घरगुती अवजड वस्तूंचा चपखल उपयोग आणि तंत्रज्ञानाचा वापर करत नवं तंत्र आकारात घेऊ लागले. यंत्रात जमिनीत तीन ते सात इंच रोटर पोचण्यासाठी खटके दिले आहेत. शेतात गरजेनुसार रोटरचे फिरते पाते खाली-वर करण्याची सोय केली आहे. मोटार ते रोटर पाते यांची जोडणी मोटारसायकलच्या चैनने केली आहे. तीन महिन्यांच्या श्रमातून आणि विविध चाचण्यांतून या नॅनोला मूर्त रूप प्राप्त झाले आहे.

 
शेतकरीवर्गात चर्चा 
अल्पभूधारक शेतकरी बैलजोडीच्या सहाय्याने आंतर मशागतीला प्राधान्य देतात. हाच वर्ग डोळ्यांसमोर ठेवून बैलजोडीशिवाय कमी जागेतील आणि कमी वेळेत डिझेल इंधनावर चालणारे यंत्र बनवलं आहे. चोरघे यांनी या नॅनो यंत्राची परिसरातील विविध शेतात जाऊन चाचणी घेतली. इंधन खर्च, वेळ आणि शेतीकामाच्या दर्जाच्या नोंदी ठेवल्या. येणाऱ्या अडचणींना सामोरे जात यंत्रात बदल करून सर्वसमावेशक असे ‘नॅनो टिलर’च्या आविष्कारावर शिक्कामोर्तब केले आहे. साकुरी पंचक्रोशीतील शेतकरीवर्गांत सध्या नॅनो टिलर प्रचंड चर्चेत आहे. 


विविध पिकांसाठी असा होणार उपयोग : 
अ. / पिकांचे नाव / एक क्षेत्रासाठी डिझेल (लिटरमध्ये) / मशागत दर्जा 
१) कपाशी वखरणे / १ लिटर / चांगली 
२) मका / २ लिटर / चांगली 
३) भुईमूग आंतरमशागत करणे / २.५ लिटर / भुसभुशीत 
४) शेवगा बुडाजवळील गवत काढणे / ३ लिटर / चांगली परत 
५) डाळिंब / ३ लिटर / चांगली परत 
६) आले आंतरमशागत / १.५ लिटर / अतिउत्तम 
७) वांगे बेडवरील आंतरमशागत / १ लिटर / अतिउत्तम 
८) बाजरी सरी पद्धतीने आंतरमशागत करणे / २ लिटर / अतिउत्तम 
९) कमी अंतरात रोटर मारणे / ३ लिटर / उत्तम प्रकारे 
 

संपादन : भीमराव चव्हाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com